Next
‘पाण्याखालची रत्नागिरीही सुंदर’
जिल्हाधिकाऱ्यांनी लुटला स्कूबा डायव्हिंगचा आनंद; वाघवळी किनाऱ्यावर केली स्वच्छता
BOI
Tuesday, December 11, 2018 | 10:39 AM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
‘रत्नागिरी शहर तर सुंदर आहेच; पण रत्नागिरीला लाभलेल्या समुद्राचे अंतरंगही अतिशय सुंदर आहेत. या पाण्याखालचे विश्व अत्यंत अद्भुत आहे. स्कूबा डायव्हिंगच्या सुविधेमुळे या सुंदर जगाची सैर करता येते. त्यामुळेच पर्यटनवाढीसाठी हा उपक्रम खूप महत्त्वपूर्ण आहे,’ असे उद्गार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले. हर्षा स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून त्यांनी नुकताच हा अनुभव घेतला. त्यानंतर ते बोलत होते. त्यानंतर जवळच्या वाघवळी किनाऱ्याला भेट दिल्यावर तेथील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी स्वतः तेथील कचरा उचलायला सुरुवात केली आणि नागरिकांसह किनारा स्वच्छ केला. सुंदर गावे, शहरे स्वच्छ राखणे ही प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी असल्याचा धडा त्यांनी घालून दिला.सुनील चव्हाण यांनी पत्नी कांचन चव्हाण यांच्यासह ‘हर्षा’चे सुहास ठाकुरदेसाई आणि कौस्तुभ सावंत यांच्यासह हा आनंद लुटला. समुद्रातील रंगीबेरंगी मासे, प्रवाळ, विविध वनस्पती पाहिल्यामुळे हे जग किती वेगळे, समृद्ध आहे, याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्कूबा डायव्हिंग हे रत्नागिरीच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार तर मिळणार आहेच. परंतु रत्नागिरी ही पर्यटननगरी म्हणून विकसित होणार आहे,’ असे ते म्हणाले. त्याचा मासेमारी व्यवसायाला कोणताही धोका नसल्याने हे एकमेकांना पूरक व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले.‘हर्षा स्कूबा डायव्हिंगचे डायव्हर्स आंतरराष्ट्रीय प्रमाणित आहेत. पाण्याखाली ते आपली काळजी घेतात. त्यामुळे भीती निघून जात असल्याचा प्रत्यय येतो,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वच्छतेचा धडा
स्कूबा डायव्हिंगनंतर त्यांनी जवळच्या वाघवळी किनाऱ्याला भेट देऊन तेथील देवीचे पवित्र स्थान आणि गोड्या पाण्याच्या झऱ्याचीही पाहणी केली; मात्र या किनाऱ्यावर त्यांना अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या असा कचरा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः कचरा उचलण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत पत्नी, सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत, डायव्हर्स यांच्यासह अन्य पर्यटकांनीही किनारा स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला आणि अवघ्या तासाभरात किनारा स्वच्छ झाला. चांगल्या गोष्टी करण्यासाठी केवळ इच्छाशक्ती लागते, याचे उदाहरण जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिले. दर १५ दिवसांनी आपण हा किनारा स्वच्छ करत असल्याची माहिती ग्रामस्थांनी या वेळी दिली. 

वाघावली किनाऱ्यावर काही ठिकाणी जुगारासारखे काही अवैध प्रकार रात्रीच्या वेळी घडल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘पर्यटनस्थळे सुरक्षित आणि चांगलीच ठेवली पाहिजेत. अशा ठिकाणी गैरप्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link