Next
दातृत्वाची भारतीय संस्कृती टिकविणारे शिक्षण देणे आवश्यक
लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे प्रतिपादन
BOI
Monday, January 21, 2019 | 01:46 PM
15 0 0
Share this article:

सुमित्रा महाजन यांचा सत्कार करताना ‘विद्याभारती’च्या कोकण प्रांत उपाध्यक्षा मेधा फणसळकर, ‘विद्याभारती’च्या भारतीय शिक्षा संकुल प्रकल्प समितीचे अध्यक्ष दिलीप बेतकेकर, अखिल भारतीय सचिव प्रकाशचंद्रजी

चिपळूण :
‘आपल्याला समाजाकडून मिळते, त्यापेक्षाही अधिक समाजाला काही तरी देण्याची वृत्ती निर्माण करणारे आणि जगभरात जिच्याबद्दल अपार आदर आहे, अशी भारतीय संस्कृती टिकविणारे शिक्षण नव्या पिढीला देणे आवश्यक आहे,’ असे मत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. विद्याभारती या देशपातळीवरील शिक्षण संस्थेचे महाराष्ट्रातील पहिले परिपूर्ण विद्यासंकुल शिरळ (ता. चिपळूण, रत्नागिरी) या महाजन यांच्या मूळ गावी उभारले जात आहे. त्या संकुलाचे भूमिपूजन महाजन यांच्या उपस्थितीत २० जानेवारी २०१९ रोजी पार पडले. त्या वेळी त्या बोलत होत्या. 

सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘अलीकडे नोकरीत उत्तम ‘पॅकेज’ मिळण्याच्या हेतूने मुलांना चांगले शिक्षण दिले जाते; मात्र जगभरात जिच्याबद्दल अपार आदर आहे, ती भारतीय संस्कृती टिकविणारे शिक्षण देण्याची गरज आहे. ‘भारतीय लोक अतिक्रमणासाठी आपल्या देशात येत नाहीत, तर चांगले संस्कार घेऊन येतात आणि आपल्या देशालाही मदत करतात,’ अशी परदेशात भारताबद्दलची चांगली भावना आहे. आपल्याला समाजाकडून जे मिळते, त्यापेक्षा अधिक समाजाला द्यायचे आहे, अशी शिकवण देणारी ही भारतीय संस्कृती टिकवणे आवश्यक आहे.’

‘‘विद्याभारती’च्या शाळांमधून याच पद्धतीने शिक्षण दिले जाईल, अशी खात्री वाटते,’ असेही त्या म्हणाल्या.

‘चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकले गेले. चांगले काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. आजच्या विद्यार्थ्यांनी हा इतिहास माहीत करून घेतला पाहिजे. देशाचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, चांगले राजकारण करण्यासाठी चांगल्या लोकांनी त्यात आले पाहिजे. मीही याच भावनेतून राजकारणात आले,’ असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात दृक्-श्राव्य माध्यमातून विद्याभारतीच्या प्रकल्पाविषयीची माहिती देण्यात आली. हा प्रकल्प १७ एकर परिसरात साकारला जाणार असून, भारतीय संस्कार घडविणारे शिक्षण देणारी दहावीपर्यंतची शाळा, तसेच अन्य प्रकल्प तेथे राबविण्यात येणार आहेत. खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांची, तर ठाण्यातील एका उद्योजकाने पाच लाख रुपयांची देणगी दिल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिरळ गावच्या सरपंच फरिदा पिंपरकर, ‘विद्याभारती’चे अखिल भारतीय सचिव प्रकाशचंद्रजी, भारतीय शिक्षा संकुल प्रकल्प समितीचे अध्यक्ष दिलीप बेतकेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष अनिल महाजन, कोकण प्रांताचे अध्यक्ष प्रदीप पराडकर, भारतीय शिक्षा संकुल प्रकल्प समितीच्या कार्यवाह छाया मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते.

उषाताई साठे सभागृहाचे उद्घाटन
चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात सुमित्रा महाजन यांच्या मातोश्री उषाताई साठे यांच्या नावाने सभागृह बांधण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही सुमित्रा महाजन यांच्या हस्ते २० जानेवारीला करण्यात आले. ‘चांगले संस्कार माणसांमुळे होतातच; पण पुस्तकांमुळेही होतात आणि त्यात वाचनालयांचा महत्त्वाचा वाटा असतो. लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या माध्यमातून हे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. या संस्थेच्या कार्याला आता वस्तुसंग्रहालय, तसेच कलादालनाचीही जोड मिळाली आहे,’ असे त्या म्हणाल्या. 

‘पुस्तकांच्या वाचनाची ठिकाणे, एवढीच वाचनालयांची ओळख मर्यादित न राहता, ती ज्ञानार्जनाची ठिकाणे व्हायला हवीत. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या कामाचा प्रभाव पाडायचा असेल, तर वाचन तगडे असले पाहिजे. लोकप्रतिनिधींनीही कायम वाचन केले पाहिजे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

(चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयाबद्दलचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pravinsansare About 214 Days ago
खुप सुंदर
0
1

Select Language
Share Link
 
Search