Next
मेंदीच्या पानावर...
BOI
Tuesday, March 13, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अतिउच्च पातळीवर घेऊन जाणारी अशी प्रीतीची भावना असो, की काळरात्रीचा अंधार दूर करण्यासाठी पेटवलेली सामाजिक भावनेची मशाल असो, दुभंगून जाता जाता अभंग करणारा आशावाद असो, की स्त्रीमनाची हळुवार स्पंदनं असोत, कविवर्य सुरेश भटांच्या काव्यप्रतिभेनं दिलेलं दान रसिकांनी हृदयाच्या ओंजळीत जपून ठेवलंय. त्यांचा स्मृतिदिन उद्या, १४ मार्च रोजी आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या ‘मेंदीच्या पानावर’ या त्यांच्या अजरामर रचनेचा...
.....
चेहऱ्यावरचा होळी पौर्णिमेचा गुलाल आणि रंगपंचमीचा रंग फिका झाला, पूर्णपणे उतरला; पण कविवर्य सुरेश भटांच्या कवितेचा रंग मात्र अगदी पक्का, मनातून कधीही न उतरणारा! ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ असं कवीच सांगतो. त्यामुळे या रंगाची महती ती काय वर्णावी? रसिकांच्या मनावरचा काव्यरंग अधिकच गडद होत जाणार. याचं कारण कविवर्य सुरेश भट यांचा स्मृतिदिन उद्या, म्हणजे १४ मार्च रोजी आहे. स्मृतिगंध ऐवजी ‘स्मृतिरंग’ म्हणू या. कारण त्यांच्या वेगवेगळ्या काव्य कलाकृतींतून हा काव्यरंग अनुभवण्याची मजा काही औरच! किती वैविध्यपूर्ण हे रंग!! भावगीत, स्फूर्तिगीत, भावकविता आणि गझल लिहिणारे कवी सुरेश भट यांची काव्यप्रतिभा खरोखर विस्मयकारी! त्यांची एकेक रचना समजून घेताना काव्यानंदाचा उत्कट अनुभव येतो, तर कधी आपण अंतर्मुख होतो. कधी त्यांची भावकविता पं. हृदयनाथ मंगेशकरांसारख्या संवेदनशील संगीतकाराचा स्वरसाज घेउन येते, तेव्हा तर आपण स्वरानंदात चिंब होतो. कानावर तेच ओळखीचे स्वर, ज्या स्वरांनी आपलं मन अजूनही झुलत आहे, डुलत आहे. गिटारचे स्ट्रोक घेऊन जातात आपल्याला त्या अलौकिक दिव्य स्वरांपर्यंत आणि कवीच्या भावमधुर अशा या शब्दांपर्यंत.

मेंदीच्या पानावर  
मन अजून झुलते ऽ ग
जाईच्या पाकळ्यांस
दव अजून सलते ऽ ग

स्त्रीजीवनाची अनेक रूपं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं डोळे आणि कान उघडे ठेऊन आपण बघितली. मनाच्या आरशातही ती प्रतिबिंबित झाली. काही स्पष्ट तर काही धूसर! अर्थात, ज्या आरशाचा पारा ठीकठाक त्यांना स्पष्ट दिसणार आणि नसेल त्यांना प्रतिमा धूसरच दिसणार. तर अशा ‘स्त्री प्रतिमा’ समजून घेण्याचा प्रयत्न महिला दिनाच्या निमित्तानं आवर्जून केला जातो. कर्तृत्ववान, आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांबरोबर आई, बहीण, प्रेयसी, पत्नी अशा नात्यांचे रेशीमबंध विणणारी स्त्री आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिचा मानसन्मान, आदरसत्कार करता करता महिला दिनाचं औचित्य राखलं; पण माझ्या मनात नकळत सासुरवाशीण आणि माहेरवाशीण स्त्रीचं रूप रेंगाळत राहिलं. याचं कारण कविवर्य सुरेश भट यांची ‘माहेरवाशीण’ ही कविता. या कवितेला पं. हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेलं संगीत आणि लतादीदींचा स्वर... कविता स्वरांनी कशी मोहरते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं. मनाचं अंगण झुळझुळत ठेवणारं, मेंदीच्या पानावर झुलणारं, झुलत झुलत गाणारं.

तोच गार वारा ऽ ग
हुळहुळतो तुळशीचा
अजुन देह सारा ऽ ग

नुकतीच लग्न होऊन सासरी गेलेली लेक माहेरी आलीय माहेरवाशीण बनून. ‘माहेर!’ प्रत्येक स्त्रीच्या मनाचा हळवा कप्पा. त्या कप्प्यात जपून ठेवलेलं असतं तिनं तिचं बालपण, अवखळ आणि खळाळतं किशोरवय, जाईच्या पाकळ्यांवरच्या दवासारखं अलवार तारुण्य आणि बरंच काही. गाण्यात न आलेलं हे एक कडवं...  

लदबदल्या आवळीस
अजून तीच घाई ऽ ग
चिमणीच्या दातांची
चव अवीट बाई ऽ ग

चिमणीच्या दातांनी खाल्लेली बोरं आणि चिंचांची गोड-आंबट-तुरट चव जिभेवर आजही जपून ठेवणाऱ्या माहेरवाशिणी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत सुरेश भट यांच्या या कवितेची ओढ वाटतच राहणार हे मात्र नक्की. खरंच स्त्रीच्या मनाची ठेवण, तिच्या अंतरातले उमाळे, हुंकार आणि वेदनाही कवीला कशा बरं कळत असतील? कवी सुरेश भट यांच्या कितीतरी कवितांमधून स्त्रीमनाचे अंतरंग अलगद उलगडून दाखवलेत त्यांनी. महिला दिनी ‘उंबरठा’ चित्रपटातील नायिकेच्या रूपात दिसलेली गुणी अभिनेत्री स्मिता पाटील हमखास आठवतेच. बुद्धिमान, चतुरस्र, कर्तृत्वाची झेप घेण्यासाठी सज्ज, पण तितकीच घराचा उंबरठा ओलांडताना व्याकूळ होणारी, पतीविरहात, वियोगात जळणारी! ‘सुन्या सुन्या मैफलीत’ सूर आळवणारी!! कवी सुरेश भट यांची ‘उंबरठा’ चित्रपटातील गझल आठवते.

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या... 

सुरेश भट यांच्या कवितेतला अबोल पारिजात, केव्हा तरी पहाटे उलटून गेलेली रात्र, मोगऱ्याचा सुगंध ल्यालेली दुलई, चांदण्यात विहरणारी कोजागरी, स्वप्नातल्या गावा घेऊन जाणाऱ्या वाटेवरचे कळलावे दिवे किंवा मालकंसी श्वास अशा सुकोमल, अलवार, हळुवार भावनांबरोबर ‘गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे’ असा निश्चयी स्वर, त्यांच्या कवितांमधून स्त्रीमनाचे अनेक पदर उलगडताना दिसतात. ‘मेंदीच्या पानावर’ हे गीत ऐकता ऐकता त्यांच्या इतर कवितांचीही आठवण येणं अपरिहार्य होऊन जातं. कविमन माहेरवाशिणीची आईसुद्धा होतं. म्हणून तर कवी लिहितो आईच्या भावनेतून -

अजून तुझे हळदीचे
अंग अंग पिवळे ऽ ग
अजून तुझ्या डोळ्यातील
मोठेपण कवळे ऽ ग

इथे लेकीचं कवळेपण अधोरेखित करण्यासाठी संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकरांनी लतादीदींकडून ‘कवळे ऽ ग’ या शब्दांची पुनरुक्ती करायला लावली असं वाटतं. गाण्यातली लय, स्वर आणि सूर या त्रिवेणी संगमावर रसिक झुलत राहतोच. कवितेतल्या शब्दांना सुरांच्या साह्याने अधिकच अर्थवाही करण्याची कला मंगेशकर परिवारात उपजतच आहे. याचा प्रत्यय म्हणजे सुरेश भट यांच्या कविता. लतादीदींनी सुरेश भट यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटलंय ‘काव्य असो की गाणे असो, त्यात बुद्धीच्या चपल आणि तल्लख विलासापेक्षा भावनेचा जिवंत जिव्हाळा हाच शेवटी आपल्या मनाला जाऊन भिडतो आणि नंतरही दीर्घ काळ तिथे रेंगाळत राहतो.’ किती खरंय ना हे दीदींचं म्हणणं. आपण तर सारे हेच अनुभवतोय वर्षानुवर्षं! ‘मेंदीच्या पानावर’ हे गाणं आपण ऐकतो आणि आनंदानं डोलत राहतो. ‘माहेरवाशीण’ या कवितेचं पं. हृदयनाथांनी काही कडवी घेऊन केलेलं गाणं आजही आपलं मन मोहरून टाकतं. दीदींचे स्वर आणि सुरेश भट यांचे शब्द घेऊन जातात मेंदीच्या पानावर, जाईच्या पाकळ्यांवर. आठवत राहतं ते अवघं बालपण आणि माहेरचं अंगण. शेवटचं कडवं गाण्यात नाही, ते असं -

आज कसे आठवले
बघ तुलाच भलते ऽ ग
मेंदीच्या पानावर
मन अजून झुलते ऽ ग
झुलते ऽ ग

कवी सुरेश भट यांच्या स्वरांनी मोहरलेल्या कविता ऐकत राहू या त्यांनी एका गझलेत म्हटल्याप्रमाणे -

गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी
आयुष्य राहिलेले जाळून मोहरू या
ऐकू नकोस काही त्या दूरच्या दिव्यांचे
माझ्या तुझ्या मिठीने ही रात्र मंतरू या 

अतिउच्च पातळीवर घेऊन जाणारी अशी प्रीतीची भावना असो, की काळरात्रीचा अंधार दूर करण्यासाठी पेटवलेली सामाजिक भावनेची मशाल असो, दुभंगून जाता जाता अभंग करणारा आशावाद असो, की स्त्रीमनाची हळुवार स्पंदनं असोत, कवी सुरेश भटांच्या काव्यप्रतिभेनं दिलेलं दान रसिकांनी हृदयाच्या ओंजळीत जपून ठेवलंय. त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करताना त्यांच्या कवितेचं हे मेंदीचं पान गाण्यातून कसं मोहरलंय याचा अनुभव घेऊ या.

मेंदीच्या पानावर
मन अजून झुलते ऽ ग.... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search