Next
पर्यावरणप्रेम जागवणारी ‘निसर्गवेध’
BOI
Friday, December 08 | 03:45 PM
15 0 0
Share this story

‘ग्लोबल वॉर्मिंग’चे चटके बसलेल्या मानवजातीला आता निसर्गाची महती कळून चुकली आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी, त्याचे संवर्धन करण्यासाठी जगभरात विविध प्रयत्न केले जात आहेत. हे निसर्गभान सर्वसामान्य जनतेत जागविण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती जीव तोडून काम करत आहेत. अशीच पुण्यातील एक संस्था म्हणजे निसर्गवेध. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज जाणून घेऊ या पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘निसर्गवेध’बद्दल...
.........
किरण पुरंदरे
‘महाखुळे ते होते, असती, म्हणून आपण सारे रुपयांसह पेटीत ठेवतो दोन-चार ते तारे’.... कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेल्या या ओळी अगदी समर्पक ठरतात त्या निसर्गसंवर्धनासाठी काम करणारे, पक्षिप्रेमी किरण पुरंदरे यांच्यासाठी. त्यांनी स्थापन केलेली निसर्गवेध ही संस्था निसर्गरक्षणासाठी कार्यरत आहे. 
किरण पुरंदरे गेली २८ ते ३० वर्षे पर्यावरणरक्षणासाठी कार्यरत आहेत. ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर-इंडिया’ या संस्थेमध्ये विभागीय अधिकारी आणि शिक्षण अधिकारी म्हणून दहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी निसर्ग संरक्षणाच्या कामाला वाहून घेतले. 

माणसांच्या जगात कंटाळा आल्यावर त्यांनी जंगलाची वाट धरली. त्यांनी नागझिराच्या जंगलात तब्बल ४०० दिवस घालवले. तिथे पक्षी-प्राण्यांचा अभ्यास केला. त्यातून २२ प्राणी आणि १०० पक्ष्यांचे आवाज त्यांनी आत्मसात केले. ‘निसर्गाची हाक ऐकली, की त्याला काय हवे आहे हे तोच सांगतो. बालपणापासून हे संस्कार झाले पाहिजेत,’ असे त्यांना वाटते. त्यामुळे निसर्गाशी ओळख करून देण्यासाठी ते पक्षी निरीक्षण, जंगल सफारींचे आयोजन करतात. मुलांना जंगलाची ओळख करून देतात. जंगलात प्राण्यांना दुष्काळात पाणी मिळत नाही. पाणवठे कोरडे पडलेले असतात. त्यामुळे प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीजवळ येतात आणि प्रसंगी जीवाला मुकतात. हे लक्षात घेऊन जंगलात पाणीसाठे तयार करण्याचे काम निसर्गवेध संस्था ‘सेतू’ या प्रकल्पाद्वारे करत आहे. 

‘सह्याद्रीचा अभ्यास केला, तर लक्षात येते, की अनेक ठिकाणी जंगले बदलली आहेत. त्यांचा आकार लहान लहान होत चालला आहे. ज्या जंगलामध्ये माणसांचा वावर नसतो, तिथे आपोआपच चांगली जंगले तयार होतात; पण माणसाचा वावर वाढला, की जंगलांचा आकार कमी होतो. आपण जंगले निर्माण करू शकत नाही. निसर्गासाठी काही करायची इच्छा असेल, तर प्रत्येकाने प्रथम निसर्ग वाचायला शिकले पाहिजे. त्याला काय हवे आहे, ते निसर्ग आपणहूनच सांगेल. स्थानिकांच्या सहभागातून अनेक गोष्टी शिकता येतात,’ असे पुरंदरे म्हणतात. पक्षी, आभाळवाटांचे प्रवासी, पाणथळ पक्षी अशी १५पेक्षा जास्त पुस्तके पुरंदरे यांनी लिहिली आहेत.

पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश अशा पंचमहाभूतांनी बनलेला निसर्ग म्हणजे अनेक गूढ रहस्यांचे आगर आहे. मानवी बुद्धीने त्याच्यावर आक्रमण करून निसर्गावर विजय मिळवण्याचे प्रयत्न केले आहेत. या प्रक्रियेत मानवाने निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. त्याचे दुष्परिणाम आता त्यालाच भोगावे लागत आहेत. निसर्ग जपला तरच आपल्या पुढच्या पिढ्या सुदृढ आयुष्य जगू शकतील. निसर्गवेध संस्था त्यासाठीच कार्य करत आहे. 

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(किरण पुरंदरे यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/MSDGJt येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link