Next
असे आहेत ‘पीपीएफ’चे नियम
BOI
Saturday, March 03, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

करवजावट आणि सुरक्षित गुंतवणूक यामुळे पीपीएफ हा सर्वमान्य गुंतवणूक पर्याय आहे; मात्र ‘पीपीएफ’बाबतच्या नियमांबाबत फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. ‘समृद्धीची वाट’ सदरात आज पाहू या ‘पीपीएफ’च्या नियमांविषयी....
........
बहुतेक सर्व मध्यम व उच्चवर्गीय नोकरदार, तसेच  व्यवसायिकांचे पीपीएफ खाते असल्याचे दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणुकीतील सुरक्षितता व ‘प्राप्तिकर कलम क्र. ८० सी’अंतर्गत करपात्र उत्पन्नातून मिळणारी वजावट. असे असले, तरी बहुतांश पीपीएफ गुंतवणूकदारांना ‘पीपीएफ’बाबतच्या नियमांची फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. आज आपण ‘पीपीएफ’बाबतच्या प्रमुख नियमांची माहिती करून घेऊ, जेणेकरून या सुविधेचा योग्य उपयोग करून घेणे सहज शक्य होईल.

- पीपीएफ खात्यावरील शिल्लक रकमेवर मिळणारे व्याज आता निश्चित (फिक्स्ड) नसून, आता दर तिमाहीस त्यात बदल केला जातो. गेल्या वर्षीपासून हा बदल करण्यात आला आहे. हा व्याजदर सरकारी कर्जरोख्यांच्या उत्पन्नाशी (गव्हर्न्मेंट बाँड यील्ड) निगडित आहे. सध्या तो ७.६ टक्के इतका आहे. यापुढे तो यील्डमध्ये होणाऱ्या बदलानुसार कमी-अधिक होऊ शकतो. थोडक्यात, येथून पुढे ‘पीपीएफ’मधील गुंतवणुकीवर निश्चित (फिक्स्ड) व्याज मिळणार नाही.

अर्थव्यवस्थेतील सध्याची तरलता (लिक्विडिटी) विचारात घेता, नजीकच्या काळात हे व्याज आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र पीपीएफ खात्यावरील रकमेवरील व्याज हे अन्य व्याजाप्रमाणे करपात्र नाही. त्यामुळे ‘पीपीएफ’मधील गुंतवणूक बँक, पोस्ट, बाँड , डिबेंचर, कंपनीतील मुदत ठेवी यांतील गुंतवणुकीपेक्षा लाभदायक आहे.

- पीपीएफ खाते फक्त एकाच नावाने उघडता येते. अन्य गुंतवणुकीप्रमाणे यातील गुंतवणूक संयुक्त नावाने करता येत नाही; मात्र अज्ञान पाल्याच्या (मायनर) नावाने संयुक्त खाते उघडता येते.

- या खात्यात आर्थिक वर्षात जास्तीत जास्त एक लाख ५० हजार रुपये इतकी गुंतवणूक करता येते व एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १२ वेळा खात्यात रक्कम जमा करता येते. एका वेळी जमा करण्यात येणारी रक्कम किमान ५०० रुपये इतकी असावी लागते.

- खाते चालू राहण्यासाठी आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये भरणे आवश्यक असते. काही कारणाने किमान रक्कम आर्थिक वर्षात भरली गेली नाही, तर खाते गोठवले जाते. असे गोठवले गेलेले खाते पुन्हा सुरू करावयाचे असल्यास खाते ‘फ्रीझ’ असलेल्या प्रत्येक वर्षासाठी ५०० रुपये आणि पेनल्टी ५० रुपये अशी रक्कम खात्यात जमा करावी लागते. फ्रीझ झालेल्या खात्यावर कर्ज घेता येत नाही. तसेच नियमानुसार काढता येणारी रक्कम काढता येत नाही. एक खाते फ्रीझ असताना दुसरे पीपीएफ खाते उघडता येत नाही.

- या खात्याची प्रारंभिक मुदत १५ वर्षे असून, त्याआधी हे खाते बंद करता येत नाही. खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचा वारस खाते बंद करू शकतो. मुदतीनंतर सर्व रक्कम काढता येते किंवा शिल्लक रकमेच्या ६० टक्क्यांपर्यंतची  किंवा अजिबात रक्कम न काढता खात्याची मुदत पुढील पाच वर्षे वाढविता येते. दर वेळी पुढील पाच वर्षांसाठी कितीही वेळा मुदत वाढविता येते. मुदतवाढीची लेखी विनंती मुदत संपल्यापासून एक वर्षाच्या आत करावी लागते.

- पीपीएफ खाते उघडल्यापासून तिसऱ्या आर्थिक वर्षात पहिल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस शिल्लक असलेल्या रकमेच्या २५ टक्के इतके कर्ज मिळू शकते व त्यास दोन टक्के दराने व्याज आकारणी केली जाते. कर्जाची परतफेड पुढील ३६ महिन्यांत करावी लागते. तसेच कर्ज पहिल्या सहा वर्षापर्यंतच काढता येते. त्यापुढे कर्ज काढता येत नाही. उदा. चौथ्या वर्षी मिळणारे कर्ज हे दुसऱ्या वर्षी खात्यात शिल्लक असलेल्या रकमेच्या जास्तीतजास्त २५ टक्के  असेल.

- पीपीएफ खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा असून, ही सुविधा खाते उघडल्यापासून सातव्या आर्थिक वर्षात प्रथम वापरता येते. त्यापुढे खात्याची १५ वर्षांची मुदत संपेपर्यंत वापरता येते. सातव्या आर्थिक वर्षात काढता येणारी जास्तीत जास्त रक्कम पुढीलप्रमाणे असते.

आधीच्या वर्षअखेरीस असलेली रक्कम (खाते उघडल्यापासून सहाव्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस असलेली शिल्लक व तिसऱ्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस असलेल्या शिलकीच्या ५० टक्के या दोन्हीतील कमी असणाऱ्या रकमेइतकी जास्तीत जास्त रक्कम काढता येते व याच नियमाने पुढेही काढता येते. उदा. दहाव्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात एक लाख रुपये शिल्लक असतील व सातव्या वर्षाच्या अखेरीस सत्तर हजार रुपये शिल्लक असतील, तर अकराव्या आर्थिक वर्षात पस्तीस हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल.

- कुटुंबातील सदस्याच्या गंभीर स्वरूपाच्या आजारावरील वैद्यकीय उपचारांसाठी पीपीएफ खाते मुदतीआधी बंद करण्याचा नियम २०१६पासून लागू झाला आहे; मात्र त्यासाठी खाते उघडून किमान पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक असते. अशा प्रकारे खाते बंद करताना मान्यताप्राप्त हॉस्पिटल अथवा अधिकृत डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असते.

- पीपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम कोर्ट ऑर्डर अथवा डिक्रीने गोठविली जाऊ शकत नाही; मात्र प्राप्तिकर खात्याच्या ऑर्डरनुसार खात्यातील शिल्लक रक्कम गोठविली जाऊ शकते.

थोडक्यात असे म्हणता येईल, की सध्याच्या घटलेल्या व्याजदरामुळे पीपीएफ हा पर्याय पूर्वीसारखा किफायतशीर उरलेला नाही; मात्र तो दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने व प्राप्तिकर वाचविण्यासाठी एक सुरक्षित पर्याय आहे.


- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link