Next
‘अभिजात मराठीसाठी जनरेटा हवा’
BOI
Friday, February 02 | 11:36 AM
15 0 0
Share this story



पुणे : ‘दाक्षिणात्य नागरिकांप्रमाणे आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगायला आपण शिकले पाहिजे. वाढत्या इंग्रजी शाळांना आळा घालणे शक्य नसले, तरी मराठी शाळांना प्रोत्साहित करून आपण भाषा टिकवू शकतो. मराठीला अभिजात दर्जा मिळाला, तर अनेक गोष्टी करणे शक्य होणार आहे. त्यासाठी जनरेटा वाढवायला हवा,’ असे आवाहन बडोदा येथे होणार असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.  

साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या वतीने ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते एक फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला. तसेच, चित्रकार सुरेश लोटलीकर यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या आतापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही या वेळी पुण्यातील बालगंधर्व कलादालनात डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, मराठी भाषेचे अभ्यासक प्रा. हरी नरके, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, चित्रकार सुरेश लोटलीकर, उद्योजक भारत देसडला, सचिन ईटकर, कोथरूड व्यासपीठाचे श्याम देशपांडे, बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष रोहित पवार, संयोजक कैलास भिंगारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, तर अनेक गोष्टी आपल्याला करणे शक्य होणार आहे. मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ, संशोधन केंद्र उभारणे शक्य होईल. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जनरेटा वाढविला पाहिजे. गावोगावी ग्रंथालयांची उभारणी केली पाहिजे. मराठी प्रशिक्षणाचा कायदा अस्तित्वात आणला पाहिजे. आपण प्रत्येकाने आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले पाहिजे आणि मराठी भाषा शिकण्याला प्राधान्य दिले पाहिजे.’

प्रा. हरी नरके म्हणाले, ‘मराठी भाषा अभिजात आहे, हे आतापर्यंत केलेल्या संशोधनावरून आणि अहवालावरून आम्ही सिद्ध केले आहे. परंतु, त्याला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार टाळाटाळ करीत आहे. राज्य सरकार यासाठी म्हणावा तसा प्रयत्न करत नाही. या प्रश्नाला राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळाले, तर अभिजात दर्जा मिळण्यात यश मिळेल. अभिजात दर्जामुळे मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढणार आहे. मराठी शाळा, मराठी शिक्षणाला प्रतिष्ठा येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. त्यातून अनेक चांगल्या गोष्टी करणे शक्य होईल. मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहेच; तिला रोजगारक्षम करण्यासाठी अभिजात दर्जा मिळणे अतिशय गरजेचे आहे.’

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘मराठी भाषेला दोन हजारपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असताना, तिच्या अभिजाततेबाबत अनेक पुरावे आणि अहवाल दिलेले असतानाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही, ही शोकांतिका आहे. मराठी भाषेबाबत राजकीय नेते उदासीन आहेत. मराठीचा पुळका असल्याचे दाखवणारे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे तोंड गप्प आहे. दुसरीकडे राज्यातील तेरा हजार मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे घेताहेत. हा अतिशय ‘क्रूर’ असा विनोद आहे. मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरून महाराष्ट्र सरकार लोटांगण का घालत आहे?’

‘शिवाजी महाराजांच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होणे दुर्दैवी आहे. हे थांबवायचे असेल, तर आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. लोकचळवळ उभारून मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी लढा दिला पाहिजे. मराठी राजभाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे. सरकारला कोंडीत पकडून संबंधितांपर्यंत आपला आवाज पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. देशमुख यांनी या मराठी भाषेच्या मुद्द्याला बडोद्यातील संमेलनात हात घालून तो तडीस नेण्याचा प्रयत्न करावा. व्यंगचित्रे सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी असतात. ही कला अतिशय समृद्ध आहे. सुरेश लोटलीकरांनी अर्कचित्रांतून ९१ सारस्वतांना आपल्यासमोर मांडले आहे. त्याचा प्रसार कैलास भिंगारे करताहेत ही आनंदाची बाब आहे,’ असेही डॉ. सबनीस म्हणाले.

भारत देसडला, कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर, सुरेश लोटलीकर, रोहित पवार यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दामले यांनी केले. कैलास भिंगारे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले व आभार मानले.

अर्कचित्रे आणि व्यंगचित्रांचे प्रदर्शन
सुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेल्या आतापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे भरले आहे. या प्रदर्शनात प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व इतर नामवंत व्यंगचित्रकारांची गाजलेली व्यंगचित्रेही पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन आज, शुक्रवार, दोन फेब्रुवारी २०१८ या दिवशी सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
आप्पा रानरूई About 346 Days ago
अभिजात मराठीसाठी जनरेटा पाहिजेच .
0
0

Select Language
Share Link