Next
महात्मा फुले, अशोक जैन, सुमेध वडावाला (रिसबूड), सुनीलकुमार लवटे
BOI
Wednesday, April 11, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

थोर समाजसेवक आणि लेखक महात्मा फुले, सव्यसाची आणि अभ्यासू पत्रकार अशोक जैन, लेखक सुमेध वडावाला (रिसबूड) आणि कष्टसाध्य यश मिळवून समाजसेवा करणारे लेखक सुनीलकुमार लवटे यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
....... 
ज्योतिराव गोविंदराव फुले
११ एप्रिल १८२७ रोजी कटगुणमध्ये (जि. सातारा) जन्मलेले ज्योतिराव गोविंदराव फुले हे आपल्या कार्याने ‘महात्मा’ उपाधी प्राप्त झालेले थोर विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक होते. असं मानतात, की त्यांचं मूळ आडनाव ‘गोऱ्हे’ होतं; पण घरच्या फूलविक्रीच्या व्यवसायामुळे ते घराणं फुले याच आडनावाने ओळखलं जाऊ लागलं. 

त्यांनी कायमच पुरोगामी विचारांचा प्रसार केला. बहुजन आणि शेतकरी समाजासाठी त्यांनी काम केलं. अशिक्षितपणामुळे बहुजन समाज आणि विशेषतः स्त्रिया प्रगतीपासून वंचित राहतात हे जाणून त्यांनी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली.

गुलामगिरी, इशारा, शेतकऱ्याचा आसूड हे त्यांचं लेखन प्रचंड गाजलं. त्यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहिलं. तसंच पोवाडे आणि अभंगही लिहिले होते. शिक्षणाला प्रचंड महत्त्व देणाऱ्या फुल्यांनी ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीति गेली, नीतिविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले!’ असं ठणकावून सांगितलं होतं. ‘अखंड’ प्रकारची काव्यरचना करून त्यातून त्यांनी समाजप्रबोधनासाठी काव्यनिर्मिती केली. उदाहरणार्थ -

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी ।। त्याचे भय मनी ।। धरा सर्व ।।१।।
न्यायाने वस्तूंचा उपयोग घ्यावा ।। आनंद करावा ।। भांडू नये ।।२।।
धर्म राज्य भेद मानवा नसावे ।। सत्याने वर्तावे ।। ईशासाठी ।।३।।
सर्व सुखी व्हावे भिक्षा जी मागतो ।। आर्यास सांगतो ।। जोती म्हणे ।।४।।

सत्सार अंक १ आणि २, सत्यशोधक सामाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, अखंडादी काव्य रचना, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा - अशी त्यांची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचं पुण्यात निधन झालं.

(ज्योतिराव फुले यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

अशोक चंदनमल जैन

११ एप्रिल १९४४ रोजी घोडेगावमध्ये (पुणे) जन्मलेले अशोक चंदनमल जैन हे सव्यसाची पत्रकार, लेखक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरुवात ‘तरुण भारत’ आणि ‘सकाळ’मधून करून नंतर महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात सहसंपादक आणि कार्यकारी संपादक म्हणून त्यांची कामगिरी चांगलीच गाजली होती. त्यांच्या नावाचा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात दबदबा होता.

महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीत गेल्यावर त्यांनी तिथून चालवलेलं ‘राजधानीतून’ हे साप्ताहिक सदर त्यांच्या व्यापक आणि चोखंदळ दृष्टीमुळे आणि खेळकर भाषेमुळे चांगलंच लोकप्रिय ठरलं होतं. तसंच ‘कलंदर’ या टोपण नावाने त्यांनी ‘कानोकानी’ हे सदर चालवलं, तेही त्यातल्या मिश्कील निरीक्षणांमुळे लोकांना आवडायचं. तत्कालीन नेत्यांच्या खासगीतल्या गप्पा, गॉसिप्स, राजकीय गौप्यस्फोट वगैरेंसंबंधी लिहून त्यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लेखनशैलीमुळे त्यांनी वार्तापत्रांचा बाज बदलून टाकला होता.

त्यांनी सत्यजित रे यांच्या ‘फेलुदा’ या प्रसिद्ध डिटेक्टिव्ह व्यक्तिरेखेच्या सर्व पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आणि ते वाचकांच्या पसंतीला उतरले.  

अंतस्थ, कानोकानी, आणखी कानोकानी, अत्तराचे थेंब, डॉक्युमेंट, लतादीदी, लक्ष्मणरेषा, वॉकिंग विथ दी लायन, शेषन, इंदिरा -अंतिम पर्व, ...आणि प्राण, इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१८ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं.

(अशोक जैन यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..............

सुमेध श्रीकृष्ण रिसबूड 

११ एप्रिल १९६२ रोजी रत्नागिरीमध्ये जन्मलेले सुमेध श्रीकृष्ण रिसबूड हे ‘सुमेध वडावाला (रिसबूड)’ या आगळ्या नावाने ललित लेखन करणारे कथाकार आणि चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

बदलत्या नीतिमत्तेचा वेध घेणारी आणि अथपासून इतिपर्यंत केवळ संवादांतून साकारलेली १९२ पृष्ठांची ‘धर्मयुद्ध’ ही त्यांची कादंबरी लक्षणीय आहे. 

अनुभवंती, आई ती आईच, काही काही माणसं!, चित्रं, तृष्णा, दोन चाकं झपाटलेली, थोरवी, प्रदीप लोखंडे, ब्रह्मकमळ, मनश्री, मी, नंदा, जल आक्रमिले, संदर्भासहित स्पष्टीकरण, सफाई, सांजवा, हेडहंटर, अशी त्यांची पुस्तकं गाजली आहेत. 

त्यांच्या ‘मनश्री’ या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. 

खेडमध्ये (रत्नागिरी) भरलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

(सुमेध वडावाला यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
...........

डॉ. सुनीलकुमार लवटे 

११ एप्रिल १९५० रोजी जन्मलेले डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणजे अनाथालय आणि नंतर रिमांड होममधल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत, स्वबळावर, चिकाटीने शिकून पुढे लेखक आणि समाजसेवक म्हणून नाव कमावलेलं व्यक्तिमत्त्व! 

लहानपणी वि. स. खांडेकर आणि साने गुरुजी यांच्या साहित्याने त्यांच्या मनावर संस्कार केले होते. पुढे शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी लेखन सुरू केलं. आपल्यावर प्रभाव असणाऱ्या वि. स. खांडेकरांचं अप्रकाशित साहित्य गोळा करून त्यांनी ते प्रकाशित केलं. एवढंच नव्हे, तर कोल्हापुरात वि. स. खांडेकरांचे म्युझियमसुद्धा उभारले. 

‘खाली जमीन वर आकाश’ हे त्यांच्या दुर्दम्य झगड्याची कहाणी सांगणारं आत्मचरित्र विलक्षण गाजलं.

आत्मस्वर, भारतीय साहित्यिक, दु:खहरण, दुसरे प्रोमिथियस : महात्मा गांधी, एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण, जीवनशिल्पी, क्षितिजस्पर्श, मुखवटे, निराळं जग, निराळी माणसं, प्रेरक चरित्रे, रानफुले, ऋतू न्याहाळणारं आकाश, साहित्यशिल्पी, समाजशिल्पी, समकालीन साहित्यिक, सरत्या सरी, शब्द सोन्याचा पिंपळ, वन्ही तो चेतवावा, विकसन, भाऊबीज, अजून येतो वास फुलांना, नवे शिक्षण नवे शिक्षक, वंचित विकास : जग आणि आपण, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(सुनीलकुमार लवटे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link