पुणे : ‘नागरिकांना एक आरोग्यदायी जीवनशैली उपलब्ध करून देण्याच्या हेतूने धान्यापासून, फळे, भाजीपाला, ते दुध, दुग्धजन्य पदार्थ अशी सर्व सेंद्रिय उत्पादने वाजवी किमतीत ते ही एका क्लिकवर घरपोच उपलब्ध करून देणारे ‘व्हेजमार्ट’ पुण्यात सुरु करण्यात आले आहे. संकेतस्थळ, अॅप आणि फ्रँचायजी स्टोअर्स अशा तीनही माध्यमातून ही सेवा उपलब्ध आहे,’ अशी माहिती ‘व्हेजमार्ट’ रिटेल प्रा. लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक पाटील यांनी दिली.

‘येथे तब्बल चारशे उत्पादने थेट शेतामधून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचवली जाणार असून, ताजी फळे, भाज्या, डाळी, धान्य, पीठ, मसाले, सुकामेवा, दुग्ध उत्पादने आणि फळांचे रस आदींचा त्यामध्ये समावेश आहे. ‘केशर’ या उप नाममुद्रेअंतर्गत देशी गायीचे (ए-२ प्रकारचे) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरविले जाणार आहेत; तसेच ‘फ्रेश फ्युजन’ या नाममुद्रेअंतर्गत फळांचा आणि भाज्यांचा ताजा रस पुरविला जाणार आहे. सध्या २०० शेतकरी कंपनीसाठी सेंद्रिय पिक उत्पादन करत असून ५०० एकर शेती सेंद्रिय लागवडीखाली आणली आहे. आगामी काळात ती दोन हजार एकरपर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे’, असे पाटील यांनी सांगितले.
‘व्हेजमार्ट उत्पादने पुणे आणि मुंबईमधील सर्व इ-कॉमर्स वेब साईट आणि सुपर मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याजोडीला पुणे, मुंबई येथे फ्रँचायजी स्टोअर्स सुरु करण्याची तसेच या वर्षाअखेरीस बंगळूर आणि हैदराबाद येथे व्यवसाय विस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे. सिंगापूर येथे पहिले आंतरराष्ट्रीय फ्रँचायजी स्टोअर स्थापन करण्याची आणि युके, युरोप, युएई येथे आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या माध्यमातून व्यवसाय विस्तार करण्याची आखणीदेखील ‘व्हेजमार्ट’ने केलेली आहे’, असे ही पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘गेल्या काही दशकांत भारतातील कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे. शेतीमध्ये केल्या जाणाऱ्या रासायनिक द्रव्यांच्या फवारणीमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याशी निगडीत समस्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्यामध्ये बदल घडवून आणण्याची आता वेळ आली आहे. त्यासाठी लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने अत्यंत धोरणात्मक पद्धतीने ‘व्हेजमार्ट’ची आखणी करण्यात आली आहे. या मंचाची स्थापना २०१४ मध्ये करण्यात आली. त्याचा विस्तार आता झपाट्याने केला जात आहे. ग्राहकांची सोय बघतानाच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी देखील व्हेजमार्ट कटीबद्ध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसोबत एक धोरणात्मक सहयोग करणे, त्यांच्यासाठी एक शाश्वत व्यवसाय वातावरण निर्माण करणे आणि ते टिकवणे, ग्राहकांसाठी आरोग्यदायी उत्पादने निर्माण करणे आणि त्यायोगे एकूणच भारतीय कृषी संस्कृतीबाबत आदर सन्मान राखणे ही उद्दिष्टे ‘व्हेजमार्ट ’तर्फे निश्चित करण्यात आली आहेत’.