Next
‘स्वार्थासाठी खेळू नका’
राही सरनोबतचा सल्ला
BOI
Monday, September 24, 2018 | 04:46 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘शालेय जीवनात केवळ २५ गुणांच्या उद्देशाने खेळात सहभागी होऊ नका. खेळ नि:स्वार्थ वृत्तीने खेळा. दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड द्या. महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये देशाचा तिरंगा फडकताना बघण्याचे ध्येय उराशी बाळगा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. स्वार्थासाठी खेळाची निवड केली, तर क्रीडाक्षेत्रात कारकीर्द घडणार नाही, हे लक्षात ठेवा’, असा सल्ला महाराष्ट्राची सुवर्णकन्या नेमबाज  राही सरनोबत हिने युवा खेळाडूंना दिला;तसेच २०२० च्या ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे तिने या वेळी सांगितले.

जकार्ता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहीचा शांतिदूत प्रॉडक्शन्स आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी ती बोलत होती. या वेळी महापौर मुक्ता टिळक, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, चित्रपट दिग्दर्शिका समृद्धी जाधव, विधान परिषद सचिव उत्तमसिंग चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. विठ्ठल जाधव, मोहन राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, शांतिदूत प्रतिष्ठानच्या संस्थापक विद्या जाधव, योगेश जाधव, राहीचे वडील जीवन सरनोबत व आई प्रभा सरनोबत आदी मान्यवर उपस्थित होते.  

तिरंगा ध्वजाच्या साक्षीने राहीला व्यासपीठावर आणण्यात आले. मॉडर्न हायस्कूलच्या मुलींनी नृत्याविष्कार सादर करून तिचे स्वागत केले. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी तिचे कौतुक करणारी व्हिडिओ क्लिप पाठवली होती, तर आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत आणि दिग्दर्शिका समृद्धी जाधव यांनी राहीचे कौतुक करत, स्फूर्तिदायी भाषण केले. अशा शानदार सत्कार सोहळ्यामुळे राही भारावून गेली होती. ती म्हणाली, ‘माझी जन्मभूमी कोल्हापूर असली तरी कर्मभूमी पुणे आहे. माझ्या कारकिर्दीची जडणघडण पुण्यातच झाली. कर्मभूमीतील हा सत्कार माझ्यासाठी खास  आहे.’ 

ती पुढे म्हणाली, ‘अंजली भागवतसारख्या ख्यातनाम नेमबाजांनी खूप संघर्ष करून, या खेळात नाव कमावले. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा रस्ता सोयीचा आणि सोपा झाला. त्यांनी संघर्ष केला म्हणून आम्ही आज यशाची फळे चाखतोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे माझ्या या क्षेत्रातील कारकीर्दीच्या यशात अंजली भागवत यांचेही श्रेय आहेच. शूटिंगमधील आम्हा दोघींचा प्रकार वेगळा असला तरी अंजली भागवत यांना शूटिंग रेंजवर वावरताना पाहूनही मला बरेच काही शिकायला मिळाले.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search