Next
‘स्वेरी’तर्फे पंढरपुरात येणाऱ्यांसाठी शुद्ध पाणी वाटप
BOI
Wednesday, July 10, 2019 | 01:09 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचे उत्तम कार्य श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय यांनी पंढरपूर येथे केले. 

दर वर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या व दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान ‘स्वेरी’चे विद्यार्थी भागवीत आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. भारतीय यांच्या हस्ते रिद्धी-सिद्धी गणेश मंदिराजवळ करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य टीचर एज्युकेटर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे, ‘स्वेरी’चे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे आदी उपस्थित होते.


या प्रसंगी बोलताना प्रा. भारतीय म्हणाले, ‘संपूर्ण विश्वातील नागरिक महाराष्ट्रातील संत महात्म्यांचे महत्त्व जाणून आहेत. त्यामुळे आषाढी वारीकडे अनेकांचे लक्ष लागून राहते. यामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांसह इतर भाविकांना ‘स्वेरी’चे विद्यार्थी दर वर्षी आरओयुक्त पिण्याच्या पाण्याचे वाटप करतात, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. वारकऱ्यांची सेवा करण्याची ‘स्वेरी’ची परंपरा उत्तम आहे. आपले हे पुण्यकर्म पांडुरंगापर्यंत पोचते.’ 

‘स्वेरी’ संचलित चारही महाविद्यालयांतील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ व ‘कमवा आणि शिका’ योजना’ यामधील जवळपास ३०० विद्यार्थी व प्राध्यापक एकत्रित येतात आणि नियोजन करून पाण्याचे वाटप सुरू होते. ‘स्वेरी’मार्फत गेल्या २१ वर्षांपासून वारकऱ्यांना पाणी देण्याचे कार्य ‘स्वेरी’ करत आहे. यंदाही संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी वाटपाचे कार्य सुरू झाले आहे.


दर्शन रांगेत उभे असलेले वारकरी किरण तुळशीराम शिंदे (रा. वाई, जि. सातारा) यांना आरओयुक्त पाणी देऊन पाणी वाटपाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डिप्लोमा इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, समन्वयक प्रा. सुनील भिंगारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. एन. हरिदास, प्रा. एस. एम. शिंदे, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, इतर विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 


सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत रिद्धी-सिद्धी मंदिरापासून गोपाळपूरपर्यंत व पुढे ‘स्वेरी’ कॉलेज मार्गात विद्यार्थी प्रचंड उत्साहाने आरओयुक्त शुद्ध पाण्याचे वाटप करत आहेत. नवमी, दशमी व एकादशी या तीन दिवशी या पाण्याचे वाटप केले जाईल. दररोज साधारण दहा हजार लिटर शुद्ध पाण्याचे वाटप केले जाते. ‘स्वेरी’ कॅम्पसचे प्रमुख प्रा. एम. एम. पवार हे पाणी वाटपाचे नियोजन उत्तम प्रकारे करत आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले. आभार प्रा. सुनील भिंगारे यांनी मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search