Next
सणासुदीसाठी खास रेसिपीज – फॅटी जामुन
BOI
Friday, October 12, 2018 | 10:49 AM
15 0 0
Share this story

सणासुदीच्या दिवसांत पंचपक्क्वानांची रेलचेल असते. पारंपरिक पदार्थांबरोबरच काही नवीन, वेगळे पदार्थ करण्याकडेही अनेकांचा कल असतो. यासाठीच ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध करत आहोत काही आगळ्यावेगळ्या रेसिपीज आणि त्याही पंचतारांकित हॉटेलमधील शेफने बनवलेल्या. पुण्याजवळील तळेगाव येथील ‘ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट’चे अनुभवी शेफ केशब जाना यांनी या खास पदार्थांच्या रेसिपीज तयार केल्या आहेत. या खास पदार्थांच्या जोडीने सणांची गोडी वाढवा. पहिली रेसिपी आहे फॅटी जामुनची....
......
आज आपण पाहणार आहोत फॅटी जामुनची रेसिपी. जामुन शब्दावरूनच लक्षात आले असेल, की ही गुलाबजाम, काला जामून यांच्या जातकुळीतील रेसिपी आहे. अगदी बरोबर; पण यात दालचिनी, लिंबाचा रस आणि डाळिंबाचे दाणे यांचा वापर केल्यामुळे हे जामुन नेहमीपेक्षा वेगळे बनले आहेत. हे फॅटी जामुन बनवा आणि एका वेगळ्या चवीचा आनंद घ्या आणि इतरांनाही द्या.

साहित्य : (साधारण २० ते २५ नगांसाठी)
एक कप इन्स्टंट गुलाबजाम मिक्स, दीड कप साखर, दीड कप पाणी, थोडेसे केशर, तीन टेबलस्पून दालचिनी पूड, एक चमचा लिंबाचा रस, तीन टेबलस्पून कोमट दूध आणि तळण्याकरिता तेल किंवा तूप.

सजावटीसाठी : एक कप मावा, अर्धा कप साखर, एक टीस्पून दालचिनी पूड, अर्धा कप दूध आणि डाळिंबाचे दाणे.

कृती : प्रथम एका मोठ्या भांड्यात दीड कप साखर आणि दीड कप पाणी घ्यावे. त्यामध्ये थोडेसे केशर घालावे आणि साखरेचा किंचित चिकट पाक करावा. त्यानंतर गॅस बंद करावा आणि या मिश्रणात तीन टेबलस्पून दालचिनी पूड, एक चमचा लिंबाचा रस घालावा. तयार पाक एका बाजूला ठेवून द्यावा. त्यानंतर गुलाबजाम करून घ्यावेत. एका बाउलमध्ये एक कप तयार गुलाबजाम मिक्स घेऊन, त्यामध्ये दोन टेबलस्पून कोमट दूध घालावे आणि चांगले मळावे. 
त्यानंतर हाताला थोडेसे तूप लावून मऊ आणि गुळगुळीत, छोटे गोळे करावेत. त्या गोळ्यांना भेगा पडल्या नाहीत याची खात्री करून घ्यावी. मंद गॅसवर तूप/तेल (आपल्या आवडीप्रमाणे) गरम करून घ्यावे. मध्यम आचेवर असताना त्यात पिठाचे गोळे सोडून सोनेरी तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळावेत. सगळे गुलाबजाम तळून घ्यावेत. तेल/तुपात गोळे सोडल्यानंतर ते थोड्या थोड्या वेळाने हळू-हळू हलवावेत. म्हणजे ते आतून कच्चे राहत नाहीत. हे गरम गुलाबजाम साखरेच्या पाकात सोडावेत. झाकण लावून अर्धा ते दोन तास ठेवावे. गुलाबजाम चांगले फुगलेले दिसतील. 

त्यानंतर एक जाड बुडाचे पातेले घ्यावे आणि डाळिंबाचे दाणे वगळून, सजावटीसाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र करावे. घट्ट गुळगुळीत क्रीम तयार होईपर्यंत ते शिजवून घ्यावे. वाढण्यापूर्वी गुलाबजाम अर्धे कापून त्यावर हे दाट क्रीम पसरवावे. वर डाळिंबाचे दाणे लावून सजवावे. मस्त फॅटी जामुन तय्यार!

शेफ केशब जाना, ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट, तळेगाव

(पुण्याजवळील तळेगाव येथील ‘ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट’बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link