Next
‘आर्थिक विकासासाठी औद्योगिक प्रगती महत्त्वाची’
प्रा. सुमित मजुमदार यांचे प्रतिपादन
BOI
Monday, March 18, 2019 | 03:39 PM
15 0 0
Share this article:

प्रा. सुमित मजुमदार लिखित 'लॉस्ट ग्लोरी- इंडियाज कॅपिटॅलिझम स्टोरी' पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी प्रदीप भार्गव, विकास देशमुख, डॉ. विजय केळकर, सुमित मुजुमदार, राजस परचुरे आदी मान्यवर.

पुणे : ‘औद्योगिक प्रगती ही आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, मागील ६५ वर्षांत आपण उद्योगांची कार्यक्षमता वाढविली असती, तर ५.५ ट्रिलियन डॉलरचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) गाठणे शक्य झाले असते,’ असे मत डल्लास येथील टेक्सास विद्यापीठातील टेक्नॉलॉजी स्ट्रॅटेजी विभागाचे प्रा. सुमित मजुमदार यांनी व्यक्त केले. 

‘लॉस्ट ग्लोरी-इंडियाज कॅपिटॅलिझम स्टोरी’ या मजुमदार लिखित पुस्तकाचे पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे प्रा. प्रदीप आपटे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे (एमसीसीआय) अध्यक्ष प्रा. प्रदीप भार्गव, गोखले इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक प्रा. राजस परचुरे, टाटा एलेक्सिचे माजी व्यवस्थापकीय संचालक विकास देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी सर्व तज्ज्ञांनी या विषयावर आपली मते मांडली. 

भारतीय उद्योगांच्या कार्यक्षमतेविषयी १९५० ते २०१० दरम्यानची आकडेवारी मजुमदार यांनी या वेळी सादर केली. विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी बोलताना ते म्हणाले, ‘विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारताचा विकासदर हा ०.५ टक्के एवढाच होता, तर शतकाच्या उत्तरार्धात तो पाच टक्क्यांवर पोहोचला. आजवरच्या इतिहासानुसार श्रीमंत देशांमध्ये औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. देशास स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्र हे प्रभावी क्षेत्र होते. त्यानंतर या क्षेत्रात घट झालेली दिसते. मागील २०-२५ वर्षात आपण कृषी अर्थव्यवस्था ही ओळख मागे टाकून सेवा क्षेत्राशी निगडित अर्थव्यवस्था झालो आहोत. भांडवलशाहीची संकल्पना केवळ आर्थिक बाबींपुरती मर्यादित नसून, ज्ञान आणि मनुष्यबळ या भांडवलाचे व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल या दृष्टीने त्याचा विचार व्हायला हवा. भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण संरचनेबाबत आणि देश म्हणून आपली अर्थविषयक भूमिका काय, याबाबत आपल्याला नव्याने विचार करण्याची गरज आहे.’ 

केळकर म्हणाले, ‘भारतीय अर्थव्यवस्था बरीच मजबूत आहे. देशात सेवा क्षेत्र विकसित झाले आणि निर्मिती क्षेत्र मागे राहिले याचे कारण कररचनेत दिसून येते. निर्मिती आणि निर्यात वाढविण्यासाठी वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फायदा होईल.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search