Next
कौशल्यविकासातून समृद्धीकडे; वैशाली नाईक बनली यशस्वी फॅशन डिझायनर
प्राची गावस्कर
Tuesday, July 16, 2019 | 11:30 AM
15 0 0
Share this article:

पुणे : जागतिक युवा कौशल्य दिन आणि राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेचा चौथा वर्धापनदिन १५ जुलै २०१९ रोजी साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ देशातील खूप जणांनी घेतला आहे. पुण्यातील वैशाली नाईक या तरुणीनेदेखील या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याला नवा आकार दिला आहे. वैशाली आज उत्तम फॅशन डिझायनर म्हणून काम करत असून, महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमवत आहे. आणखी काही मुलींना ती शिकवते आहे.

वैशाली नाईक ही सांगवी भागात राहणारी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. ‘बीए’पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर तिने नोकरी शोधायला सुरुवात केली; पण चांगली नोकरी मिळत नव्हती. वैशालीला फॅशन डिझायनिंगची आवड होती; पण त्यासाठी लागणारा खर्च करण्याची तिच्या घरच्यांची तयारी  नव्हती.  त्याच वेळी तिला ‘यशस्वी’ संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास योजनेची माहिती मिळाली. अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची संधी तिच्याकडे विनामूल्य चालून आली होती.

वैशाली नाईकसरकारच्या योजनेद्वारे वैशालीने आपल्या स्वप्नपूर्तीची वाट चोखाळायला सुरुवात केली. २०१६मध्ये तिने हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. या अभ्यासक्रमात तिला शिलाई यंत्राचे सुटे भाग कोणते, ते यंत्र बिघडल्यावर दुरुस्त कसे करायचे इथपासून ते फॅशन डिझायनिंगमधील सर्व बाबी अथपासून इतिपर्यंत शिकायला मिळाल्या. वैशालीने यातून स्वतःची कौशल्ये वृद्धिंगत केली. सरकारने कौशल्यांचे महत्त्व ओळखून युवा पिढीला दिलेल्या या संधीचे वैशालीने सोने केले.

हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तिने घरातूनच आपले काम सुरू केले. सुरुवातीला एका नामांकित संस्थेबरोबर काम केले. हळूहळू काम वाढू लागले. आजच्या काळात मार्केटिंगसाठी परवलीचा शब्द बनलेल्या समाजमाध्यमांचाही तिने उत्तम वापर करून घेतला. आपल्या व्यवसायाची तिने चांगली जाहिरात केली. हळूहळू एक उत्तम फॅशन डिझायनर म्हणून तिची ओळख निर्माण झाली.

कामाचा व्याप वाढवल्यावर तिने आणखी काही मुलींना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आज महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमाई करणाऱ्या वैशालीचे आयुष्यच पालटून गेले आहे. घरी-दारी तिचे कौतुक होते. तिच्या कामाची प्रशंसा होते. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने तिचा आत्मविश्वासही वाढला आहे. समाजात एक नवी ओळख निर्माण झाली आहे. कुटुंबाचा आर्थिक भार ती पेलू शकत आहे. याचा तिला आनंद आणि अभिमान वाटतो.

‘हे सगळे कौशल्य विकास मोहिमेमुळे शक्य झाले. त्यामुळे या योजनेचा लाभ प्रत्येक मुलीने घ्यावा,’ असे वैशालीला वाटते. ती स्वतःही अनेक मुलींना याची माहिती देते. ‘कौशल्य विकासाची संधी मिळाली, तर अनेक जण स्वतःबरोबर इतर चार जणांना काम देऊ शकतात. आत्मविश्वासाने समाजात वावरू शकतात. विशेषतः मुलींसाठी ही बाब खूप महत्त्वाची आहे,’ असे वैशालीला वाटते. आपल्या कर्तबगारीने तिने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

कौशल्य विकास योजनेतून २०२२पर्यंत ४० कोटींहून अधिक लोकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. वैशालीसारखी उदाहरणे त्यातून घडली, तर ती योजना नक्कीच मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरेल.

(वैशालीचे मनोगत आणि तिच्या उद्योगाबद्दलचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search