Next
‘विधानसभा निवडणुकीत भाजप महायुती २२० जागा जिंकेल’
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा निर्धार
BOI
Tuesday, July 23, 2019 | 03:03 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीने किमान २२० जागा जिंकल्याच पाहिजेत, ही आपली जिद्द आहे, असा निर्धार व्यक्त करत, जिथे भाजप उमेदवार असतील तिथे भाजप आणि जिथे मित्रपक्षांचे उमेदवार असतील तिथेही भाजपच निवडणूक लढणार असे समजून विधानसभेच्या सर्व २८८ जागांवर कामाला लागण्याचे आदेश भाजप महाराष्ट्रचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले.

मुंबईमधील गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित पक्षाच्या विशेष प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला पक्षाचे राज्यातील केंद्रीय मंत्री, केंद्रीय पदाधिकारी, राज्यातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष,  उपाध्यक्ष, नगराध्यक्ष, मंडलाध्यक्ष, मंडल सरचिटणीस यांसह भाजपच्या सर्व मोर्चे व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बळकट केलेली पक्ष संघटना, राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची यशस्वी कामगिरी हे सर्व आपल्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आहेतच, आता पुन्हा एकदा आपल्याला जनतेकडे त्यांचे असेच भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी जायचे आहे. आगामी निवडणुकीतही राज्यातील जनता आपल्या पाठिमागे नक्कीच ठामपणे उभी राहिलच.’

युतीचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस योग्यवेळी जाहीर करतील. तो निर्णय आपण त्यांच्यावर सोपवला पाहिजे. आपण सर्वांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

‘७० वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आहे. रेल्वेमधील शौचालये बायोटॉयलेटयुक्त करून पंतप्रधान मोदींनी मोठी क्रांती घडवली. वारीला निर्मलवारी बनवण्यासाठी स्वच्छ वारी निर्मल वारी मोहीम, वारकऱ्यांना पाच लाख रेनकोट देऊन त्यांची मोठी सोय केली, हे ७० वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला का जमले नाही, ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करणाऱ्यांनी बारामतीत सुप्रिया सुळे कशा विजयी झाल्या,’ असे प्रश्नही पाटील यांनी विरोधकांना विचारला.

‘संघटनात्मक बांधणीमुळे आपले जनतेशी थेट आणि घट्ट नाते तयार झाले आहे. बूथ रचना आणि पन्ना प्रमुख या भाजपच्या संघटनात्मक रचनेमुळे लोकसभा निवडणुकीत चमत्कार करून दाखवला. विधानसभा निवडणुकीतही संघटनात्मक रचनेचा उपयोग करून भाजप महायुतीचे उमेदवार विजयी होण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचे आहे. जनतेचा आपल्याला आशीर्वाद आहे,  त्यामुळे विरोधी पक्षांची काळजी करायचे काही कारण नाही,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘संपूर्ण देशात भाजपचा पक्का जनाधार निर्माण झाला आहे; पण त्यावर समाधान न मानता आपल्याला बरेच अंतर पुढे जायचे आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायजींचा अंत्योदयचा विचार राबविण्यासाठी आणि हे राज्य परम वैभवाला नेण्यासाठी आपल्याला भक्कम आणि खूप मोठा जनाधार हवा आहे. त्यासाठी आजपर्यंत भाजपपासून दूर राहिलेल्या समाज घटकांनाही आपल्याला जोडून घ्यायचे आहे. गरीब, श्रीमंत, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सुशिक्षित, अशिक्षित असे सर्वजण आपलेच आहेत.  आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. यासाठी सदस्यता अभियान अत्यंत महत्त्वाचे असून, ते यशस्वी करायचे आहे. असा एकही बूथ राहता कामा नये, जिथे भाजपचे किमान २५ सक्रिय कार्यकर्ते नसतील. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला सर्वव्यापी सर्वस्पर्शी बनवण्याचा निर्धार करू,’ असे पाटील यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search