Next
‘काश्मीरबद्दलचे गैरसमज दूर करण्याची गरज’
BOI
Tuesday, January 30 | 05:54 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘काश्मीर आणि उर्वरित भारत यांच्यात दरी निर्माण करण्याचे काम पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक सुरू आहे. भारतापासून काश्मीर कायम वेगळा राहावा, अशीच त्यांची इच्छा आहे. उर्वरित भारतीयांमध्ये काश्मीरबद्दल आणि काश्मिरींच्या मनातही भारतीयांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. ते दूर करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊ या,’ असे आवाहन जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष हाजी इनायत अली यांनी केले.

‌सरहद संस्था आणि अरहाम फाउंडेशन यांच्या वतीने व जम्मू-काश्मीर कला, भाषा आणि संस्कृती अकादमी आणि जम्मू-काश्मीर टुरिझम यांच्या सहयोगाने पुण्यात नुकतेच ११व्या काश्मीर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन अली यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मुकुंदनगर येथील थ्री डी डेस्टिनेशन येथे झालेल्या या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार विजेते लेखक-दिगदर्शक प्राण किशोर कौल, काँग्रेस नेते अभय छाजेड, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, ‘सरहद’चे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, शैलेश पगरिया, खडके फाउंडेशनचे संजीव खडके आदी मान्यवर उपस्थित होते.

अली म्हणाले, ‘काश्मीरमध्ये जायचे नाव घेतल्यावर लोक दोन पावले मागे जातात. वास्तविक तशी परिस्थिती तिथे नाही. काश्मीरचे लोक खूप चांगले आहेत. ते अतिशय आतिथ्यशील आहेत. काश्मीरबद्दलच्या या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचवून उर्वरित भारतीयांच्या मनात काश्मीरबद्दल असलेली भीती दूर करण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

‘भारतीय आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, ही काश्मिरींच्या मनातली भावना काढून टाकाण्यासाठी त्यांच्याशी संवादातून आपुलकीचे नाते तयार केले पाहिजे. त्यांच्यासोबत राहून त्यांना प्रेम, मदत आणि आधार दिला पाहिजे. यात सामान्य नागरिक, पर्यटन संस्था आणि माध्यम यांची भूमिका महत्त्वाची आहे,’ असे ते म्हणाले.

‌कौल म्हणाले, ‘काश्मिरी लोकांना मी खूप चांगले ओळखतो. त्या भागात गेल्यावर तुमचे स्वागतच होईल. काश्मीर कायम भीतीच्या छायेत असतो, ही परिस्थिती माध्यमांमुळे उर्वरित भारतीयांच्या मनात निर्माण झालेली आहे. मी स्वतःला महाराष्ट्र आणि काश्मीर यांच्यामधला दुवा समजतो. काश्मीरमधल्या शांततेचा आणि सुरक्षित वातावरणाचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. ही बाब आपण लोकांसमोर आणायला हवी.’

अरुणा ढेरे म्हणाल्या, ‘काश्मीरच्या भूमीवर वेगवेगळ्या धर्मांचे राजे नंदले. या सगळ्यांनी काश्मीरच्या भूमीवर कधीही दंगल होऊ दिली नाही. सत्तेचा उदात्तपणे विचार कसा करायचा, हे त्यांनी दाखवून दिलं. धार्मिक सहिष्णुता, एकात्मता हेच इथले परंपरागत वैशिष्ट्य राहिले आहे.’

नहार म्हणाले, ‘काश्मीर आणि महाराष्ट्र यांचे नाते फार वर्षांपासूनचे आहे. काश्मीर महोत्सवाचा उद्देश काश्मिरी कला, संस्कृती यांचे प्रतिनिधित्व करणे हा तर आहेच; पण काश्मीर आणि महाराष्ट्राचे नाते पुढे घेऊन जाणे, हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे.’ अशा उपक्रमामुळे काश्मीरशी नाते जोडण्याची प्रक्रिया आणखी दृढ होईल, असे छाजेड यांनी सांगितले.

प्राण किशोर कौल यांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त सत्कार करण्यात आला. तसेच  काश्मिरी पर्यटनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या पुण्यातील पर्यटन संस्थांच्या प्रतिनिधींचा या वेळी सत्कार करण्यात आला. काश्मिरी नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

(कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link