Next
शिक्षण क्षेत्राचा आरसा असलेल्या कथा
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, April 03, 2018 | 04:49 PM
15 0 0
Share this story

अनेक वर्षं शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकी करताना आलेल्या अनुभवांनी, प्रत्यक्ष भेटलेल्या माणसांनी, ऐकलेल्या गोष्टींनी आणि किश्श्यांनी प्रा. नंदकुमार शिंदे यांना कुठेतरी अस्वस्थ केलं आणि त्यांच्यातल्या संवेदनशील लेखकाने उचल खाल्ली. परिणामस्वरूप २६ लघुकथांचा ‘सायकल चोर’ हा संग्रह आपल्यासमोर आला आहे. यातल्या कथा रंजक तर आहेतच; पण परिस्थितीचं यथास्थित भान देणाऱ्या आहेत. विद्यार्थी-शिक्षक-शैक्षणिक संस्था आणि समाज यांच्या परस्परसंबंधांवर आधारलेल्या यातल्या लघुकथा वाचकाला गुंतवून ठेवण्याबरोबरच विचार करायलाही भाग पाडतात... त्या पुस्तकाचा हा परिचय...
..............
प्रा. नंदकुमार शिंदे यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाच्या ‘सायकल चोर’ या शीर्षककथेत एक माजी विद्यार्थी, बबन नावाच्या शाळेच्या शिपायाची चौकशी करत शाळेत येतो. त्याची भली मोठी पांढरी शुभ्र कार आणि त्याचा डामडौल पाहून तो कुणी बडी असामी वाटल्याने सर्वांची झालेली धावपळ मजा आणते. तशात तो शाळेतल्या यच्चयावत सर्व पाचशे विद्यार्थ्यांसाठी मुंबईहून सायकली भेट म्हणून पाठवून देणार म्हणून सांगून निघून जातो. आणि शेवटी उलगडा होतो, की लहानपणी सायकल चोरीचा खोटा आळ आणून त्याला मानहानी सहन करावी लागलेली असते आणि त्या वेळी त्याची बाजू घेतल्यामुळे बबन शिपायाला नोकरी गमवावी लागली असते. हा अकस्मात शेवट आपल्याला स्पर्शून जातो.

एकसष्टी, गौरव समारंभ, रौप्यमहोत्सव यांसारख्या कथांमधून शिक्षण संस्थामधल्या वरिष्ठांचे सत्कार समारंभ, त्या निमित्ताने होणारी धावपळ, हारतुरे, स्टेजची व्यवस्था यांवर होणारा खर्च, आणि सत्कारमूर्तीचं खरंखुरं अंतरंग आणि चेहऱ्यामागचा चेहरा यांसंबंधी भाष्य केलं गेलंय. त्या सर्व प्रसंगांचं वर्णन करताना प्रा. शिंदे यांच्या निरीक्षणशक्तीने टिपलेले बारीकसारीक तपशील वाचण्यासारखेच!

सूत्रसंचालन, आठवण, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, परीक्षा, स्थलांतर, शेवटचा दिस, या कथांमधून कॉलेजजीवनातले गॅदरिंग, कार्यक्रमावेळचा उत्साह, जोशपूर्ण वातावरण, प्रोजेक्टच्या वेळचं टेन्शन, परीक्षेच्या वेळची गडबड, वर्गातला कुणी लाडका अचानक अपघातात गेल्यावरचं दु:खी वातावरण, कॉलेजची निरनिराळी फंक्शन्स, वेगवेगळे डेज, कॉलेज सोडून जाताना मनात उठणारे भावनिक कल्लोळ, अशा विविध भावभावनांवर आधारित लघुकथा आहेत. 

मॅडम, लग्न यांसारख्या कथांमध्ये कॉलेजातच ठरलेली लग्नं, त्याच्यावरची चर्चा, कुजबुज, टोमणे आणि एकूण वातावरण यांचं चित्रण आहे. 

निवड, निवृत्ती, शिकवणं आणि शेती करणं, पुनर्भेट यांसारख्या कथांमधून शैक्षणिक काम करताना क्वचित करावी लागणारी तडजोड, माणसांमाणसांतले नातेसंबंध यावर भाष्य आहे.

भांडण, नादखुळा, भेट, धडा, चंद्र यांसारख्या उर्वरित कथांमधूनही कॉलेजविश्व, प्रध्यापकांना येणारे विद्यार्थ्यांचे, नातेवाईकांचे अनुभव, वाईट अनुभवांतून सावरून पुढे जाणं अशा प्रकारचं लेखन आपल्यासमोर येतं. 

शिक्षण क्षेत्र, विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याभोवती फिरणाऱ्या लघुकथांचा हा संग्रह वाचनीय आहे. 

पुस्तक : सायकल चोर 
लेखक : प्रा. नंदकुमार शिंदे    
प्रकाशक : ज्ञानार्णव प्रकाशन, पिंपरी, पुणे ४११०१७    
संपर्क : ७७४४० ०९०१६    
पृष्ठे : १५४   
मूल्य : १५० ₹ 

(‘सायकल चोर’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link