Next
विश्वचि माझे घर...
BOI
Friday, May 25 | 09:45 AM
15 0 0
Share this story

आइसलंडचे गुलफॉस् फॉल.

‘प्रवास करणे ही चटक लागणारी गोष्ट आहे आणि त्यातून आणखी काही नवीन अनुभवावं, असं वाटत राहतं. ‘विश्वचि माझे घर’ या भावनेमुळे आपण इतर लोकांचे विचार व संस्कृती आपल्या डोळ्यासमोरचे झापड बाजूला करून बघतो. माझ्या पर्यटनाच्या व्यवसायानं मला खूप काही दिलं. आणि मीही या व्यवसायाला माझ्या परीने परतफेड केली ही समाधानाची भावना आहे.’... वाचा ‘विश्वगामिनी सरिता’ सदराचा दुसरा भाग...
...............
अमेरिकन एक्स्प्रेस ही खरं तर फायनान्शियल कंपनी. त्यामुळे दर वर्षी मला ‘मिलियन्स’मध्ये ‘सेल्स गोल्स’ करावी लागत. माझे क्लायंट सर्व आर्थिक स्तरांतले होते. काही जण एक-दोन हजारांच्या ट्रिप बुक करत, तर काही एक-दीड लाखाच्या; पण सगळ्यांना तेवढ्याच तत्परतेने सेवा देत असे. माझा व्यवसाय बराचसा ‘रीफरल’वर असे. आपण एखाद्याला चांगली सेवा दिली, की जाहिरात न करता आपोआप नाव होतं. त्या काळातल्या ‘ग्रेज अॅनाटॉमी’ नावाच्या टीव्ही शोवरील अतिशय सुंदर व लोकप्रिय नटी कॅथरीन हेगल ही माझी क्लायंट होती. ‘ऑस्कर’च्या रात्री फार सुरेख गाऊन घातलेले तिचे फोटो झळकत. एवढी प्रसिद्ध असूनही, बोला-वागायला अगदी सरळ. तिची आई व बहीणही मला प्रवासासाठी फोन करत. एक क्लायंट फायनान्शियल जगात फार मोठ्या हुद्द्यावर होता. न्यूयॉर्कच्या वाल्ड्रॉर्फ हॉटेलमध्ये त्याची वर्षभर पेंटहाउस स्वीट असे. तो दर वर्षी एक लाख डॉलरची क्रूझ बुक करत असे; पण वागताना कुठलाही गर्व किंवा घमेंड नाही. एका क्लायंटसाठी खासगी विमानातून अनेक देश बघत वर्ल्ड टूर आखायचा अनुभव मिळाला. 

गलापगोज बेटावरील नर फ्रिगेट पक्ष्यांच्या मानेवर मादीला आकर्षित करायला लाल फुगा असतो.
‘अमेरिकन एक्स्प्रेस’चे ब्लॅक किंवा प्लॅटिनम कार्डस् असलेले क्लायंट वेळेला दोन माणसांसाठी ४०-५० हजार डॉलरच्या ट्रिप्स सहज बुक करत. इकडे असतो त्यांच्याकडे अमाप पैसा असतो. त्यांना उत्तम सेवा दिली, की वर्षानुवर्षं त्यांच्याकडून धंद्याचा रतीब मिळे. या लोकांमुळे मला माझे ‘सेल्स गोल्स’ (विक्रीची उद्दिष्टं) पूर्ण करणं सोपं जाई; मात्र ते या जगातले उत्कृष्ट आणि काहीतरी जगावेगळे अनुभवायला मागत. माझ्या दृष्टीने ते आव्हान असे.

अंटार्क्टिकाचे सुंदर दृश्य.
पर्यटनाच्या क्षेत्रात असल्यामुळे माझा स्वतःचा प्रवासही खूप झाला. सातही खंडांतले बरेच देश पहिले. त्यातले काही प्रवास कामासाठी केले. कामासाठी केलेल्या प्रवासात प्रेक्षणीय स्थळे पाहणे कमी आणि हॉटेल व त्यांच्या सुविधा बघण्यावर भर असे. जगातली बरीच पंचतारांकित हॉटेल ‘अमेरिकन एक्स्प्रेस’च्या फाइन हॉटेल प्रोग्रामच्या यादीमध्ये आहेत. ही हॉटेल्स आपलं जे काही अत्युत्तम असेल, ते आमच्यावर प्रभाव पाडायला आम्हाला दाखवत. ते हॉटेल आम्ही आमच्या उच्चभ्रू क्लायंटना सुचवताना आम्हाला त्याच्याबद्दल माहिती असावी, हा हेतू त्यामागे असे. त्यामुळे मला कामासाठी गेले की राहायला मोठी स्वीट, खास रेस्टॉरंटमध्ये जेवण, स्पा अशा गोष्टी उपभोगायला मिळाल्या. 
मॉन्टे कार्लो इथल्या ‘हॉटेल द परी’च्या लग्रील रेस्टॉरंटमधून दिसणारा शहराचा देखावा.

शेफ एलन डूकासे याचे ‘लुई फिफ्टीन’ हे तीन मिश्लीन तारका असलेले रेस्टॉरंट.मॉन्टे कार्लो इथल्या ‘हॉटेल द परी’च्या लग्रील रेस्टॉरंटमधून शहराचा रात्रीच्या प्रकाशात अगदी ‘ड्रीमी व्ह्यू’ दिसला आणि तिथले शेफ एलन डूकासे याच्या ‘लुई फिफ्टीन’ या तीन मिश्लीन तारका असलेल्या रेस्टॉरंटमध्येही जायला मिळाले. तीन मिश्लीन तारका असणे हा रेस्टॉरंटच्या गौरवाचा उच्चांक समजतात. लंडनमध्ये मला प्रसिद्ध क्ल्यारीज हॉटेलमध्ये मोठी स्वीट होती आणि मुख्य म्हणजे तिथल्या मिश्लीन रेटेड गॉर्डनरामसेच्या रेस्टॉरंटमध्ये अतिशय चविष्ट जेवण जेवायला मिळाले. तेव्हा लंडनच्या मेफेयर भागातल्या नोबू या रेस्टॉरंटलाही गेले होते. नोबू हे सुशी शेफ नोबू मात्सुहिसा आणि हॉलिवूड नट रोबर्ट डी निरो यांनी काढलेले फ्युजन पद्धतीचे जपानी खाद्यप्रकार असलेल रेस्टॉरंट. ते जेवणाबरोबर वाइन पेरिंग करत. अत्यंत उत्कृष्ट असलेले हे रेस्टॉरंट काही वर्षांनी दर्जा खालावल्याने बंद पडले. नोबू रेस्टॉरंट साउथ आफ्रिकेतल्या केप टाउनलाही आहे. तिथे जेवल्यानंतर बऱ्याच क्लायंटना मी तेही सुचवले होते. माझ्या क्लायंटना प्रवास करताना कुठे काय उत्तम खायला-प्यायला मिळतं, ही माहिती हवी असे. 

आइसलंड इथल्या नमस्कारोमधले जिओथर्मल फिल्ड. तिथले उकळते लाव्हा कुंड.

मुंबईत कसे कधीतरी सिनेसृष्टीतल्या नट-नट्यांचे दर्शन होते, तसे या उच्च हॉटेलमध्ये हॉलिवूडचे तारे बघायला मिळत. लंडनच्या डॉर्चेस्टर हॉटेलमध्ये राहत असताना जॉर्ज क्लुनी हा नट त्याच्या मैत्रिणीबरोबर दिसला. शांतपणे बारमध्ये ड्रिंक घेत बसला होता. कोणी भोवती गल्ला करत नव्हतं, ऑटोग्राफ मागत नव्हतं. तसंच मॉन्टे कार्लोच्या बुद्धा बारमध्ये नट ह्यू ग्रांट आणि कानच्या मार्टिनेझ हॉटेलमध्ये नट जेफ ब्रिजेस आरामात जेवताना दिसले. ही हॉटेल्स या प्रसिद्ध लोकांना त्यांची प्रायव्हसी देतात. या नावाजलेल्या लोकांसाठी ते महत्त्वाचं असतं.

अंटार्क्टिकाला जाताना वाटेतील जॉर्जिया बेटांपैकी हे सेंट अँड्र्यूज बेट. तिथे करोडोंनी किंग पेंग्विन आहेत.

वैयक्तिक प्रवास करताना अनेक देश माझ्या कुटुंबाबरोबर पाहिले. मला लोक विचारतात, की तू इतक्या देशांत जाऊन आलीस, तर सगळ्यात जास्त काय आवडलं? क्षणाचाही विचार न करता ‘अंटार्क्टिका’ असं माझं उत्तर आहे. अंटार्क्टिका कल्पनेच्या पलीकडे सुंदर आहे. आरशासारखा पारदर्शक पॅराडाइज बे, मोठे मोठे आइसबर्ग, रुंद ग्लेशियर (हिमनद्या) आणि तिथे जाताना दिसणारे अनेक प्रकारचे पेंग्विन, व्हेल, सील आणि पक्षी. साउथ जॉर्जिया बेटावर इतके पेंग्विन होते, की त्याचं वर्णनच करता येणार नाही. 

काराकोरम, मंगोलिया. मुलांच्या घोडे शर्यती.

जगाच्या उत्तरेला आइसलंड पाहिलं, जिथे निसर्गाची दोन टोकं दिसली – बर्फाच्या नद्या आणि लाव्हाचं उकळतं कुंड. इथे जमिनीत इतकी उष्णता आहे, की ती वापरून वीज तयार करतात. पॅसिफिक महासागरातील इक्वेडोर देशाची गलापागोज बेटे अद्भुत आहेत. ती साउथ अमेरिकेच्या मुख्य खंडापासून ६३० मैल दूर आहेत. मनुष्य वस्तीपासून इतकी दूर असल्यानं तिथल्या पक्ष्यांना माणसाची भीती माहिती नाही. त्यांची घरटी जमिनीवर असतात. इथे फारशी झाडंही नाहीत. बऱ्याच पक्ष्यांना उंच उडता येत नाही. डार्विनला त्याची ‘थियरी ऑफ इव्हॉल्युशन’ (उत्क्रांतिवादाचा सिद्धांत) या बेटांवर सुचली. 

नादम उत्सवाच्या वेळी आर्चरी स्पर्धा.

मंगोलियाच्या प्रवासाचा अनुभव आगळाच होता. गोबी वाळवंटामध्ये बऱ्याच जागी तंबूमध्ये राहिलो. दर वर्षी जूनमधे तिथे नादम नावाचा उत्सव असतो. तेव्हा देशभरची लोकं धनुर्विद्या, कुस्ती आणि घोड्यांच्या शर्यतीत भाग घेतात. अगदी लहानगी मुलंसुद्धा काय बेफाम घोडा चालवतात! उल्लनबातरमध्ये मोठ्या प्रमाणात या शर्यती होतात. तसेच काराकोरम या सिल्क रूटवरील गावी हा सोहळा लहान प्रमाणात, परंतु जास्त मनोरंजक असतो.

टर्की देशातील कापडोच्चिया येथील हॉट एअर बलून राइड.

मी आत्तापर्यंत दोनदा हॉट एअर बलूनमध्ये बसले आहे. पहिला अनुभव केनियाच्या मसाईमाराला घेतला. पहाटे सूर्योदयाच्या आधी बलूनमध्ये बसून सोनेरी आकाशात हळूहळू सूर्य वर येताना फार सुरेख दिसतो. खाली जंगलात जनावरं दिसतात. तासाभराने बलून खाली उतरतो. मग बलूनला ऊर्जा देणारी शेगडी वापरून ब्रेकफास्ट शिजवतात. टेबल टाकून त्यावर पांढराशुभ्र अभ्रा घालतात. हा अनोख्या प्रकारे शिजवलेला ब्रेकफास्ट शॅम्पेनबरोबर खायला मजा येते. दुसरी अविस्मरणीय हॉट एअर बलून राइड तुर्कस्तानात केली. तिथल्या गोरेम व्हॅलीमध्ये कापडोच्चिया नावाचे ठिकाण आहे. मंगळ किंवा चंद्रावर जसे दृश्य दिसेल, तसेच बलूनमधून खाली बघितल्यावर दिसत होते.

बर्मामधील पाडूअंग जमातीची ‘जिराफ वूमन’मियान्मारच्या (बर्मा) पाडूअंग जमातीच्या मुली पाचव्या वर्षापासून मानेभोवती पितळेच्या रिंग घालतात. एवढीशी मुलगी गळ्यात चार पौंडांची रिंग घालते आणि पुढची दहा वर्षं आणखी रिंग घालत घालत ती बावीस पौंड मानेभोवती घालून हिंडते. उंच मान हे त्या लोकांच्यात सौंदर्याचे लक्षण समजतात. हल्ली प्रवासी कुतूहल म्हणून या ‘जिराफ स्त्रियांना’ बघायला येतात. त्यामुळे त्यांना पैसे कमवायचे नवीन साधन मिळाले आहे. मी त्या रिंग हातात उचलून पाहिल्या. त्या इतक्या जड होत्या, की त्या कशा घालू शकतात, याचा अचंबा वाटला.

मी माझ्या प्रवासात कायकाय चित्रविचित्र गोष्टी पाहिल्या याची ही झलक. प्रवास करण्याची चटक लागते आणि आणखी काही नवीन अनुभवावं, असं वाटतं. ‘विश्वचि माझे घर’ अशी भावना असते. त्यामुळे आपण इतर लोकांचे विचार व संस्कृती आपल्या डोळ्यासमोरचे झापड बाजूला करून बघतो. माझ्या पर्यटनाच्या व्यवसायानं मला खूप काही दिलं. आणि मीही या व्यवसायाला माझ्या परीने परतफेड केली ही समाधानाची भावना आहे.

सरिता नेने- सरिता नेने, कॅलिफोर्निया

(लेखिका हौशी आणि अभ्यासू पर्यटक असून, अमेरिकेतील पर्यटन क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमधील दीर्घ अनुभवानंतर अलीकडेच निवृत्त झाल्या आहेत. लेखातील फोटो त्यांनी स्वतः काढलेले आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘विश्वगामिनी सरिता’ या पाक्षिक सदरातील त्यांचे लेख  https://goo.gl/TjepRF या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)


नादम उत्सवातील कुस्ती स्पर्धा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
K R Kantak About 230 Days ago
Superb info and photos.... After reading felt like..... Gather money and start.....
0
0
Vidyavilas Pathak About 231 Days ago
छान लिहिलंय. विविध देशात आलेले अनुभव ओघवत्या भाषेत मांडल्याने हे सारे प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव मिळतो. प्रत्येक देशातल्या अनुभवाचे स्वतंत्र सविस्तर लेख द्या. आम्हाला घर बसल्या वर्ल्ड टूर केल्याचा अनुभव मिळेल.
0
0
सौ.शैलजा shevade About 233 Days ago
सुंदर भाषेत अनोख्या जगाची सफर घडवून आणलीत...! मस्त...!
0
0
गीता घोटगे About 234 Days ago
तुमच्यामुळे जगाची खूप छान सफर होते.माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कळतात.त्यामुळे वाचायला मजा येते.
0
0

Select Language
Share Link