Next
चौकटीबाहेरच्या कार्यक्रमाला ‘चौकट राजा’ची दाद
प्रेस रिलीज
Friday, May 25, 2018 | 05:44 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग’, ‘आज रपट जाये तो हमे ना’, ‘सांज ये गोकुळी’, अशा गीतांसह विविध कलाकारांची मिमिक्री, ‘जिद्द हरायची नाही,’ असा संदेश देणारे छोटेसे नाटक, समूहगीते सादर करणाऱ्या मानसिक आजारांवर मात केलेल्या लोकांची जिद्द, चिकाटी बघून रूपेरी पडद्यावरील ‘चौकट राजा’ प्रभावित झालाच; पण समोर बसलेले प्रेक्षकही थक्क झाले. ‘कलाविष्कार या शब्दाचा अर्थ मला आज समजला,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या वेळी व्यक्त केली.  

जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त गुरुवारी, २४ मे रोजी परिवर्तन संस्थेतर्फे पुण्यात ‘मानसरंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला दिलीप प्रभावळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, ज्येष्ठ दिग्दर्शक, रंगकर्मी अतुल पेठे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, परिवर्तन संस्थेच्या डॉ. शैला दाभोळकर, राजू इनामदार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमित नूलकर उपस्थित होते.

प्रभावळकर म्हणाले, ‘कलाकार म्हणून मला नशिबाने चांगल्या भूमिका करायला मिळाल्या. त्यामुळे माणूस म्हणून मी समृद्ध झालो. चौकट राजा, रात्रआरंभ या चित्रपटांत मी मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीची भूमिका केली, तर ‘नातीगोती’ या नाटकात मतिमंद मुलाच्या वडिलांची भूमिका केली. या मानसिक रुग्णांच्या भूमिका साकारण्यासाठी मी मानसोपचार तज्ज्ञांना, रुग्णांना भेटलो. या भूमिकांच्या माध्यमातून ती व्यक्तिमत्त्वे मी जगलो. तो आभास होता; पण तुम्ही हे आयुष्य प्रत्यक्ष जगता आहात. परिवर्तन संस्थेचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी जगत आहेत. या कार्यकर्त्यांचे कौतुक केले पाहिजे. समाजाने मानसिक रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांना आत्मनिर्भर केले पाहिजे. ताल, लय आणि चोख पाठांतर करून त्यांनी आज केलेले सादरीकरण खरोखरच थक्क करणारे आहे.’ 

पेठे म्हणाले, ‘मनालाही दुखतं, खुपतं, भीती वाटते, अशा वेळी आपण काव्य, चित्रं, गाणी, संगीत, नृत्य अशा माध्यमांचा आधार घेतो. अभिव्यक्त होण्यासाठी सर्व जण माध्यम शोधत असतो. त्यामुळे मन:स्वास्थ चांगले राहते. प्रत्येकाचे मानसिक स्वास्थ चांगले राहिले तर समाजस्वास्थ्यही चांगले राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे नाटक, गायन हे मानसिक आजारांवर उपचारांसाठी प्रभावी माध्यम ठरू शकते. मानसिक रुग्णांना अभिव्यक्त होण्यासाठी मदत करण्याकरिता ‘मानसरंग’ प्रयत्नशील आहे. आगामी काळात मानसिक आजार हे समाजापुढील मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे मानसिक आजारांकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. वैद्यकीय उपचार, समुपदेशन मिळाल्यास मानसिक रुग्ण पुन्हा मुख्य प्रवाहात येऊन पूर्ववत जीवन जगू शकतात. हे लक्षात घेतले पाहिजे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link