Next
बहुउद्योगी, बहुभाषक, बहुधर्मीय मंगळूर
BOI
Wednesday, September 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मंगळूर
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूनंतर महत्त्वाचे असलेले आणि ‘गेट वे ऑफ कर्नाटक’ अशी ओळख असलेले शहर म्हणजे मंगळूर किंवा मेंगलोर. बहुउद्योगी, बहुभाषक, बहुधर्मीय ठिकाण अशी मंगळूरची ओळख आहे. ‘करू या देशाटन’ सदरात आज फेरफटका मंगळूरचा...
............
कर्नाटकाच्या सागरकिनाऱ्यावरील दक्षिण कन्नड हा शेवटचा जिल्हा. मंगळूर हे येथील जिल्ह्याचे ठिकाण. युरोपातील ग्रंथांमध्ये मंदेगोरा, मगनूर, मंगरौथ नित्रिअस या नावांनी या गावाचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व ३००मध्ये हा प्रदेश मगध सम्राट अशोकाच्या आधिपत्याखाली होता. इ. स. ३०० ते ६००पर्यंत येथे कदंब राजवट होती. इ. स. ७००पासून पंड्या राजवटीचा अंमल होता. याच काळातील ‘मरतुरू’ ताम्रपटात या स्थळाचा ‘मंगलपुरा’ असा उल्लेख केलेला दिसून येतो. तेराव्या शतकापर्यंत येथे आलूप वंशाची राजवट होती. इ. स. १३००मधील विजयनगरमधील काही शिलालेखांतही मंगळूरचा उल्लेख आढळतो. याच कालावधीत मंगळूरहून युरोपीय व अरब देशांबरोबर व्यापारउदीम चालत होता.

मंगळूर हे शतकानुशतके व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध असून, ते भारतातील १८व्या क्रमांकाचे बंदर आहे. मासेमारी, हातमाग, होजिअरी, कापड उद्योग, मातीची भांडी, कॉफी आणि काजू उत्पादन व व्यापार यामुळे हे बहुऔद्योगिक ठिकाण समजले जाते. भारतातील प्रसिद्ध मंगलोरी कौले याच भागात तयार होतात. येथे हिंदू, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम असे विविध धर्मांचे लोक राहतात. तुळू, कानडी, मल्याळी, कोकणी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा येथे बोलल्या जातात. तसेच येथील ९६ टक्के लोक साक्षर आहेत.मंगळूर : नेत्रावती आणी गुरुपुरा नदीच्या संगमावर वसलेले हे ऐतिहासिक ठिकाण आहे. पहिल्या शतकात रोमन प्रवाशाने त्याच्या डायरीत नित्रिअसया अशा नावाने या ठिकाणाचा उल्लेख केला आहे. इ. स. १२००मध्ये मोरोक्कोचा प्रवासी बट्टुता (Battuta), इ. स. १४४८मध्ये अब्दुररझ्झाक (इराणचा राजदूत), इ. स. १५१४मध्ये दुआ बार्बोसा (पोर्तुगीज प्रवासी) असे अनेक प्रवासी येथे येऊन गेले. त्यांनी या गावाचे वर्णन करून ठेवले आहे. मसाल्याच्या पदार्थांमुळे भारताची दक्षिण किनारपट्टी जगाशी जोडली गेलेली होती. त्यामुळे हे शहर त्या काळची जणू मुंबईच होती. व्यापार-उद्योग यामुळे शहर भरभराटीला आले होते. सांस्कृतिकदृष्ट्याही हे ठिकाण नावाजलेले होते. इ. स. १५०५मधे विजयनगरच्या राजाने पोर्तुगीजांना येथे किल्ला बांधण्यास परवानगी दिली आणि परकीयांचा येथे शिरकाव झाला. १५२६मध्ये हे शहर पोर्तुगीजांनी घेतले व त्यांनीच १५४७मध्ये नष्ट करून टाकले. १५५५ मध्ये शहराची पुनर्रचना करण्यात आली व त्यानंतर पुन्हा ते जाळण्यात आले.

उल्लाल बीच

बिदनूरच्या नायकांनी १६७०मध्ये पोर्तुगीजांना मंगलोरमध्ये वखार उभारण्यास परवानगी दिली. अरबी व्यापाऱ्यांना मंगलोरमध्ये व्यापार करण्यास बंधने घातल्याने १६९५मध्ये अरबांनी मंगलोर जाळून टाकले. अशा प्रकारे अनेक संकटे या गावावर येत राहिली. हैदर अलीने १७६३मध्ये मंगलोर जिंकले व दारूगोळ्याचा कारखाना काढला. ते १७६८मध्ये ब्रिटिशांच्या, १७९४मध्ये टिपूच्या आणि अखेर १७९९मध्ये परत ब्रिटिशांच्या ताब्यात आले ते १९४७ पर्यंत. मग मात्र येथे स्थिरता आली.

कॉर्पोरेशन बँक, कॅनरा बँक, विजया बँक या राष्ट्रीयीकृत बँका येथे स्थापन झाल्या. मंगळूरमध्ये स्टील, मँगनीज, पेट्रोल रिफायनरी हे उद्योग आहेत. प्रामुख्याने मासे, मसाले, लाकूड, खाद्यतेल व काजू यांचा व्यापार येथून चालतो. आता येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी (आयटी पार्क) संबंधित अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. तसेच शैक्षणिक व संस्कृतिक केंद्र म्हणूनही ते प्रसिद्ध आहे.

मंगलादेवी मंदिरमंगलादेवी मंदिर :
अलूपा राजवंशातील राजकन्या मंगला हिच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारले गेले. त्यावरूनच मंगलोर हे नाव पडले. केरळी पद्धतीचे हे मंदिर नवव्या शतकात बांधले आहे.


गोकर्णनाथ मंदिरकुडरोली : येथील श्री गोकर्णनाथ मंदिर १०६ वर्षांपूर्वी होईगे कोरगप्पा यांनी बांधलेले आहे. हे लोकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
सेंट पॉल चर्च : नेहरू मैदानाजवळ रेव्हरंड आल्फ्रेड फॅनेल यांनी हे गॅरिसन चर्च १८४३मध्ये बांधले. आर्चबिशप स्पेन्सर मंगलोर येथे येण्यापूर्वी हे चर्च पूर्ण झाले.

रोझरी कॅथेड्रलरोझरी कॅथेड्रल : अवर चर्च ऑफ लेडी रोझरी हे मूळचे पोर्तुगीजांनी इ. स. १५६८मध्ये बांधलेले चर्च आहे. स्थानिक कथेनुसार, समुद्रात मच्छिमारांना त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेली व्हर्जिन मेरीची प्रतिमा सापडली. हीच प्रतिमा चर्चमध्ये स्थापित करण्यात आली. इटालियन प्रवासी पिएत्रो डेला यांनी १६२३मध्ये मंगलोरला भेट दिली, तेव्हा त्याचा उल्लेख करण्यात आला होता. 

सेंट ऍलॉयसियस चॅपल :सेंट ऍलॉयसियस चॅपल :
१८८०मध्ये जेसुइट मिशनऱ्यांनी हे चर्च मंगलोरियन कॅथलिक समुदायासाठी बांधले. इटालियन जेसुइट अँटोनियो मोस्झेनी यांनी १८९५मध्ये यात पेंटिंग्ज काढली आहेत. इटालियन जेसुइटनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

सुलतान बॅटरीसुलतान बॅटरी :
बोलूर भागात सम्राट टिपू सुलतानाच्या काळात इ. स. १७८४मध्ये हा निरीक्षण मनोरा बांधण्यात आला. मंगलोरियन कॅथलिक आणि इतर बऱ्याच ख्रिश्चनांची २३ चर्चेस तोडून त्याच्या दगडातून हा टॉवर टिपूने उभारला. या वेळी बऱ्याच ख्रिश्चनांना टिपूने १५ वर्षे बंदिवान केले होते. युरोपियन आक्रमण रोखणे हा या टॉवरचा उद्देश होता. येथे तोफा ठेवण्याची व्यवस्था असावी. तसेच खाली भुयारी कोठी असून, त्यात दारूगोळा साठविण्याची व्यवस्था होती. सध्या हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कारण येथून समुद्रकिनाऱ्याचा सुंदर देखावा दिसतो.

मंजुनाथेश्वर मंदिरमंजुनाथेश्वर मंदिर : कादरीच्या टेकड्यांवर मंजुनाथेश्वराचे सुंदर आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे दहाव्या किंवा अकराव्या शतकादरम्यान बांधले गेले असावे, असे म्हणतात. इ. स. १४००मध्ये त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि ते संपूर्ण दगडामध्ये बांधण्यात आले. मंदिरातील भगवान मंजुनाथस्वामींची कास्य मूर्ती दक्षिण भारतीय मंदिरांपैकी सर्वांत प्राचीन समजली जाते. असे मानले जाते, की श्री परशुराम येथे श्री शंकराची आराधना करण्यासाठी येऊन राहिले होते आणि श्री शंकराने पार्वतीसह मंजुनाथाच्या रूपात त्यांना दर्शन दिले. श्री परशुरामाने आपली सर्व शस्त्रे येथे टाकून दिली. टेकडीवर काही गुंफा आहेत. त्यांना पांडव गुंफा म्हणून ओळखले जाते. जवळच श्री शरावू महागणपती मंदिर आहे.

बेजाई संग्रहालयश्रीमंती बाई मेमोरियल म्युझियम (बेजाई संग्रहालय) : कर्नल व्ही. आर. मिरजकर यांनी हे संग्रहालय उभे केले. पुरातन नाणी, दुसऱ्या शतकातील शिल्पे हे येथील वैशिष्ट्य. मिरजकरांच्या आईचे नाव या संग्रहालयाला देण्यात आले आहे. हे संग्रहालय पुरातत्त्व खात्याकडे १९६०मध्ये हस्तांतरित करण्यात आले. येथील श्री भैरव व हनुमानाची काष्ठशिल्पे बघण्यासारखी आहेत. तसेच, इ. स. १३००पासूनची अनेक पुरातन शिल्पे, ब्राँझमधील घंटा, पेंटिंग्ज, हस्तलिखिते येथे पाहण्यास मिळतात. संग्रहालय मंगळवारी व चौथ्या शनिवारी बंद असते.

लाइटहाउस हिल गार्डनलाइटहाउस हिल गार्डन : हैदरअलीने हे लाइटहाइस बांधले. येथे उद्यान असून, येथून समुद्राचे विलोभनीय दृश्य दिसते.

मंगलोर टाइल्समंगलोर टाइल्स : मंगलोर शहरात उत्पादित होणारी कौले आशियात प्रसिद्ध आहेत. पूर्वी बंगल्याला मंगलोरी कौले हमखास असायची. १८६०मध्ये एका जर्मन उद्योजकाने येथे त्याचे उत्पादन सुरू केले. नेत्रावती नदीच्या काठावर असलेल्या चिकणमातीपासून ही कौले बनविली जातात. साधारण किनारपट्टीवर जेथे पाऊस पडतो, तेथे मंगलोरी कौले वापरली जातात.

मंगळूरच्या आसपास :


जमालबाद किल्लाजमालबाद किल्ला : हा किल्ला टिपू सुलतानाने १७९४मध्ये बांधला. ग्रॅनाइटच्या डोंगरावर १७८८ फूट उंचीवर हा किल्ला असून, त्याला नरसिंह गुडे म्हणून ओळखले जाते. अतिशय दुर्गम किल्ला म्हणून तो ओळखला जात असे. बालेकिल्ल्यावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत. टिपूने त्याची आई जमालबाई हिचे किल्ल्याला नाव दिले. ‘जमालगड्डा’ असेही स्थानिक लोक म्हणतात. हा किल्ला मंगलोरपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे.

श्री राजराजेश्वरी मंदिरपोलाली : येथे श्री राजराजेश्वरी मंदिर असून, इ. स. ८००मध्ये राजा सुरथाने हे मंदिर उभारले. श्री राजराजेश्वराची मूर्ती पूर्णपणे औषधी गुणधर्म असलेल्या चिकणमातीपासून तयार करण्यात आली आहे. मूर्तीची उंची १० फूट आहे. छत देवतांच्या लाकडी कोरीव काम केलेल्या मूर्ती आणि तांब्याच्या पट्ट्यांसह सुशोभित केलेले आहे. पोलाली चेडू हा एक महत्त्वाचा उत्सव असून, त्या वेळी फुटबॉल खेळाचे आयोजन केले जाते.


बेंद्रू तीर्थबेंद्रू तीर्थ : येथे नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड आहे. पाण्याचे तापमान ९९ फॅरनहाइट ते १०६ फॅरनहाइट एवढे असते. यात सल्फरचे प्रमाण जास्त आहे. त्वचारोगावर ते उपयुक्त असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. येथे कण्व मुनी आले होते व या ठिकाणाला त्यांनी गोपाळतीर्थ असे नाव दिले, असे स्थानिक लोक सांगतात. हे सहलीचे एक निसर्गरम्य ठिकाण आहे.

कुके श्री सुब्रह्मण्यम मंदिर

कुके श्री सुब्रह्मण्यम मंदिर : पश्चिम घाटातील पर्वतराजीच्या निसर्गाच्या सौंदर्याने नटलेलं हे रम्य धार्मिक ठिकाण आहे. कुके सुब्रमण्यम म्हणजे नागांचे निवासस्थान. येथे भगवान सुब्रह्मण्यम सर्परूपात आहेत, अशी श्रद्धा आहे.

उपिनांगुडू : नेत्रावती आणि कुमारधारा या नद्यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण दक्षिण काशी किंवा गायपद क्षेत्र या नावाने ओळखले जाते. कर्नाटकातील हे दुसरे संगमक्षेत्र आहे. येथील रेड्यांची शर्यत प्रसिद्ध आहे.

उल्लाल बीचउल्लाल बीच : सोमयेश्वर मंदिर, राणी अब्बाक्का किल्ला, सय्यद मदानी दर्गा इत्यादी ऐतिहासिक स्थानांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे, मंगलोरपासून १५ किलोमीटरवर आहे.


मुडबिद्री
मुडबिद्री : हे जैन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे १८ जैन मंदिरे आहेत, १८ तलाव आहेत, १८ जैन बासडी (मठ) आणि १८ रस्ते आहेत. त्यापैकी एकाच रस्त्यावर १० मंदिरे आहेत. त्याला जैन मंदिर पथ असे नाव आहे. पार्श्वनाथ मंदिर हे सर्वांत जुने मंदिर समजले जाते. सहस्रखांबी मंदिरातील खांब नक्षीदार शिल्पकलेने भरलेले आहेत. हे ठिकाण मंगळूरपासून ३४ किलोमीटर अंतरावर आहे.

करिनजेकरिनजे : हे उंच डोंगरावर असलेले एक निसर्गरम्य ठिकाण असून, येथे श्री करंजेश्वराचे मंदिर आहे. रात्रीच्या वेळी डोंगरावरून खालील भागात दिसणाऱ्या दिसणारे दिव्यांमुळे जमिनीवर तारांगणच पडलेले आहे, असे वाटते. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी उत्तम असलेले हे ठिकाण मंगलोरपासून ३५ किलोमीटरवर आहे.

कातिल दुर्गाकातिल दुर्गा : नंदिनी नदीच्या काठावर वसलेले आणि आकर्षक वनराईने वेढलेले हे निसर्गरम्य ठिकाण दुर्गा परमेश्वरीचे मंदिर असल्यामुळे तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. सुवर्णरथ हे येथील आकर्षण आहे. मंगलोर शहरापासून ते २९ किलोमीटरवर आहे.

बीरामल हिलबीरामल हिल  : बीरामल हिल हे पुत्तूरचे एक आकर्षक पर्यटनस्थळ आहे. समुद्रसपाटीपासून ते सुमारे एक हजार फूट उंच आहे. येथे श्री विश्वकर्माचे मंदिर, एक खुले प्रेक्षागृह आणि एक सार्वजनिक ग्रंथालय आहे.


धर्मस्थळ : पूर्वी या गावाचे नाव कुडुमा असे होते. दक्षिण भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. ८०० वर्षांपूर्वी नेत्रावती नदीच्या काठावर भीमण्णा हेगडे (परगडे) यांनी हे मंदिर उभारले. त्यासाठी मंगळूरजवळील कादरी येथून भगवान मंजुनाथेश्वराची मूर्ती आणण्यात आली. २०० वर्षांनंतर सोळाव्या शतकात श्री देवराज हेगडे यांनी उडुपीच्या श्री वदिराजा स्वामी यांना तीर्थक्षेत्रास भेट देण्यास सांगितले. स्वामीजी आनंदाने आले. परंतु त्यांनी भिक्षा स्वीकारण्यास नकार दिला. कारण भगवान मंजुनाथची मूर्ती वैदिक अनुष्ठानानुसार पवित्र केली गेली नव्हती. त्यानंतर श्री हेगडे यांनी स्वामीजींना शिवलिंगाची पुनर्स्थापना करण्याची विनंती केली. विधिवत पूजा पार पडल्यानंतर स्वामींनी या ठिकाणाला धर्मस्थळ हे नाव दिले व तेच नाव रूढ झाले.

धर्मस्थळमंदिराचे व्यवस्थापन जैन करतात, तर पूजाविधी हिंदू करतात धार्मिक सलोख्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मंदिरामध्ये कन्याकुमारी, कालारकाय, कालराहू आणि कुमारस्वामी यांच्या मूर्ती आहेत. मंदिरात पार्वती व महागणपतीचीही स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे आतील काम लाकडी कलाकुसरीने मढविलेले आहे. मंदिर व्यवस्थापनामार्फत अनेक संस्कृतिक कार्यक्रम चालविले जातात. सर्व धर्म संमेलने (बहु-धार्मिक बैठक) आयोजित केली जातात. श्री मंजुनाथेश्वर सांस्कृतिक आणि संशोधन केंद्रामार्फत यक्षगान नाटिका, नृत्यगायन या कार्यक्रमांबरोबरच ‘मंजुष म्युझियम’ चालवले जाते. त्यामध्ये प्राचीन वस्तू, हस्तलिखिते, पेंटिंग्स जतन करून ठेवण्यात आली आहेत. व्हिंटेज कारही ठेवण्यात आल्या आहेत. येणाऱ्या भक्तांसाठी भोजनालय चालविले जाते. तसेच आधुनिक सोयींनी युक्त निवासव्यवस्थाही आहे. यंत्राद्वारे चपात्या लाटल्या जातात. १० हजार जण प्रसाद ग्रहण करतात.

मंजुनाथ मंदिराच्या जवळच सन १९७३मध्ये एका टेकडीवर ३९ फूट उंचीची बाहुबलीची मूर्ती उभारण्यात आली आहे. मंजुनाथ मंदिरापासून तीन किलोमीटरवर श्रीराम मंदिर उभारण्यात आले आहे. नेत्रावतीच्या काठावर पर्वताच्या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे. श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या  संगमरवरी मूर्ती येथे आहेत.

मंगळूर जल, हवाई, रस्ते व रेल्वेमार्गाने संपूर्ण भारताशी जोडलेले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू येथून थेट रेल्वे व विमानसेवा आहे. येथे जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा असतो. राहण्याची, जेवणाची उत्तम सोय येथे होऊ शकते.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

मुडबिद्री

( बहुधर्मीय मंगळूरची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deepak Ghawali About 269 Days ago
खुप छान माहीती
0
0
Sameer About 275 Days ago
मस्त
0
0
जयश्री चारेकर About 277 Days ago
अप्रतिम माहिती 👌
2
0

Select Language
Share Link
 
Search