Next
नववर्षानिमित्त व्यसनमुक्तीचा संदेश
मोहन काळे
Monday, January 01 | 01:59 PM
15 0 0
Share this story

मंगळवेढा : इंग्रजी नववर्षाचे स्वागत करताना दारू ऐवजी दूध प्या असे कोणी म्हटले, तर सर्व जण त्याला वेड्यात काढतील. परंतु संत दामाजीपंतांच्या मंगळवेढा नगरीत ‘वारी परिवारा’चे तरुण कार्यकर्ते ‘दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करा,’ असा संदेश गेल्या दोन -तीन वर्षांपासून आपल्या कृतीतून देत आहेत. लोकांना दारूसारख्या व्यसनापासून दूर राहण्यास प्रोत्साहन देत आहेत. 

३१ डिसेंबर म्हटले, की दारू पिऊन सेलिब्रेशन करण्याकडे युवा वर्गाचा कल असतो. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी, दारू पिऊन वाहन चालविणे, सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठा आवाज करणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था भंग पावते, तसेच दारूमुळे अपघात होतात. काही लोक मृत्युमुखी पडतात, तर काहीजण जखमी होतात. परिणामी त्यांच्या कुटुंबाचा आधार गेल्याने संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येते. अशा घटना घडू नयेत यासाठी वारी परिवाराने दारूमुक्तीसाठी उचललेले पाऊल खूप महत्त्वाचे आहे. 

व्यसनमुक्त तरुणच देशाची खरी संपत्ती आहे, हे ओळखून वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने व पोलीस स्टेशनच्या वतीने ३१ डिसेंबरच्या रात्री दामाजी चौकामध्ये ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून अडीच हजार लोकांना मसाला दुधाचे मोफत वाटप करून त्यांनी व्यसनमुक्तीचा नारा दिला. 

या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एपीआय सचिन हुंदळेकर, एपीआय पुजारी साहेब, औदुंबर वाडदेकर, युनूस शेख, अरुण किल्लेदार, अॅड. रमेश जोशी, चंद्रशेखर कौंडुभैरी, अजित जगताप, सोमनाथ आवताडे, प्रवीण खवतोडे, बबलू सुतार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

या वेळी प्रभाकर मोरे म्हणाले, ‘दारूपिणे मानवी आरोग्यास खूपच धोकादायक आहे. आज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेल्या दहा गुन्ह्यांपैकी आठ गुन्हे दारूमुळे घडत आहेत, ही फारच विचार करण्याची गोष्ट आहे. घरामधील एक कर्ता पुरूष दारूमुळे मरण पावला, तर ते कुटुंब रस्त्यावर येते. यासाठी दारूमुक्तीसाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. मंगळवेढा व्यसनमुक्त करण्यासाठीवारी परिवाराने ‘मिशन २०१८’ हा संकल्प केला आहे.  या संकल्प सिद्धीसाठी पोलीस सदैव वारी परिवाराच्या पाठीशी उभे राहतील.’

पूर्वा नागणे, अजित जगताप, औदुंबर वाडदेकर, युनूस शेख, अॅड. रमेश जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमास जिल्हा दूध संघ - मंगळवेढा, आनंद खटावकर, अभिमान दत्तू, मोहन जाधव, अमेय नेने, दादा गायकवाड, श्रीशैल्य राजमाने, दामाजी मंदिर ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले.

या वेळी प्रा. येताळा भगत, मारुती वाकडे, डॉ. शरद शिर्के, दिलीप जाधव, नवनाथ पवार, भारत दत्तू, प्रा. राजेंद्र गायकवाड, प्रा. सी. आर. पाटील, शरद हेंबाडे यांच्यासह मंगळवेढा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, वारी परिवाराचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले, तर आभार शशिकांत चव्हाण यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link