नाशिक : अत्यंत खडतर आणि प्रतिकूल वातावरणात पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची जागतिक क्रीडाविश्वात ख्याती आहे, अशा ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत नाशिकच्या १८ वर्षांच्या रविजा सिंगल या युवतीने ‘दी फर्स्ट यंगेस्ट इंडियन गर्ल’ आणि नाशिकची ‘फर्स्ट फुल आयर्न लेडी’ होण्याचा मान पटकावला आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या या स्पर्धेत रविजा सहभागी झाली होती. तिथे तिने चमकदार कामगिरी केली आहे. रविजाने ही स्पर्धा १५ तास ५४ मिनिटांत पूर्ण केली. यामध्ये स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा तीन क्रीडाप्रकारांचा समावेश होता. ३.८ किलोमीटर स्विमिंग रविजाने एक तास १० मिनिटांत पूर्ण केले. त्यानंतर ९० किलोमीटर सायकलिंग सात तास ५७ मिनिटांत आणि त्यानंतर ४२.२ किलोमीटरचे अंतर तिने सहा तास ३९ मिनिटांत धावून पूर्ण केले.

१८ ते ९९ या वयोगटासाठी ही आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत खेळाडूच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. उणे तपमान, बर्फाच्छादित प्रदेश अशा आव्हानात्मक परिस्थितीत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. यापूर्वी जुलै २०१८मध्ये ऑस्ट्रियात झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या १५ जणांनी आयर्न मॅनचा किताब मिळवला होता.
रविजा ही नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांची कन्या असून, रवींद्र सिंगल यांनीही यापूर्वी आयर्न मॅनचा किताब पटकावला होता. या स्पर्धेतील यशामुळे रविजा ‘यंगेस्ट एशियन गर्ल’, ‘द फर्स्ट यंगेस्ट इंडियन गर्ल’ आणि नाशिकची ‘फर्स्ट फूल आयर्न लेडी’ ठरली आहे.