Next
‘थर्टी फर्स्ट’ला या रत्नागिरीच्या सुंदर समुद्रकिनारी...
BOI
Friday, December 28, 2018 | 11:19 AM
15 1 0
Share this article:

रत्नागिरी : सरत्या वर्षाची शेवटची सायंकाळ आणि नव्या वर्षाची पहिली पहाट संस्मरणीय असावी, या दृष्टीने पर्यटक वेगवेगळ्या जागांच्या शोधात असतात. अशा जागांमध्ये समुद्रकिनारे पर्यटकांच्या सर्वांत आवडीचे असतात. रत्नागिरीतील पांढरा समुद्र त्यापैकीच एक आहे. या समुद्रकिनाऱ्याचा परिसर सध्या कात टाकत असून, स्कूबा डायव्हिंग, जलविहार यांसह विविध साहसी खेळांच्या सुविधाही या परिसरात पर्यटकांसाठी उपलब्ध होत आहेत. मुंबई-पुण्यापासून ‘वन डे ट्रिप’ सहज करणे शक्य असल्याने ‘थर्टी फर्स्ट’साठी अत्यंत उत्तम ‘डेस्टिनेशन’ आहे.

रत्नागिरी शहराला लागून असलेला म्हणजे पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र. रत्नदुर्ग किल्ल्यामुळे किनाऱ्याचे दोन भाग पडले आणि काळी वाळू व पांढऱ्या वाळूमुळे किनाऱ्यांनाही काळा आणि पांढरा समुद्र अशी ओळख मिळाली. काळ्या समुद्रावर म्हणजे मांडवीमध्ये फार पूर्वी प्रवासी व मालवाहतूक करणारी गलबते येत होती. पांढरा समुद्र म्हणजे मुरुगवाडा, पंधरा माड परिसराचा किनारा फिरण्यासाठी लोकप्रिय होता. गेल्या काही वर्षांपासून त्याला उतरती कळा लागली होती. येथील सुरूचे बन फयान चक्रीवादळात उद्ध्वस्त झाले; मात्र आता पुन्हा स्थानिकांच्या मदतीने या किनाऱ्याचे पुनरुज्जीवन सुरू आहे. अनेक सोयीसुविधा येथे उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

स्थानिकांनी एकत्र येऊन येथे स्टॉल मांडले आहेत. स्वच्छता केली आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या स्कूबा डायव्हिंगची सुविधा रत्नागिरीत उपलब्ध झाली असून, तेथे नेण्यासाठी येथून सुविधा दिली जात आहे. तारकर्ली, देवबाग, तसेच कासव महोत्सवासाठी वेळासचे गावकरी एकत्र आले. त्याप्रमाणे मुरुगवाडा, पंधरा माड येथील लोक विकासासाठी एकत्र आले आहेत.

येथील समुद्र खूप शांत आहे. फार मोठ्या लाट उसळत नाहीत. येथे लवकरच १२ मीटरचा प्रशस्त रस्ता होणार आहे. या किनार्या वर शेकडो प्रकारचे शंख, शिंपले आढळतात. सात फुट लांबीचा पंखाचा पसारा लाभलेला मोठा पक्षी म्हणजे समुद्री गरुड. त्याचे दर्शन या परिसरात सहज होते. ब्राह्मणी घार, छोटे पक्षी, स्थलांतरित पक्षी, व्हींब्रेल, रेड शांक, ग्रीन शांक, प्लोवर, वेस्टर्न रिफ हेरॉन यांसारखे अनेक पक्षी येथे पाहायला मिळतात. पांढर्याी समुद्राची वाळू पायाला फार चिकटत नाही.
स्कूबा डायव्हिंगमुळे पर्यटकांची संख्या व रत्नागिरीत वास्तव्य करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मुरुगवाडा येथून हर्षा स्कूबा डायव्हिंगचा पॉइंट जवळ आहे. तेथून या परिसरात विविध प्रकारचे मासे व प्रवाळ पाहता येतात.

‘येथे कोकणी मेव्याचा स्टॉल सुरू केला असून पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आंबा पोळी, तळलेल्या गर्यांथना अधिक मागणी आहे. पर्यटनवाढीसाठी आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत. शहाळे विक्रीलाही मागणी आहे,’ असे विक्रेत्यांनी सांगितले.

रत्नदुर्ग किल्ला, मिऱ्या डोंगर, स्कूबा डायव्हिंग, शंखशिंपले, कांदळवनातील जैवविविधता, मत्स्यालय अशी पर्यटकांना आवडतील अशी स्थळे येथे जवळ-जवळ असल्याने एकाच ठिकाणी भेट दिल्यावर पर्यटकांना विविध गोष्टींचा आनंद लुटता येतो.जलविहाराचा आनंद 
संजीव नरसिंह लिमये यांनी १५ जानेवारी २०१० रोजी ‘सुशेगाद जलविहार’तर्फे बॅकवॉटर बोटिंगची सुविधा येथे सुरू केली आहे. गेली आठ वर्षे सुशेगाद जलविहार पर्यटकांना आणि रत्नागिरीकरांना जलसफरीचा आनंद अव्याहतपणे देत आहे. आतापर्यंत सुमारे चार हजार पर्यटकांनी या जलसफरीचा आनंद लुटला आहे.ही सफर कर्ला-जुवे-चिंचखरी-कर्ला अशी असते. सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट्सची व्यवस्था केलेली आहे. या सफरीमध्ये नारळ-पोफळीच्या बागा, खारफुटीची वने व छोटी छोटी बेटे, तसेच जुवे येथील दत्तमंदिर आणि शेजारीच असलेल्या सुमारे १५० वर्षांपासून सुरू असलेल्या चुन्याच्या भट्ट्या पाहता येतात. पुढे चिंचखरीला जाईपर्यंत वाटेत दिसणारे ब्राह्मणी घार, पाणकावळा, सीगल्स, सी इग्रेट्स, खंड्या, टिटवी, हॉर्नबिल असे विविध पक्षी आणि पाण्यातून सुळकन उड्या मारणारे छोटे-मोठे मासे बघून पर्यटक हर्षभरित होतात. चिंचखरी दत्तमंदिराकडे लाल मातीच्या सुंदर रस्त्यावरून जाता येते आणि मंदिरातील आध्यात्मिक अनुभूती घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. परतीच्या प्रवासामध्ये पश्चिमेकडे होणारा सूर्यास्त व घरट्यांकडे परत जाणारे पक्षी बघणे ही एक पर्वणीच असते. हे सर्व अनुभवल्यानंतर हा जलविहार म्हणजे खरोखरच एक स्वर्गीय अनुभव असल्याची प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करतात. पर्यटक आणि रत्नागिरीकर यांच्या आवश्यकतेनुसार डिझाइन्ड टूर म्हणता येईल अशा पद्धतीने सेवा देण्याचा ‘सुशेगाद जलविहार’चा नेहमीच प्रयत्न असतो. ही सेवा खूपच माफक दरांत उपलब्ध केली आहे.त्याशिवाय, ऐतिहासिक गुहेत सैर, सी-व्हॅली क्रॉसिंग या आणि अशा सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत. एकंदरीतच, रत्नागिरी हे उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.

(रत्नागिरीतील पर्यटनाविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. रत्नागिरीतील पांढरा समुद्र परिसराची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search