Next
डोळ्यांच्या आंतरिक सौंदर्यासाठी..
BOI
Wednesday, April 11, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


समतोल आहार ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. तो घेतला, तर रक्तदाब, स्थूलपणा, हृदयरोग व मधुमेह अशा मोठ्या आजारांपासून आपण लांब राहू शकतो. मधुमेह झाला नाही, तर डोळ्यांच्या तक्रारी फारशा वाढत नाहीत. डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक व महत्त्वाची पोषणमुल्ये कोणती आहेत, हे खरे तर किती जणांना ठाऊक असते..? ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या निरोगी डोळ्यांसाठी आवश्यक असलेल्या आहाराबद्दल... 
......................
‘ये काली काली आंखे..,’ ‘डोळे हे जुलमी गडे..’, अशी डोळ्यांशी संबंधित अनेक गाणी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेतच. या सर्व गाण्यांवरून डोळ्यांचे सौंदर्य, नात्यांमधील डोळ्यांची भूमिका महत्त्वाचीच राहिली आहे. डोळे हे मनुष्याला मिळालेले एक मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा वेगळा असा मेक-अप केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते, तसेच आतूनसुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. 

समतोल आहार ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. तो घेतला, तर रक्तदाब, स्थूलपणा, हृदयरोग व मधुमेह अशा मोठ्या आजारांपासून आपण लांब राहू शकतो. मधुमेह झाला नाही, तर डोळ्यांच्या तक्रारी फारशा वाढत नाहीत. डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक व महत्त्वाची पोषणमुल्ये कोणती आहेत, हे खरे तर किती जणांना ठाऊक असते..? जीवनसत्व अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा अशी फॅटी आम्ले, इत्यादीची आवश्यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थात मिळतील.  

गाजरकेशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या : जीवनसत्व ‘ए’ किंवा याचा एक प्रकार म्हणजे ‘बीटा कॅरोटीन’, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे सुरू ठेवण्यास अत्यंत आवश्यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत, की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. केवळ गाजरच नाही, तर केशरी, लाल, नारंगी रंगांची फळे व भाज्या यामध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. ‘अ’ जीवनसत्वाच्या कमतरतेने रातंधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्नियासारखे अतिमहत्त्वाचे डोळ्यांचे भागसुद्धा काम करू शकत नाहीत.  

स्ट्रॉबेरीआंबट व बेरी प्रकारातील फळे : जीवनसत्व ‘क’ हे आंबट फळे जसे आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादींमध्ये तसेच स्ट्रॉबेरी, शृजबेरी, रासबेरी यांमध्येही असते. सर्वसाधारणपणे संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून हे जीवनसत्व सैनिकासारखे आपले रक्षण करत असते. डोळ्यांच्या संसर्गापासून रक्षण व मोतीबिंदूची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे काम ‘क’ जीवनसत्व करते.  

सुका मेवासुका मेवा : ‘ई’ जीवनसत्व हे अँटिऑक्सिडंट्सचे काम करते. जीवनसत्व ‘अ’चे ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवते. आपण जसे घर घासून-पुसून साफ करतो, तसे हे अँटीऑक्सिडंट्स ‘फ्री रॅडीकल्स’चा सफाया करतात.  आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया, हवेचे प्रदूषण, सिगारेट ओढणे, इत्यादींमुळे ‘फ्री रॅडीकल’ तयार होतात. बदाम, अंड, वनस्पतीजन्य तेल यांमध्ये ‘ई’ जीवनसत्व असते. 

हिरव्या पालेभाज्यापालेभाज्या : हिरव्या पालेभाज्यांमध्ये अम्प्युटीन, झॅकसंथीन हे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. स्नायूंच्या ऱ्हासाची व मोतीबिंदूची शक्यता कमी करण्यात यांचा महत्त्वाचा वाटा आहे. स्नायूंचा ऱ्हास ही सर्व वयस्क लोकांमध्ये आढळून येणारी अवस्था आहे. यामध्ये रेटीनाचा मधला भाग काम करेनासा होतो. हे टाळण्यास भरपूर पालेभाज्या मिक्स असलेले सलॅड खाणे आवश्यक आहे. 

अंडीअंडी : अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कॅरोटीन व ल्युपिन हे दोन्ही डोळ्यांसाठी आवश्यक असलेले पोषणमूल्ये असतात. त्यामुळे रेटीना तंदुरुस्त राहण्यास मदत होते. 

मासे : ट्युना, साल्मन इत्यादी मासे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. ओमेगासारख्या फॅटी आम्लांसाठी हे मासे, तसेच आक्रोड, सोयाबीन उत्पादने, या सगळ्यांमुळे डोळ्यांचा कोरडेपणा जातो. डोळे तजेलदार दिसतात.   

झिंक हे खनिज मदतनिसाचे काम करते. आपल्या यकृतात साठवलेले जीवनसत्व ‘अ’ यकृताकडून डोळ्याच्या रेटीनापर्यंत आणण्याचे काम हे खनिज करते. काही फळे, भाज्या व मुख्यत्वे प्राणिज पदार्थ व मासे यात झिंक असते.  

समतोल आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, स्वच्छता तसेच पोषकतत्वांचा आहारात समावेश करण्यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.  
- सिगारेट ओढू नका.
- डोळ्याला उन्हाचा चष्मा वापरा. फॅशन म्हणून नव्हे, तर सुर्याकिरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल वापरा. 
- भरपूर पाणी प्या. आपला डोळा पाण्यासारख्या पदार्थाने वेढलेला आहे. आपण जितक्या वेळेस पापणीची उघडझाप करतो, तितके वेळा धुळीचे कण व इतर गोष्टी डोळ्यात जात असतात; पण हा पातळ पदार्थ आपल्या डोळ्याचे सतत रक्षण करत असतो. डोळ्याला कोरडेपणा जाणवू देत नाही. 
- भडक रंगाच्या भाज्यांचे सलॅड आहारात नक्कीच असावे. जसे पालक, बीट, कोथिंबीर, गाजर इ. हे सलॅड अनेक गोष्टी एकत्र करून खावे. उदाहरणार्थ भाजी + फळे + थोडा सुका मेवा + कडधान्य + ऑलिव्ह तेल इत्यादी एकत्र खावे. 
- डोळ्यांना कटाक्षाने आराम द्यावा. यासाठी २०-२०-२०चा नियम पाळावा. दर २० मिनिटांनी २० फूट लांबीची वस्तू, २० सेकंदांसाठी पहावी, यामुळे काम करताना डोळ्यावर येणारा ताण हलका होतो व डोळ्याचे आरोग्य राखले जाते. 

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Savita prabhakar shinde About 86 Days ago
Very nice information
0
0

Select Language
Share Link