Next
बॅडमिंटनमधील आविष्कार!
BOI
Friday, October 26 | 06:45 AM
15 0 0
Share this story

आविष्कार मोरेपुण्याच्या क्रीडा क्षेत्रात गेल्या आठ-दहा वर्षांपासून शहरी खेळाडूंबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूही आपली गुणवत्ता सिद्ध करताना दिसत आहेत. आपापल्या खेळाचा ध्यास घेतलेले हे खेळाडू मेहनतीने यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आविष्कार मोरे हा असाच एक बॅडमिंटनपटू सध्या आपले पाय रोवू पाहत आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या नवोदित बॅडमिंटनपटू आविष्कार मोरेबद्दल...
.........................
खेळ कोणताही असो, प्रशिक्षक उपलब्ध असो वा नसो, किंवा सुविधाही असोत वा नसोत, ध्यास घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंना या सगळ्यामुळे काहीच फरक पडत नाही. ते केवळ यशाच्या दिशेने वाटचाल करत असतात. अशाच ध्यासपूर्ण खेळाडूंच्या यादीत मोडणारा आविष्कार मोरे पुण्यात बॅडमिंटनपटू म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. 

आज भारतात बॅडमिंटन हा खेळ क्रिकेटच्या पाठोपाठ नव्हे, तर क्रिकेटच्या बरोबरीने लोकप्रिय होत आहे. पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत या खेळाडूंमुळे हा खेळ आता घराघरांत पोहोचला आहे. एके काळी सैद मोदी, प्रकाश पदुकोन, चेतन आनंद, विमल कुमार या खेळाडूंमुळे भारतीय बॅडमिंटनची शान जगात वाढली. आज तेच काम सायना नेहवाल, सिंधू, श्रीकांत हे खेळाडू करताना दिसत आहेत.

पदुकोन यांचा कालखंड संपला. त्यानंतर पी. गोपीचंद याने हा वारसा पुढे चालू ठेवला. जागतिक बॅडमिंटन क्षेत्रात सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाणारी ‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा’ पदुकोन यांच्यापाठोपाठ गोपीचंद यानेही जिंकली. त्यानंतर या खेळाकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. यातच आता नवीन पिढी आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. आविष्कार मोरे किंवा त्याच्याच वयोगटातील इतर अनेक खेळाडू आज जे यश मिळवत आहेत, ते पाहता भारतीय बॅडमिंटनचे भविष्य उज्ज्वल आहे.

भारतीय विद्याभवन शाळेत आठवीत शिकत असलेला आविष्कार सहजच म्हणून बॅडमिंटनची रॅकेट हातात घेतो आणि केवळ वर्षभरातच जवळपास पंधरा स्पर्धा जिंकतो, हे खरोखर अविश्वसनीय आहे. शाळेत क्रीडा शिक्षकांनी जे काय शिकवले, ते निश्चितच पुरेसे नव्हते; मात्र खऱ्या गुणवत्तेला शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज नसते, असे म्हणतात याची प्रचिती आविष्कारची कामगिरी पाहून सहज येते.  

सातवीत असताना रॅकेट हातात घेऊन आपल्याच सोसायटीत इतर मुलांबरोबर बॅडमिंटन खेळता खेळता तो कधी नावारूपाला आला, हे त्यालाही समजले नाही. शाळेकडून स्कूलिम्पिक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या गुणवत्तेला मोठे व्यासपीठ मिळाले. या स्पर्धेत त्याने साखळी आणि बाद फेरीतील सर्व सामने जिंकले आणि भल्या भल्या खेळाडूंना पराभूत करत आपला दर्जा सिद्ध केला. या खेळाडूंमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा खेळलेलेसुद्धा अनेक खेळाडू होते; मात्र आविष्कारने आपल्या जिद्दीच्या जोरावर आक्रमक खेळ करत त्यांना नामोहरम केले. त्याचे बॅडमिंटनवरील प्रेम पाहून त्याला अधिकृत मार्गदर्शन मिळावे यासाठी त्याच्या कुटुंबाने पुणे जिल्हा आणि मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या मॉडर्न कॉलेज येथील क्रीडा संकुलात नरेंद्र गोगावले या वरिष्ठ प्रशिक्षकांकडे त्याला पाठवले. स्मॅश मारताना किंवा टॉस करताना ज्या काही चुका आविष्कारकडून होत होत्या, त्या दूर करण्यात गोगावलेंचा मोठा वाटा आहे.  

आठवड्यातून चार दिवस आविष्कार तिथे प्रशिक्षण घेतो. या प्रशिक्षण शिबिरात एका गटात दहा खेळाडू असतात त्यामुळे प्रशिक्षकांनाही प्रत्येक खेळाडूकडे पुरेसे लक्ष देता येते.  आविष्कारची गुणवत्ता गत वर्षी डेक्कन जिमखाना कोर्टवर झालेल्या स्पर्धेतच सर्वप्रथम समोर आली. या स्पर्धेतील सर्व सामने त्याने जिंकले. त्या वेळी आविष्कारला कोणीही प्रशिक्षक नव्हता. तो आता गोगावले यांच्याकडे प्रशिक्षण घेत असल्याला केवळ एक महिना झाला आहे. या काळात कोणीही प्रशिक्षक नसताना त्याने तेरा स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले. एका स्पर्धेतील विजेतेपदाबरोबरच त्याला यॉनेक्स कंपनीने संपूर्ण बॅडमिंटन किट बक्षीस म्हणून दिले, तर आता नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेतेपदाबरोबरच अप्सरा कंपनीनेही त्याला बक्षीस देऊन गौरवले आहे.

केवळ बॅडमिंटनच नव्हे, तर कबड्डी, फुटबॉल, व्हॉलिबॉलमध्येही त्याने अनेक स्पर्धा खेळून बक्षिसे मिळविली आहेत. त्याला मुळात नृत्याची आवड होती. त्यातच त्याला कारकीर्द करायची होती; मात्र अचानक बॅडमिंटनची आवड निर्माण झाली आणि तो एक बॅडमिंटनपटू म्हणून नावारूपाला येऊ लागला.  आविष्कारची कौटुंबिक पार्श्वभूमी क्रीडा क्षेत्राची नसली, तरी त्याचे आई-वडील त्याच्या कारकिर्दीबाबत खूपच गंभीर आहेत.  असा पाठिंबा प्रत्येक खेळाडूला मिळाला, तर एका सामान्य खेळाडूतून एक असामान्य खेळाडू तयार होऊ शकतो. आविष्कारच्या बाबतीत बोलायचे झाल्यास लवकरच त्याचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न साकार झालेले दिसेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ģeetanjali wakure About 16 Days ago
Congratulations avishkar 👌👌 keep it up👍👍 Love u so much😊😊
0
0
Rohini pawar About 17 Days ago
very nice artical
0
0
Rupali About 18 Days ago
Well-done Avi👌👌👌 Keep it up👍👍👍
0
0
Rekha Thombare About 19 Days ago
Congratulations....!!! All my best wishes are with you. Work hard,success will follow your footsteps.lots of love Avii!
0
0
Ujwala Yadav Suryawanshi About 19 Days ago
Congrats Avishkar and Parents Proud of U Best wishesh from Suryawanshi family
0
0
Sangita jogdand About 19 Days ago
Heartly congratulations Aviishkar .All the best for your bright future.Our best wishes are always with you
1
0
Devendra shinde About 19 Days ago
Heartly congratulations Avishkar. Best of luck for your bright future. U will definately sucess in this field. Our best wishes r always with u.
0
0

Select Language
Share Link