Next
‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन
पाकणीकर यांनी टिपलेल्या कलाकारांच्या भावमुद्रांची मैफल
BOI
Tuesday, December 11, 2018 | 12:51 PM
15 0 0
Share this article:

पुणे : प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे श्रेष्ठ व्यक्तीमत्वांच्या प्रकाशचित्रांसाठी आणि त्यांवर आधारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक दिनदर्शिकांसाठी प्रसिद्ध आहेत. २०१८ साठीही त्यांनी  काही गुणवान स्वरसाधक कलावंतांची चित्रमैफल ‘स्वरसाधक २०१९’ या दिनदर्शिकेत सजवली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शुभारंभदिनी बुधवारी, १२ तारखेला पंडित वसंत काबरा यांच्या हस्ते होणार आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना सतीश पाकणीकर म्हणाले, ‘भारतीय शास्त्रीय संगीताला फार मोठी परंपरा लाभली आहे. अगदी वैदिक काळापर्यंत ती मागे नेता येईल,असे असले तरीही भारतीय शास्त्रीय संगीत काळाबरोबर सतत बदलते व प्रवाही राहिलेले आहे. संगीताची ही गंगा आपल्या प्रतिभाशाली कर्तृत्वाने वाहती ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अनेकानेक महान कलावंतांनी करून ठेवले आहे. त्यांचे हे कार्य त्याच तडफेने पुढे नेण्यासाठी आजच्या पिढीतील अनेक कलाकार फक्त उत्सुकच आहेत असे नाही, तर समर्थही आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होत, पण तरीही परंपरेची नाळ न सोडता आजच्या जमान्यातील हे कलावंत आपल्यापरीने ही संगीतविद्या समृद्ध करीत आहेत. अशा काही गुणवान स्वरसाधक कलावंतांची चित्रमैफल मी ‘स्वरसाधक २०१९’ या दिनदर्शिकेत सजवली आहे.’

‘गळ्यात कॅमेरा घेऊन ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त मी प्रवेश केल्याला या वर्षी पस्तीस वर्षे पूर्ण होतील. या काळात जवळजवळ पाचशे गायकवादकांच्या हजारो भावमुद्रा मला कॅमेराबद्ध करता आल्या. कलेच्या सादरीकरणात हरवून गेलेली ही कलावंत मंडळी जेव्हा आपल्या सादरीकरणात परमोच्च क्षण गाठतात, तो ‘निर्णायक’ क्षण टिपण्याची माझी सदैव धडपड राहिली. त्या सर्व कलाकारांच्या गायन-वादनाबरोबरच मला या निर्णायक क्षणांनीही अपरिमित आनंद दिला. माझा हा आनंद सर्व संगीतप्रेमींत वाटून घेता यावा यासाठीच ही ‘थीम कॅलेंडर’ची निर्मिती केली आहे. ‘स्वरसाधक’ या कॅलेंडरमधील जवळजवळ सर्वच कलावंतांची कारकिर्द साकारताना पाहण्याचे भाग्य माझ्या कॅमेऱ्याला लाभले. या कलावंतांची सर्जनशीलता, बुद्धिमत्ता व संगीताप्रती निष्ठा यांचे आपण सर्व जण साक्षीदार आहोत. त्यांची नवोन्मेषशाली प्रतिभा जशी बहरत गेली तशी त्यांच्या सादरीकरणात आलेली सहजता त्यांच्या भावमुद्रातून प्रकट होत गेली. या भावमुद्रा पाहताना रसिकांना क्षणभर का होईना त्या मैफिलीचा अनुभव आला तर ते या प्रकाशचित्रांचे यश असेल’, असेही त्यांनी नमूद केले. 

पाकणीकर पुढे म्हणाले, ‘या भावमुद्रांच्या बरोबरीनेच ‘मी व माझे संगीत’ या विषयावर त्या कलावंतांनी व्यक्त केलेले विचार हे ‘स्वरसाधक’चे खास वैशिष्ट्य ठरेल. या कलाकारांची सर्व वैशिष्ट्ये कॅलेंडरच्या बारा पानांमधून व्यक्त होतील, असा माझा भाबडा समज नाही;पण त्याची थोडीतरी झलक यातून मिळेल ही खात्री आहे.’

‘अनुनाद या नामवंत संस्थेनं केलेली सुबक मांडणी, दिशा ऑफसेट यांनी आर्ट पेपरवर केलेली उत्तम छपाई, वायर-ओ-वायर ची बांधणी ही खास वैशिष्ट्ये आहेतच. या कॅलेंडरचे प्रकाशन सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी व कॅलेंडरमध्ये समाविष्ट असलेल्या काही कलाकारांच्या उपस्थितीत ‘सवाई स्वरमंचा’वरून होणार असून, ‘सवाई’च्या प्रांगणातील स्टॉलवर त्याची सवलतीच्या दरात विक्रीही करण्यात येणार आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

(ही बातमी इंग्रजीमधून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search