Next
अरुण म्हात्रे
BOI
Wednesday, October 25 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘...ती वेळ निराळी होती,  ही वेळ निराळी आहे...’ असे लिहिणाऱ्या कवी अरुण म्हात्रे यांचा २५ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
...............

अरुण म्हात्रे

२५ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबईत जन्मलेले अरुण म्हात्रे हे प्रामुख्याने गेय कविता लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रेमातली आर्तता, विव्हलता, अगतिकता अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या कविता हे त्यांचं वैशिष्ट्य. 

छातीवर फुले फुलण्याची
वाऱ्यावर मन झुलण्याची
ती वेळ निराळी होती
ही वेळ निराळी आहे...
डोळ्यांत ऋतूंचे पाणी
मौनात मिसळते कोणी
वाळूत स्तब्ध राहताना
लाटेने गहिवरण्याची
ती वेळ निराळी होती
ही वेळ निराळी आहे...

अशी तरल भावना मांडणारे अरुण म्हात्रे तितक्याच सहजतेने असंही सांगतात...

विसरता येत नाही असे नसतेच काही
मनाला सांदणारी नवी मिळतेच शाई!
चुकांना टाळताना किती केली हुशारी
नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही!
तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो
किती म्हटले तरीही जरा उरतेच काही!
नदीपात्रांमध्ये मी सोडल्या दीपमाळा
तरी गंगाजलातून निघे भलतेच काही!
मानतो कागदाला मानतो लेखणीला
कळे शब्दांत अंतिम असे नसतेच काही..

त्यांची कविता एक छान लय घेऊन आलेली आहे. सुंदर शब्द, सुंदर कविता, सुंदर गाणी माणसाला नेहमीच उत्तेजना देतात आणि म्हणून कविता सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि कवितेविषयी लोकांच्या मनांत आवड उत्पन्न व्हावी या हेतूने अरुण म्हात्रे यांनी आपल्या सहा कवी मित्रांसह ‘कवितांच्या गावा जावे’ या रसिल्या मैफलीचे गावोगावी जाऊन सादरीकरण करायला सुरुवात केली आणि पाहतापाहता तो कार्यक्रम लोकप्रिय झाला होता. महाराष्ट्रातल्या अगदी आडगावीसुद्धा कविता पोहोचवण्याचं श्रेय अरुण म्हात्रे यांच्याकडे जातं.

म्हात्रेंचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. कॉमर्सचे पदवीधर झाल्यावर त्यांनी अकाउंटन्सीची कामं केली. काही दिवस प्राध्यापकी केली. नाटकं दिग्दर्शित केली. संगीताचे कार्यक्रम केले. अनेक सामाजिक मोर्चांमध्ये भाग घेतला. काही आंदोलनांत कारावाससुद्धा भोगला.

‘उत्तम कवी होण्यसाठी तुम्हाला नुसतं पुस्तकं वाचून नाही चालत, तुम्हाला माणसं वाचावी लागतात, तुम्हाला समाज वाचावा लागतो,’ असं ते म्हणतात. 

त्यांना बहिणाबाई पुरस्कार, वासंती गाडगीळ पुरस्कार, स्नेहदा चषक- अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

ऋतू शहरातले, ते दिवस आता कुठे?, कोसो मैल दूर आहे चांदणी - अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(त्यांची पुस्तकं ‘बुकगंगा’वरून मिळवण्यासाठी येथे क्लिक करा). 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link