Next
‘गुढीपाडवा जल्लोषात साजरा करणार’
प्रेस रिलीज
Tuesday, April 02, 2019 | 05:33 PM
15 0 0
Share this article:

वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणारा सण म्हणजे गुढीपाडवा. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या खास सणाच्या स्वागतासाठी नेहमी शूटिंगमध्ये व्यस्त असलेली कलाकार मंडळी सज्ज झाली आहेत. ‘स्टार प्रवाह’वरील विविध लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत प्रेक्षकांना खास आठवणी सांगितल्या आहेत.
...................................................................................................................................................

‘साथ दे तू मला’ मालिकेतील प्रिया मराठे म्हणाली, ‘मी पक्की ठाणेकर आहे. त्यामुळे लहानपणापासून ठाण्यात साजरा होणारा गुढीपाडवा पाहात आलेय. पहाटे निघणाऱ्या शोभायात्रा, भल्यामोठ्या रांगोळ्या, दिव्यांची आरास आणि दिमाखात झळकणारी गुढी या साऱ्या गोष्टी कायम स्मरणात रहाणाऱ्या आहेत. यंदाचा गुढीपाडवा यासाठी स्पेशल आहे, कारण गेल्याच वर्षी मीरारोडमध्ये बॉम्बे फ्राइज या आमच्या हॉटेलची सुरुवात झाली. यंदा एका खास मराठमोळ्या गोड मेन्यूसह आम्ही हॉटेलमध्ये गुढी उभारणार आहोत. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा मी आणि शंतनू जल्लोषात साजरा करणार आहोत.’

‘साथ दे तू मला’मधील आशुतोष कुलकर्णी म्हणाला, ‘मी मुळचा पुण्याचा असल्यामुळे गुढीपाडव्याची विशेष आठवण आहे. माझ्या जुन्या घराला बाल्कनी नसल्यामुळे गुढी उभारताना फार कसरत करावी लागे. त्यामुळे नवे घर घेताना आवर्जून मी बाल्कनी असणारे घर घेतले आणि तेव्हापासून जल्लोषात गुढी उभारली जाते. मला लहानपणी गुढीला घातल्या जाणाऱ्या बत्ताश्यांच्या माळा खायला फार आवडायच्या. आता डाएटमुळे शक्य होत नाही; पण शूटिंग नसेल, तर आवर्जून मी पुण्याला जाऊन आई-बाबांसोबत उत्साहात हा सण साजरा करतो.’

‘छत्रीवाली’मधील संकेत पाठक म्हणाला, ‘गेली अनेक वर्षे मी शूटिंगच्या निमित्ताने मुंबईत असल्यामुळे सेटवरच गुढीपाडवा साजरा करतोय. मी नाशिकचा असल्यामुळे माझ्या घरी दर वर्षी गुढी उभारली जाते. लहानपणी मी माझी वेगळी छोटी गुढी उभारायचो. त्या छोट्या गुढीचे छोटे दागिने, छोटी साडी हे साकारताना खूप मजा यायची. गुढीपाडव्याला आमच्याकडे गुळ-पोळीचा खास बेत असतो. आईच्या हातचा हा खास पदार्थ मी खूप मिस करतो.’

‘मोलकरीण बाई’ मालिकेतील भार्गवी चिरमुले म्हणाली, ‘माझी बहिण चैत्रालीचा गुढीपाडव्याला तिथीनुसार वाढदिवस असतो. त्यामुळे आमच्या घरात डबल सेलिब्रेशन असते. गुढी उभारण्याची धावपळ आणि सोबतीला वाढदिवसाचे सेलिब्रेशन अशी धमाल दर वर्षी आमच्या घरी असते. खास बात म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापासून आमच्या घरी आंबा खायला सुरुवात होते. आमरस-पुरीचा खास बेत या दिवशी असतो. साडी नेसून अगदी पारंपरिक पद्धतीने आम्ही यादिवशी सहकुटुंब गुढीची पूजा करतो. त्यामुळे या दिवसाची खूप खास आठवण आहे माझी.’

‘ललित २०५’मधील गौरव घाटणेकर म्हणाला, ‘गुढीपाडव्याची खास आठवण सांगायची, तर मी ‘स्टार प्रवाह’सोबत उपस्थित असलेली गिरगावची भव्यदिव्य शोभायात्रा. ढोल-ताश्यांचा गजर, पारंपरिक वेशभुषेमध्ये सामील झालेले हजारो लोक हे संपूर्ण वातावरणच खूप भारावून टाकणारे होते. माझ्या आयुष्यातली ही एक अविस्मरणीय आठवण आहे. यंदा मी आणि माझी पत्नी श्रुती पहिला पाडवा साजरा करणार आहोत. गेल्यावर्षी शूटिंगमुळे गुढीपाडवा एकत्र साजरा करणे जमले नाही. यंदा मात्र आधीच प्लॅनिंग करून ठेवले आहे. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा स्पेशल असणार आहे. शिवाय ‘स्टार प्रवाह’वरच्या ‘ललित २०५’मध्येही गुढीपाडव्याचे खास सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search