Next
कोंडगावात रंगले ‘आनंदाचे रंग’
BOI
Tuesday, March 27, 2018 | 05:00 PM
15 0 0
Share this article:साखरपा : नोकरी-व्यवसायासाठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला, तरी आपल्या मूळ गावाशी त्याची नाळ जुळलेली असते. म्हणूनच कारणपरत्वे तो पुन्हा आपल्या गावी जात असतो आणि आपल्या गोतावळ्यातील माणसांच्या भेटीगाठी घेत असतो. गावागावांत होणारे उत्सव म्हणजे तर अशा भेटीगाठींसाठी चांगले निमित्तच. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-कोंडगाव येथील श्रीराम देवस्थानात नुकत्याच झालेल्या रामनवमी उत्सवानिमित्तही असेच गेट-टुगेदर झाले. त्यात या मंडळींनी गावकऱ्यांना एक अनोखी भेट दिली.

या देवस्थानाने प्रति वर्षीप्रमाणेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत श्रीराम जन्मोत्सव सोहळा आयोजित केला होता. यंदा या सोहळ्यात ग्रामस्थांना ‘आनंदाचे रंग’ अनुभवायला मिळाले. आनंदगंधर्व आनंद भाटे यांच्या ‘आनंदाचे रंग’ या गायनाच्या कार्यक्रमाचा योग गावापासून लांब गेलेल्या, पण या निमित्ताने एकत्र आलेल्या मंडळींनी जुळवून आणला. कोंडगावचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संवादिनीवादक अजय जोगळेकर यांनी आनंद भाटे यांना साथसंगत केली.

देवस्थानचे अध्यक्ष अमित केतकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘१९८० ते १९९०-९२च्या दरम्यान शाळा-कॉलेजमध्ये असताना केतकर, जोगळेकर, रेमणे, फडके, अभ्यंकर, गद्रे, हळबे, कबनुरकर, पोंक्षे, केळकर असे सुमारे ४० जण एकत्र होतो. त्यानंतर पुढील शिक्षण, व्यवसाय, नोकरी यांमुळे काहीजण  वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यानंतर कुणाशीही फारसा संपर्क नव्हता. कोणीतरी कधीतरी चुकून भेटे; मात्र व्हॉट्सअॅपवर ‘साखरपेकर्स’ नावाचा ग्रुप करून गेल्या काही वर्षांपासून आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो. याच ग्रुपवर सुषमा हळबे (स्मिता देसाई) यांनी रामनवमीला गावात एक कार्यक्रम करण्याची संकल्पना साधारण तीन-चार महिन्यांपूर्वी मांडली. हा विषय देवस्थानचा अध्यक्ष या नात्याने मी देवस्थानच्या मीटिंगमध्ये विश्वस्त आणि स्थानिक संचालकांसमोर मांडला. त्याला होकार मिळाला आणि आनंद भाटे यांच्यासारख्या मोठ्या गायकाचा छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.’

सुषमा हळबे म्हणाल्या, ‘सहज म्हणून मांडलेल्या संकल्पनेला ग्रुपमधील सर्व मंडळींचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी ही संकल्पना अक्षरशः उचलून धरली आणि प्रत्येकाने ‘काँट्रिब्युशन’सह छोटी-मोठी जबाबदारी उचलून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. अगदी दोन ते तीन जण वगळता बाकी सर्व सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते हे विशेष. मंदार जोगळेकर आणि अजय जोगळेकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.’

अजय जोगळेकर म्हणाले, ‘माझे मूळ गाव साखरपा. अशा छोट्या गावांमध्ये मोठे कार्यक्रम घेणे किंवा मोठे कलाकार बोलावणे सहज शक्य नसते याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच सुषमा हळबे यांनी मला ‘हा कार्यक्रम कराल का,’ असे विचारले तेव्हा मी आनंदाने लगेच होकार दिला. संगीत क्षेत्रात मी गेली २७-२८ वर्षे कार्यरत असल्याने अनेक कलाकारांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि या ओळखीचा उपयोग माझ्या गावासाठी मला करून घेता आला, तर माझ्यासाठी ते खूप मोठे आहे. या कार्यक्रमामुळे आपल्या मातीत, जुन्या आठवणींत रमून एक चांगला कार्यक्रम करता आला याचे समाधान वाटले.’‘हा कार्यक्रम म्हणजे घरचाच एखादा सोहळा असल्यासारखे वाटले,’ अशी भावना आनंद भाटे यांनी व्यक्त केली. ‘कार्यक्रमाच्या ठिकाणचे वातावरण खूप चांगले होते. एक तर हा कार्यक्रम गावातल्या जुन्या श्रीराम मंदिराच्या परिसरात होता. त्यामुळे वेगळाच परिणाम साधला गेला आणि दुसरं म्हणजे तिथले श्रोते दर्दी होते. शास्त्रीय संगीतापासून अभंगापर्यंत विविध संगीतप्रकारांचे जाणकार होते. त्यामुळे सादर करताना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणखी एक गोष्ट म्हणजे मूळची साखरप्यातली असलेली आणि जगभर गेलेली मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथे एकत्र आली होती. त्यांनी आपले अनुभव शेअर केले. या सगळ्या गोष्टींमुळे हा कार्यक्रम म्हणजे घरचेच एखादे फंक्शन असल्यासारखे वाटले. या वेगळ्या वातावरणामुळे हा नेहमीपेक्षा एक खास कार्यक्रम ठरला,’ अशी भावना आनंद भाटे यांनी व्यक्त केली.कार्यक्रमावेळी भाटे यांनी बिहाग रागातील ‘कैसे सुख सोय’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर ‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा,’ ‘राम रंगी रंगले’, कानडी धर्तीचे सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, ‘नाही मी बोलत नाथा’, ‘कोण तुजसम सांग’, ‘तीर्थ विठ्ठल...’, ‘जोहार मायबाप जोहार’, ‘बाजे मुरलीया’ ही एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. ‘बाजे मुरलीया’ या गीताला रसिकांनी ‘वन्स मोअर’ दिला. त्यांच्या ‘चिन्मया सकल हृदया’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. भाटे यांना अजय जोगळेकर यांच्यासह यती भागवत यांनी तबलासाथ, तर प्रथमेश तारळकर यांनी पखवाज साथ केली.

दरम्यान, उत्सव काळात विविध धार्मिक विधी, आरत्या, भोवत्या, भजन, महिलांची एकांकिका, विविध गुणदर्शन, ह. भ. प. श्रीनिवास पेंडसे यांचे कीर्तन आणि ‘महाराणा प्रताप’ या विषयावर त्यांचेच व्याख्यान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

(रामजन्मोत्सवाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Prakash Ganoo About
Good teamwork.
0
0

Select Language
Share Link
 
Search