Next
रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरण राज्यात प्रथम
BOI
Tuesday, December 18, 2018 | 10:54 AM
15 0 0
Share this story



रत्नागिरी : ‘विधी अधिकारविषयक जनजागृती व प्रभावी विधी सेवा पुरविल्याबद्दल महाराष्ट्रातून रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरण राज्यात अव्वल ठरले आहे. प्राधिकरणाचे सातत्यपूर्ण काम आणि लोकांचा सक्रीय सहभाग यामुळेच या प्राधिकरणाची महाराष्ट्रातून निवड झाली,’ अशा भावना वरिष्ठ न्यायाधिश तथा रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. एम. सामंत यांनी नवी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.

उत्तम विधी सेवा पुरविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एन. जोशी आणि प्राधिकरणाचे सचिव सामंत यांना केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते १७ डिसेंबर २०१८ रोजी सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेदरम्यान सामंत बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी जोशी आणि सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अधिक माहिती देताना सामंत म्हणाले, ‘देशभरातील विविध विधी सेवा प्राधिकरणांच्या कामांमध्ये निकोप स्पर्धा ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वच विधी सेवा प्राधिकरणांच्या स्पर्धेतून रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरण सर्वोत्तम ठरले आहे. १९८७ पासून देशात विधी सेवा प्राधिकरण कायद्याअंतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे प्राधिकरणाचे अध्यक्ष, तर वरिष्ठ जिल्हा न्यायाधीश हे सचिव असतात. रत्नागिरीचे तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरणाने शालेय विद्यार्थी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, वकील यांच्यासाठी विविध कार्यक्रम राबवून कायदेविषयक अधिकार व त्याचा प्रभावी वापर याबाबत जनजागृती केली व प्रभावीपणे विधी सेवा पुरविल्या. मुख्यत्वे लहान मुलांच्या लैंगीक शोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील ४१ शाळांमध्ये ‘बालक सुरक्षा संवाद’ कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सहा हजार ९०० विद्यार्थी, ७३५ पालक आणि ८८ शिक्षक सहभागी झाले होते. जिल्ह्यातील न्यायाधीश आणि कायदा साथी यांनी मार्गदर्शन केले.’
 
महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हयात ‘महिला दिन सप्ताह’ साजरा करण्यात आला, ‘न्याय व्यवस्थेचे सक्षमीकरण व मानवाधिकार’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आल्या. असंघटीत क्षेत्रातातील कामगारांना शासकीय योजनांची माहिती व्हावी व योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेता यावा म्हणून विशेष जागृती कार्यक्रम राबविले. या अंतर्गत जिल्ह्यातील ५२५ असंघटीत कामगारांना माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या व जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांशी त्यांचा संपर्क करून देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.  

‘जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला कायदेविषयक माहिती पुरविण्यासाठी ‘न्याय आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हा विशेष कारागृहातील कैद्यांनाही कायदे व मानवाधिकारविषयक मार्गदर्शन, तसेच महिला कैद्यांना हस्तकलाविषयक प्रशिक्षण दिले आले. सामान्य जनतेला मोफत विधीविषयक सल्ला व माहिती पुरविण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयात ‘मुख्यद्वार कार्यालय’ सुरू करण्यात केले. या सर्व कार्याची नोंद घेऊनच रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरणाची महाराष्ट्रातील सर्वोत्तम प्राधिकरण म्हणून निवड झाली आहे,’ अशी माहिती सामंत यांनी दिली.  

महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणाचे मुख्य संरक्षक तथा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, कार्यकारी अध्यक्ष ए. एस. ओक आणि सदस्य सचिव एस. डी. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे सामंत यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link