Next
‘चंद्र, सूर्यही नतमस्तक व्हावेत, अशी माणसे इथे जन्मली’
जेष्ठ ऐतिहासिक लेखक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे प्रतिपादन
BOI
Monday, January 07, 2019 | 04:05 PM
15 0 0
Share this storyसोलापूर : ‘माणसाने खऱ्या साहित्यावर प्रेम केले पाहिजे. पूर्वी पाटील म्हणाल्यावर तमाशा, ऊस आणि कुस्ती याच फडाची आठवण यायची; परंतु मला मात्र, ती मर्यादा मोडित काढून शब्दांच्या फडात रमायला आवडायचे म्हणूनच मागील ३० वर्षांपासून मी शब्दांच्या गुऱ्हाळात रमत आहे आणि त्यातूनच साहित्य निर्मिती करत आहे. ऐतिहासिक लेखन करताना असे दिसून आले, की आपल्याकडे एवढी मोठी माणसे जन्मली की ज्यांच्यासाठी चंद्र आणि सूर्यालादेखील नतमस्तक व्हावे असे वाटेल. अशा थोर व्यक्तींवर लिखाण केल्यामुळे समाज मला ‘पानिपत’पासून खऱ्या अर्थाने ओळखू लागला,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ ऐतिहासिक लेखक विश्वास पाटील यांनी केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता यावे केवळ याच हेतूने ‘पानिपत’कार पाटील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये (स्वेरी) आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ ग्रामीण साहित्यकार डॉ. द. ता. भोसले यांनी भूषविले. दीपप्रज्वलनानंतर पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘तरुण मित्रांनो लढा आणि घडा’ असा मौलिक संदेश दिला.पाटील म्हणाले, ‘शब्द हे जपून वापरावे. कारण मराठी भाषा ही केवळ वाघिणीचे दुध नसून नागिणीचे विषदेखील आहे. मराठी भाषा पाहिजे, तशी वळविता येते. एकदा लेखन सुरू केले, की शब्द आपोआप धावून पुढे येतात. या शब्द मालिकेतूनच पुढे महानायक, पांगिरा, झाडाझडती, रणांगण, चंद्रमुखी हे साहित्य घडले. शिवकालात विविध रांजणाच्या मदतीने शिवाजी महाराजांनी गडाखालून पाणी गडावर नेले. यावरून ते एक मोठे शास्त्रज्ञ होते हेदेखील सिद्ध होते. इतिहासात मराठ्यांच्या स्त्रियांनीदेखील पराक्रम केला आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. यासाठी ऐतिहासिक मालिका निर्माण होणे गरजेचे आहे. तरुणांनी व्यक्तिमत्व विकासासाठी महापुरुषांचे आत्मचरित्र वाचावे.’

‘स्त्री जातीचा गौरव करणाऱ्या राजाला अलीकडील काही लेखक बदनाम करत आहेत, हे मोठे दुर्दैव आहे. जीवनात मोठे व्हायचेच असेल, तर मित्रांबरोबर शत्रूंचाही अभ्यास केला पाहिजे.’ असे सांगून ‘भविष्यात दुर्गाबाईचे पुतळे घराघरात लावले जातील असे दुर्गाबाईंचे योगदान आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘स्वेरी’ संस्थेविषयी बोलताना पाटील म्हणाले, ‘माणूस कसा घडतो आणि कुठे घडतो हे महत्त्वाचे आहे. अल्पावधीत यश मिळविणारे अनेक असतात. थोड्या यशाने हुरळून जाणारेही असतात; पण मिळविलेले यश पचविणारे फार कमी असतात. येथील मुलींची प्रचंड गर्दी पाहता ‘स्वेरी’ची ही पुण्याईच आहे.’
 


‘स्वेरी’चे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी पाटील यांचे स्वागत करताना ‘पाषाणालाही पाझर फोडण्याचे कार्य साहित्यिकांकडे असते’ असे सांगितले.

अध्यक्षीय भाषण करताना साहित्यिक डॉ. भोसले म्हणाले, ‘आयुष्य हे पूर्णत्वाकडे न्यायचे असेल, तर समाजासाठी, देशासाठी जगले पाहिजे. यासाठी जीवनाकडे पाहताना निदान एकतरी पुस्तक वाचले पाहिजे. कारण साहित्य हे आत्म्याच्या उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.’

या वेळी अॅड. अर्जुन पाटील, साहित्यिक शिवाजीराव बागल, पंढरपूर व पंचक्रोशीतील साहित्यिक, पत्रकार, ‘स्वेरी’चे विश्वस्त सुरज रोंगे, डॉ. विश्वास मोरे, ‘स्वेरी’अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कोरे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांसह अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए या विभागातील पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीमधील जवळपास चार हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun Mali About 71 Days ago
Khupach Chhan
0
0

Select Language
Share Link