Next
‘रंगमंचीय अनुभवातून आयुष्य घडवण्याचे अमूल्य मार्गदर्शन’
BOI
Tuesday, March 20, 2018 | 06:38 PM
15 0 0
Share this story

देवदत्त पाठक विद्यार्थ्यांसोबत नाटकाचा तास घेताना..

अभिनय गुरुकुल किंवा गुरुकुल रंगभूमी, शाळेच्या वेळापत्रकात नाटकाचा तास अशा भन्नाट संकल्पना रुजवणारे आणि गेली जवळपास ३० वर्षं बालरंगभूमी क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यातील देवदत्त पाठक. त्यांनी राबवलेल्या नवीन संकल्पना आणि त्यांचे ‘अभिनय गुरुकुल’ या विषयांच्या अनुषंगाने आणि जागतिक बालरंगभूमी दिनाच्या (२० मार्च) निमित्ताने मानसी मगरे यांनी घेतलेली त्यांची ही विशेष मुलाखत...
...........
बालरंगभूमी या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर काम सुरू असताना ग्रामीण भागातील किंवा छोट्या शहरातील मुले या सगळ्यापासून वंचित राहताना दिसतात. अशा मुलांना कलेच्या आणि विशेषतः नाटकाच्या क्षेत्रात आणण्यासाठी गेली जवळपास ३० वर्षं धडपडत असलेले पुण्यातील देवदत्त पाठक म्हणजे हाडाचा रंगभूमी शिक्षक. रंगभूमी कलाकारांमध्ये रंगभूमी कला विषय शिकवण्याचा ओढा नाही असे बोलले जाते. अभिनय, दिग्दर्शनाच्या प्रांतात सर्वांची करिअर खुलतात. किंबहुना त्यासाठी कष्ट घेतले जातात. कलाकार किंवा एक सुज्ञ नागरिक घडविण्यासाठी रंगभूमी कलेचा समर्पक वापर करणारी माणसे तशी कमीच. या पार्श्वभूमीवर देवदत्त पाठक यांचे कार्य उठून दिसते.

वाणिज्य शाखेची पदवी आणि पुढे व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेऊनही देवदत्त पाठक यांनी नाटक आणि रंगभूमी या विषयांचा सखोल अभ्यास केला. त्यांना प्रारंभीच्या काळात यशवंत पेठकर, भालबा केळकर, वासुदेव पाळंदे यांचे मार्गदर्शन लाभले; पण ‘रंगभूमी कला शिकवता येते, असा ठाम विश्वास गुरू पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडून मिळाला,’ असं ते सांगतात... 

गुरुकुलातील विद्यार्थी सरावादरम्यान- अभिनय गुरुकुल किंवा गुरुकुल रंगभूमी ही संकल्पना कशी आकाराला आली? 
- गुरुकुल रंगभूमी ही एक संस्कारक्षम परंपरा आणि अत्याधुनिकतेचे गुरुकुल म्हटले पाहिजे. गुरुकुल रंगभूमी ही संस्था नसून, ती रंगभूमी कलेला प्रसन्न आणि शुद्ध वातावरणात शिस्तबद्ध नाती देणारी, जीवनाला आकार देणारी व आधुनिक शास्त्रासह शुद्धतेचा अनुभव देणारी एक गुरू-शिष्य परंपरा आहे. कुटुंब आणि समाजाप्रति आपले वागणे, बोलणे, कृती करणे यांना वारंवार तपासून, दुरुस्त करणे हा आमच्या गुरुकुलातील नित्य अनुभव आहे. रंगमंचीय खेळाच्या अनुभवातून आयुष्यालाच घडवण्याचे अमूल्य मार्गदर्शन इथे दिले जाते. अनेक वर्षांपासून हे काम गाव व शहरातून सुरू आहे. आजपर्यंत ३५०हून अधिक शाळा, विविध शैक्षणिक व कला संस्थांसह देशविदेशात हे कार्य झाले आहे. संगीतात जसा ‘सा’ लावला जातो, नृत्यात जसे ‘ताल’ व ‘लय’ या गोष्टी महत्त्वाच्या, त्याप्रमाणे रंगभूमीसाठी अनुभवांचा ‘सा’ महत्त्वाचा ठरतो. गुरूच्या घरी जाऊन रंगभूमी कलेचे प्रशिक्षण घेतले जावे म्हणून ही गुरुकुल पद्धत सुरू केली आहे. हा एकूण किमान तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही कलेशी आपण जोपर्यंत वचनबद्ध राहत नाही, तोपर्यंत त्या कलेची खोल व्याप्ती आपण जाणून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्या कलेतील सातत्यही महत्त्वाचे आहे. आपण रंगभूमीशी प्रामाणिक राहून सतत रंगभूमी कलेशी स्वतःला बांधून घ्यावे हे गुरुकुल रंगभूमीमध्ये शिष्यांच्या अंगी बिंबवले जाते.

- शाळांमधून चालणारे वर्ग कोणत्या स्वरूपाचे असतात?
- गेली २५ वर्षे आम्ही पुण्यात कुमार वयातील मुलांसाठी काम करत आहोत. कुमार रंगभूमी प्रकल्प गेली कित्येक वर्षं अनेक शाळांमध्ये सुरू आहे. रंगभूमी प्रकल्प सुमारे २५० ते ३०० रंगभूमी पाठांच्या आधारे घेतले जातात. पाच दिवसांच्या या कार्यशाळेची सुरुवात होते प्राणायाम व उपासनेने. यानंतर सुरुवात होते रंगमंचीय खेळांतून. पाठांतून स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती अशा सर्व क्षमतांचा इथे विकास होतो. या निर्मितीची शिक्षक स्वतःच चिकित्सा करतात. रंगमंचीय खेळ व रंगभूमी पाठ आणि कलानिर्मिती यांचा मुलांसाठी कसा उपयोग करता येईल, याचेही मार्गदर्शन केले जाते. कलानिर्मिती किंवा सांस्कृतिक कार्यक्रम हे अंतिम उद्दिष्ट न ठेवता ही निर्मिती मुलांना अधिकाधिक कल्पक, सर्जनशील आणि मोकळं कसं बनवेल याचाही शिक्षकांना विचार करायला लावला जातो. यातून मुलांच्या क्षमतांचा चतुरस्र विकास होऊ शकतो. गटातील सहकार्य व सामान्यज्ञान वाढावे यासाठी प्रश्नमंजूषा हा कार्यक्रम घेतला जातो. या कार्यशाळेत पहिल्या दिवशी साधं बोलायला लाजणारे-बुजणारे शिक्षक पाचव्या दिवशी कार्यशाळेच्या शेवटच्या ‘रंगभूषा व वेशभूषा’ या सत्रात चेटकीण-मांत्रिक यापासून नारद-विदूषक इतकंच काय, तर अंगभर रंग लावून वाघ आणि आदिवासीसुद्धा व्हायला तयार होतात, इतके ते मोकळे होतात. आपल्या मुलांसाठी आपण कोणतीही गोष्ट करायला तत्पर असलं पाहिजे, ही संकल्पना इथे रुजवली जाते. 

- ‘शाळेच्या वेळापत्रकात नाटकाचा तास’ या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेबद्दल थोडं सांगा.
- ज्या काळात शाळांमध्ये नाटक फक्त वार्षिक स्नेहसंमेलनापुरते होते असे, त्या काळात म्हणजे १९८५-८६मध्ये पहिल्यांदाच ‘शाळेच्या वेळापत्रकात नाटकाचा तास’ हा एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला. त्यासाठी मी स्वतः यात सहभागी होऊ लागलो. आजही मी त्यात पूर्णपणे कार्यरत आहे. दिवसभरात तीन-चार शाळा आणि सायंकाळी गुरुकुल पद्धतीने नाट्यकला अशा गेल्या काही वर्षांच्या शैक्षणिक कामाचा प्रवास आजही चालू आहे. रंगभूमी कलाकार आज व्यावसायिक नाटक, चित्रपट, मालिका यांमध्ये रमतात; पण आम्ही रंगमंचीय खेळ आणि रंगभूमी पाठातून मुलांचे व्यक्तिमत्त्व आणि क्षमता घडवतो. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, प्रयोग निर्मिती आणि आमचे प्रयोग यातून विद्यार्थ्यांचे विचार आणि कल्पना यांना आकार दिला जात आहे. 


- मुलांचे अभिनयाचे तास घेतानाच पालकांच्याही अनेक कार्यशाळा घेतल्या जातात. त्याविषयी काय सांगाल?
- मुलांशी संवाद साधताना एक लक्षात येतं, की पालकांच्या वर्तनाचा समाजाइतकाच किंवा त्याहून अधिकच परिणाम मुलांवर होत असतो. तेव्हा कुठल्याही शाळेतील मुलांच्या पालकांसाठी रंगभूमी प्रबोधन कार्यशाळा घेतली जाते. शाळेत आणि घरी आपली मुले काय करतात, या प्रश्नाचे नेमके उत्तर पालकांना यातून मिळते. पालकांनाही व्यक्त होण्याची संधी मिळावी व त्यातून मुलांच्या संगोपनाबद्दल नवीन आणि समंजस विचार व्हावा, हा या कार्यशाळांचा उद्देश आहे. निसर्गरम्य परिसरात या कार्यशाळा घेतल्या जातात. गावात, खेडोपाडी, वस्त्या आणि देश-विदेशी नाटकाचा तास घेत असताना प्रत्येक महिन्यागणिक एक नवा नाट्यप्रयोग आम्ही करत आहोत. त्या सर्व नाटकांचा उत्सव प्रत्येक वर्षी होत असतो. गेल्या ३० वर्षांच्या या चळवळीचे फळ म्हणून महाराष्ट्र शासन नवीन वर्षापासून शाळेच्या वेळापत्रकात अभ्यासाचा नवीन विषय म्हणून नाटकाचा तास सुरू करत आहे.

- सध्याचे मराठीतले अभिनेते-अभिनेत्री यांचा या उपक्रमात काही सहभाग असतो का?
- क्षमता विकसन आणि जाणिवा समृद्ध करण्यासाठी नाटक यातून विचार, विषय, गोष्ट आणि त्याचे नाटक आणि त्याचा नाट्य उत्सव होत राहतो. ६०हून अधिक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती यातून झाली. त्यात काही नाटकांची लिखित संहिता नाही, तरी ४०-४५ मुलं खुलतात. किंबहुना त्यासाठी कष्ट घेतले जातात. केवळ उत्स्फूर्त सुचण्याचा रियाज करून गावोगावी प्रयोग करतात. ते पाहायला डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, सुमित्रा भावे, दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, स्मिता तळवलकर यांपासून आजचे सोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, किशोर कदम, उपेंद्र लिमये, सुरेशचंद्र पाध्येपर्यंत असे कितीतरी कलाकार आवर्जून येतात. 

ग्रामीण भागात नाटकाचा तास घेताना देवदत्त पाठक- ग्रामीण भागातही नाटकाचा तास घेता का? 
- पुण्या-मुंबईमध्ये काम करताना ग्रामीण भागातल्या काही मुलांनी ‘आमच्या गावात येऊन तास घ्या’ असे सांगू लागली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत गावांचा दौरा सुरू केला आहे. अनेक जण नाट्यप्रयोगासाठी दौरे करतात; पण मी वर्षातले सात महिने गावात जाऊन रंगभूमी संस्कार कार्यशाळेसाठी वेळ देत आहे. बरोबर अनेक सहायक विद्यार्थ्यांचा लवाजमा असतो. ‘खडकावर उभा राहिलास, तरी तेथे नंदनवन फुलवता आले पाहिजे,’ या वडिलांच्या इच्छेला प्रत्यक्षात आणताना ३० वर्षे कधी निघून गेली कळलेच नाही.

(देवदत्त पाठक यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link