Next
‘एमएसआरए’ राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत चोत्रानी व पटेल यांनी गाजवला उद्घाटनाचा दिवस
BOI
Saturday, June 15, 2019 | 06:24 PM
15 0 0
Share this article:

खासदार गिरीश बापट स्क्वॅश खेळून स्पर्धेचे उद्घाटन करताना

पुणे : ‘महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटने’(एमएसआरए)च्या वतीने आयोजित व ‘स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ‘एमएसआरए-७६व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश २०१९ अजिंक्यपद’ स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सुनीता पटेलने, तर पुरुष गटात वीर चोत्रानीने मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उद्घाटनाचा दिवस गाजवला. 

१३ जूनपासून पुण्यात सुरू झालेल्या या स्पर्धेत देशभरातील २५ राज्यांमधून ४७४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. आशियायी स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळलेले खेळाडूदेखील या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे जागतिक रॅंकिंगमधील ज्योत्स्ना चिनप्पा, महेश मांडगावकर उर्वशी जोशी हे खेळाडू या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहेत. ‘ओपन ग्लास कोर्ट’वर हे सामने होणार असून, यानिमित्ताने ओपन ग्लास कोर्टवर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणारे पुणे हे देशातील दुसरे शहर ठरले आहे. 

अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोद्रे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धांमध्ये पहिल्या फेरीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या वीर चॊत्रानी याने महाराष्ट्राच्या अकराव्या मानांकित ऐश्वर्य सिंगचा ९-११, ११-५, १०-१२, ११-३, ११-३ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.

महिला गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत सुनीता पटेल हिने पाचव्या मानांकित मध्यप्रदेशच्या राधिका राठोरचा ११-५, १२-१०, ९-११, ११-४ असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. सहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या सानिका चौधरी हिने आपलीच राज्य सहकारी दिया मुलाणीचा १३-११, ११-६, ११-२ असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या चौथ्या मानांकित तन्वी खन्नाने महाराष्ट्राच्या योश्ना सिंगला पराभूत करून आगेकूच केली.  

संयोजन समितीचे अध्यक्ष व पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट, कैलाश कोद्रे, जहांगीर हॉस्पिटलचे सर कावसजी जहांगीर आणि लेडी जास्मिन जहांगीर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी ‘एमएसआरए’चे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, सचिव डॉ. ए. दयानंद कुमार, ‘पीडीएसए’चे अध्यक्ष कालिदास मगर, सचिव आनंद लाहोटी, पवन राऊत, गणेश तांबे, आनंद सुरोडकर, ज्ञानेश भावसार, डॉ. संदीप जगताप, डॉ. आकाश शहा, मरीशा जिल्का आणि आसिफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. 

(‘महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदिप खांड्रे यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search