Next
पुस्तकं सुसह्य करणार ‘त्यांचा’ बंदिवास
BOI
Friday, July 20, 2018 | 02:05 PM
15 0 0
Share this story

Picture Courtesy : 2000 Libros Facebook Page

‘पुस्तकं म्हणजे आपले सखे-सोबती; अन्य कोणी सोबत नसतं, तेव्हा तर पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही,’ असं म्हटलं जातं. सध्या अमेरिकेच्या नैर्ऋत्य सीमेवर स्थानबद्ध असलेल्या सुमारे २५०० मुलांना या वाक्याचा लवकरच अनुभव घेता येणार आहे. कारण आई-वडिलांपासून दुरावलेल्या या मुलांना निदान थोडासा तरी आधार मिळावा, त्यांचं मनोरंजन व्हावं, त्यांना वेगळ्या विश्वात रमता यावं, या उद्देशानं एका तरुणीने त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवण्याचा उपक्रम सुरू केलाय. हा उपक्रम म्हणजे त्यांच्या दुराव्यावरचं उत्तर नक्कीच नाही; पण भावनात्मकदृष्ट्या अत्यंत कठीण परिस्थितीत असलेल्या या मुलांना या पुस्तकरूपी सोबत्यांकडून थोडा दिलासा तरी नक्की मिळेल, असा विश्वास या तरुणीला वाटतो. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे स्थलांतरितांना देशात प्रवेश देताना त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून वेगळं करण्यात आलंय. अनधिकृत प्रवेशाबद्दल मुलांच्या आई-वडिलांवर खटले दाखल करण्यात आले आहेत आणि या मुलांना सीमेवर असलेल्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आलंय. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर केवळ अमेरिकेतूनच नव्हे, तर जगभरातून टीका झाली. त्यानंतर जून महिन्यात ट्रम्प यांनी नवा आदेश काढल्यामुळे आता अशा स्थलांतरित कुटुंबांना आता वेगळं करण्यात येणार नाही. त्यामुळे अनेक मुलांची त्यांच्या आई-वडिलांशी पुन्हा भेट झाली; मात्र तरीही अनेक मुलं-मुली अद्यापही आई-वडिलांच्या भेटीची वाट पाहत छावण्यांमध्ये बसून आहेत. त्यांना त्यांचे आई-वडील कधी भेटतील, याबद्दल अजून ठोस काहीही सांगता येत नाहीये. या पार्श्वभूमीवर, वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणाऱ्या आणि पुस्तकांवर नितांत प्रेम करणाऱ्या एलिझाबेथ बल्लाऊ या २४ वर्षांच्या तरुणीला सुचली अशी एक कल्पना, की ज्यातून या मुलांचं दुःख थोडंसं तरी हलकं होऊ शकेल. ही तरुणी अलीकडेच शिक्षण पूर्ण करून एका स्टार्ट-अपमध्ये नोकरी करते आहे. ती लेखिकाही आहे.

आई-वडिलांपासून दूर असण्याच्या आणि एक प्रकारच्या बंदिवासाच्या कठीण परिस्थितीत मुलांना वाचायला लावणं कठीण असलं, तरी त्यांनी वाचलं तर त्यांचे दोन क्षण सुखाचे होतील, काही काळ ती कल्पनाविश्वात रमतील, त्यांच्या निरागस चेहऱ्यांवर हसू फुलेल आणि त्यांचा विरहकाळ सुसह्य होईल, असा विचार एलिझाबेथने केला. या मुलांपर्यंत अन्य कोणती संस्था पुस्तकं वगैरे पोहोचवते आहे का, याचा एलिझाबेथनं शोध घेतला आणि तसं कोणीच करत नसल्याचं समजल्यावर आपल्या कल्पनेला मूर्त रूप द्यायचं ठरवलं. या छावण्या मुलांसाठी पुस्तकं स्वीकारतील का, याचीही तिने ठिकठिकाणच्या छावण्यांत फोन करून चौकशी केली. काही ठिकाणी तिला वाईट अनुभव आला; पण काही ठिकाणी पुस्तकं स्वीकारू असं सांगण्यात आलं. आपल्या एकटीला हे सगळं करणं कठीण जाईल, असा विचार करून एलिझाबेथनं ‘डीसी बुक्स टू प्रिझन’ या सेवाभावी संस्थेशी संपर्क साधला. ही संस्था ३४ राज्यांतल्या तुरुंगातल्या कैद्यांपर्यंत मोफत पुस्तकं पोहोचवण्याचं काम करते. त्या संस्थेच्या संचालक मंडळावर असलेल्या क्रिस्टिन स्टॅडम यांनी आणि त्यांच्या संस्थेनेही या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. ‘२००० लिब्रोज’ या नावानं त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच चार जुलैला उपक्रम सुरू केला. ‘लिब्रो’ हा स्पॅनिश शब्द असून, त्याचा अर्थ पुस्तक. सुमारे दोन हजार पुस्तकं या मुलांपर्यंत या पोहोचवायची, असं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे. 

त्यांनी आपल्या उपक्रमाची सोशल मीडियावरून जाहिरात केली. तसंच वेगवेगळ्या बुकस्टोअर्सशीही संपर्क साधला. लोकांनी या उपक्रमासाठी नवी किंवा चांगल्या पद्धतीने वापरलेली जुनी पुस्तकं द्यावीत किंवा स्वेच्छेने निधी द्यावा किंवा स्वयंसेवक म्हणून काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. अनेकांनी त्यांना पुस्तकं दिली. काही बुकस्टोअर्सनीही त्यांना साह्य केलं. अॅमेझॉनवरही काही पुस्तकांची ‘विश लिस्ट’ तयार करण्यात आली. आतापर्यंत पाचशे पुस्तकं गोळा झाली आहेत. ही पुस्तकं स्पॅनिश किंवा स्पॅनिश आणि इंग्लिश भाषेतली (द्विभाषी) आहेत. कॅप्टन अंडरपँट्स, दी क्रॉनिकल्स ऑफ नार्निया, हॅरी पॉटर सीरिज, दी लिटल प्रिन्स अशा बालसाहित्यातल्या गाजलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. १४ जुलैला या दोघींनी पुस्तकांचं पहिलं पार्सल टेक्सास आणि कॅलिफोर्नियातल्या छावण्यांकडे रवाना केलं. 

‘मुलांना आई-वडिलांपासून दूर राहावं लागणं, ही कल्पनाच असह्य आहे. शिवाय त्यांच्या छावण्यांमध्ये अनेक प्राथमिक सुविधांचीही वानवा आहे. या पार्श्वभूमीवर, आमचा हा उपक्रम म्हणजे त्यांच्या समस्येवरचं उत्तर नाही किंवा ठोस उपायही नाही; पण त्यात ती काही काळ रमतील; त्यांना आनंद मिळेल, हे महत्त्वाचं आहे,’ अशी भावना या दोघींनी व्यक्त केली. ‘मला स्वतःला कॉलेजमध्ये असताना हॅरी पॉटरची पुस्तकं आवडायची. आपण कोणत्याही परिस्थितीत जगत असलो, तरी एका वेगळ्याच अद्भुत विश्वात नेण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते. ती आम्ही अनुभवली आहे. त्याचाच उपयोग या मुलांनाही होईल, असं वाटतं. आमच्या हातात असतं, तर आम्ही या मुलांना लगेच सोडून दिलं असतं; पण ते आम्ही करू शकत नाही. कोर्टात लढण्याचं पुरेसं ज्ञान आम्हाला नाही. त्यांना देणगी देण्यासाठी खूप पैसाही आमच्याकडे नाही; म्हणून आम्ही पुस्तकांचा पर्याय निवडला,’ असं एलिझाबेथनं सांगितलं. ‘आम्ही त्यांच्या शरीरांची सुटका करू शकत नाही; पण या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लिखित शब्दांच्या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. तेच आम्ही करतो आहोत,’ असं स्टॅडम म्हणतात.

स्वातंत्र्ययुद्धात बंदिवासात असलेल्या अनेक राजकीय नेत्यांना पुस्तकांनी साथ दिल्याचं आपल्याला ज्ञात आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेकांनी बंदिवासात पुस्तकं लिहिलीही आहेत. आता ह्या छोट्याशा उपक्रमामुळेही या बालकांचा बंदिवास काहीसा सुसह्य होणार आहे. ‘शब्दचि आमुच्या जिवाचे जीवन। शब्दें वाटू धन जनलोका॥’ असं संत तुकारामांनी म्हटलंय. शब्दरूपी संपत्ती कठीण परिस्थितीतील मुलांना वाटणाऱ्या या दोघींच्या कृतीचाही तोच संदेश आहे.

‘आमच्या व्यापांमुळे हा उपक्रम आम्हाला दीर्घकाळपर्यंत चालवणं शक्य होईल, असं वाटत नाही; पण तरीही आम्हाला शक्य होईल तितकं आम्ही करणार आहोत,’ असं त्यांनी म्हटलंय. अनेक मर्यादा असूनही असा काही तरी कल्पक उपक्रम राबवून, मुलांचं, मग ती भले आपल्या देशाची का नसेनात, बालपण हरवू न देण्यासाठी धडपडणाऱ्या या दोघींना सलाम!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link