Next
रिव्हर्स मॉर्गेज - ज्येष्ठांचा आधारवड
BOI
Saturday, March 31, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

निवृत्तीनंतर पेन्शन, पुरेशी गुंतवणूक हाताशी नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मालकीचे घर असेल तर ‘रिव्हर्स मॉर्गेज’ योजनेचा आधार घेता येऊ शकतो. त्याआधारे ज्येष्ठ नागरिक आपली तहहयात आर्थिक तरतूद करू शकतात. याविषयी सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
......
बदलती जीवनशैली, वाढत चाललेले नात्यातील अंतर यामुळे विभक्त कुटुंब पद्धती हा आपल्या समाजव्यवस्थेचा एक भागच बनून गेला आहे. विभक्त कुटुंब व्यवस्थेचे काही बरे-वाईट परिणाम आज आपण पाहात आहोत. यातील प्रकर्षाने जाणवणारी समस्या म्हणजे ज्येष्ठांची आर्थिक ओढाताण. याचे मुख्य कारण म्हणजे बहुतेक मध्यमवर्गीयांचा उमेदीच्या काळात मिळालेला पैसा हा मुलांची शिक्षणे, त्यांचे विवाह, गृहकर्जाची परतफेड, कुटुंबातील आजारपण व प्रासंगिक समस्या यावर खर्च झालेला असतो. त्यामुळे निवृत्तीच्या वेळी पुरेसा पैसा गाठीस नसतो. यातील काहींना पेन्शन असते; पण तीही वाढती महागाई, वाढत्या वयातील आरोग्यविषयक प्रश्न यामुळे अपुरी पडते. ज्यांना पेन्शन अथवा अन्य काही उत्पन्नाचे साधन नसते, त्यांची परिस्थिती तर आणखीच बिकट असते. यावर एक उपाय म्हणून सरकारने रिव्हर्स मॉर्गेज ही सुविधा ज्येष्ठांना उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा नेमकी कशी आहे ते आपण पाहू.

रिव्हर्स मॉर्गेज हा गृहकर्जाच्या अगदी उलट प्रकार आहे. यामध्ये स्वत:च्या मालकीचे राहते घर बँकेकडे मॉर्गेज (गहाण) ठेवून कर्ज घेता येते. असे कर्ज एकरकमी अथवा दरमहा हप्त्याने घेता येते. विशेष म्हणजे हे कर्ज फेडण्याची जबाबदारी कर्जदारावर नसते.

आता रिव्हर्स मॉर्गेज योजनेची सविस्तर माहिती घेऊ.

- अर्जदाराच्या स्वत:च्या मालकीचे घर असणे आवश्यक असते. तसेच अर्जदार त्या घरात राहत असणे आवश्यक असते.
- अर्जदाराचे वय ६० किंवा त्याहून अधिक असावे लागते.
- या घरावर अन्य कोणताही बोजा असता कामा नये.
- घराच्या बाजारभावाच्या ६० टक्के इतकी रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. एकरकमी कर्ज हवे असल्यास ५० टक्के रकमेइतकेच मिळू शकते.
- कर्जाची मुदत जास्तीत जास्त १५ वर्षे इतकी असते. नियमित मिळणाऱ्या हप्त्याच्या (मासिक/तिमाही) कर्जाला जास्त मागणी दिसून येते.
- दर पाच वर्षांनंतर दरमहा मिळणारा कर्जाचा हप्ता, गरज असेल तर घराच्या वाढलेल्या बाजारभावानुसार वाढविला जाऊ शकतो.
- दरमहा मिळणारी रक्कम कर्ज स्वरूपाची असल्याने यावर प्राप्तिकर लागू होत नाही.
- विशेष म्हणजे कर्जाची मुदत संपली, तरी जिवंत असेपर्यंत कर्जदार या घरात राहू शकतो, इतकेच नव्हे तर कर्जदाराच्या मृत्यूनंतर पती-पत्नीपैकी हयात असलेली व्यक्ती मरेपर्यंत या घरात राहू शकते.
- कर्जदार पती/पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर बँक घर विकून कर्जवसुली करू शकते अथवा त्याचा ताबा स्वत:कडे घेऊ शकते; मात्र असे करताना मृतांचा कायदेशीर वारस कर्जाची रक्कम व्याजासह एकरकमी भरण्यास तयार असेल, तर रक्कम वसूल करून घराचा ताबा कायदेशीर वारसास दिला जातो.
- वारसाने याबाबत काहीच प्रतिसाद दिला नाही, तर घराची विक्री करून बँक कर्जवसुली करते. असे करताना विक्रीची रक्कम कर्ज रकमेपेक्षा जास्त असेल तर त्यावरील ‘कॅपिटल गेन’ बँकेस भरावा लागतो. याउलट घराची विक्री रक्कम कर्जापेक्षा कमी असेल, तर होणारा तोटा बँकेलाच सहन करावा लागतो. वारसाकडून वसूल करता येत नाही.

बहुतेक सर्व व्यापारी बँका असे कर्ज देऊ करतात. या कर्जाचा व्याजदर बँकेनुसार कमी अधिक असू शकतो. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांना निश्चितच एक दिलासा मिळाला आहे. आता स्वत:च्या मालकीचे राहते घर असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभर स्वत:च्या घराचा उपभोग घेऊन रिव्हर्स मॉर्गेज सुविधेचा वापर करून उतारवयातील आपली आर्थिक समस्या सहज सोडविता येईल व स्वाभिमानाने जीवन जगता येईल. थोडक्यात आपले राहते घरच आपला आधारवड होऊ शकतो. याचा उपयोग जसा ज्येष्ठांना आहे, तसा तो आजच्या तरुणांना त्यांच्या उतारवयात होऊ शकणार असल्याने स्वत:च्या मालकीचे घर शक्य तितक्या लवकर घेणे हे निवृत्तीनंतरच्या नियोजनाच्या दृष्टीने जरूरीचे आहे. असे कर्ज स्वत:च्या मालकीच्या, परंतु भाड्याने दिलेल्या घरावर अथवा दुकान किंवा अन्य व्यापारी स्वरूपाच्या जागेवर मिळू शकत नाही.

- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link