पुणे : ‘एमबीएच्या विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प समजून घेऊन त्याचे परिणाम म्हणून व्यापारात, अर्थव्यवस्थेवर आणि समाजजीवनावर काय काय आणि कशा पद्धतीने बदल होतात याचा बारकाईने अभ्यास करावा,’ असे मत प्रसिद्ध साई मनोहर प्रभू यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्सतर्फे (आयआयएमएस) ‘पडसाद अर्थसंकल्पाचे’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, ‘आयआयएमएस’चे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांच्यासह सर्व अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रभू यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्प तयार होण्याची प्रक्रिया, अर्थसंकल्पाची व्याप्ती, आयकर, आर्थिक तूट, अप्रत्यक्ष कर, आर्थिक धोरण अशा विविध संकल्पना उदाहरणांसह समजून सांगितल्या.
विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प व्यवस्थित समजून घेता यावा यासाठी संस्थेतर्फे ३१ जानेवारीला अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी प्रा. गुरुनाथ वाघाळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. एक फेब्रुवारीला लोकसभेत अर्थसंकल्प सादर होत असतानाचे थेट प्रसारणही दाखविण्यात आले; तसेच विविध वर्तमानपत्रांतून आलेले अर्थसंकल्पाचे स्पष्टीकरण, लेख हेही विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्यात समूह चर्चा घेण्यात आली.
या दोन्ही सत्रांनंतर नेमका अर्थसंकल्प समजून घ्यावा आणि विद्यार्थ्यांच्या शंका आणि प्रश्नांना जाणकारांकडून उत्तरे मिळावीत म्हणून सनदी लेखापाल प्रभू यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अशा प्रकारच्या अभिनव उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यासात रुची निर्माण होण्यास मदत होत असल्याचे मत ‘आयआयएमएस’चे संचालक डॉ. मराठे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महेश महांकाळ यांनी केले. अपर्णा वाठारे या विद्यार्थिनीने आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. पुष्कराज वाघ, प्रा. सारंग दाणी, अंजली जकाते यांचे सहकार्य लाभले.