Next
वृद्धत्वाला दूर ठेवू या..
BOI
Wednesday, June 06, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


आयुष्यातील वयाचे काही टप्पे महत्त्वाचे मानले जातात. सोळावे किवा अठरावे वर्ष ही तरुणींची अनेक अर्थांनी सुखाची वर्षे असतात. बावीस ते अठ्ठावीस ही वर्षे लग्नासाठी म्हणून विशेष आहेत. वयाची ‘चाळिशी’ हा टप्पाही विशेषत्वाने स्त्रियांमध्ये चर्चेचा किंवा लाडका विषय ठरतो, तो अनेक कारणांनी.... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या चाळिशीतल्या पोषणाबद्दल... 
.................
चाळिशीचा चष्मा, चाळिशीत थोडेफार पांढरे होणारे केस (आजकाल तरुण मुलांचे केसही पांढरे असतात हा मुद्दा वेगळा), या बदलांप्रमाणेच महिलांमध्ये चाळिशीत अनेक बदल होत असतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संप्रेरकांमध्ये (हॉर्मोन्स) होणारे बदल. या वयात मासिक पाळी हळूहळू अनियमित होते व त्या अनुषंगाने अनेक मानसिक बदल व शारीरिक बदल जाणवायला लागतात. आरसासुद्धा बरेच काही सांगू लागतो. माझे खरे वय काय? मी दिसते किती वर्षांची, असे आपले आपल्यालाच वाटू लागते.

दिवस जसे जसे पुढे जाऊ लागतात, तसे लक्षात येऊ लागते, की आपण आपल्या वयापेक्षा जास्त पोक्त दिसत आहोत. हे खरे वय म्हणजे ‘क्रोनोलॉजिकल एज.’ हे वय आपण थांबवू शकत नाहीच. प्रत्येक दिवसाला ते वाढतच जाणार यात शंका नाही; पण दुसरे वय आहे ज्याला ‘बायोलॉजिकल किंवा फिजिऑलॉजिकल एज’ म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर ४० वर्षांचा माणूस दिसतो पन्नाशीचा व शरीरातील अवयवसुद्धा खऱ्या वयापेक्षा दमलेले, थकलेले व झिजलेले असतात. खऱ्या वयापेक्षा मोठे दिसण्याची अनेक कारणे आहेत. जसे प्रदुषित वातावरण, दुय्यम व चुकीचा आहार, व्यायामाची कमतरता, बैठी जीवनशैली इत्यादी.., पण ह्या सगळ्यांवर मात केल्यास आपण आपले बायोलॉजिकल वय नियंत्रणात ठेवू शकतो. 

आपले शरीर हाडे, स्नायू, वेगवेगळे अवयव व अनेक प्रकारचे द्रव यांचे बनलेले आहे. काही स्नायू अविरत काम करतात. उदा. हृदयाचे स्नायू किंवा रोज आपण शेकडो वेळा वेगवेगळ्या हालचाली करत असतो ते सांधे व हाडे. यांची काळजी घेतलीच पाहिजे. बायोलॉजिकल वयावर आपल्याला ताबा मिळवता येतो का? तर उत्तर हो असेच आहे. त्यासाठी पुढील प्रकारे काळजी घेता येईल... 

हृदय - हा अत्यंत महत्त्वाचा अवयव जो अविरत कार्य करतो. याची काळजी न घेतल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हृदय हे आपोआप काम करणाऱ्या स्नायूंचे बनलेले आहे. मग न थांबणाऱ्या स्नायूंची काळजी पण आपल्याच हातात आहे व ती घेणेही सोप्पे आहे. काही अवघड नाही. यासाठी केवळ वाईट सवयींपासून लांब राहणे आवश्यक आहे. तंबाखू, सिगरेट, दारू किंवा इतर पेये नकोत. रोज चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे एरोबिक, प्राणायाम यांसारखे व्यायाम करा. कमी तेलाचा आहार घ्या. ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवा. म्हणजे तुमचे हृदय आनंदी राहील. 

मेंदू - जसे वय वाढते, तसे स्मरणशक्ती, आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो. ज्ञानेंद्रियांची क्षमता कमी होते आहे, असे जाणवते. यासाठी मेंदूलासुद्धा व्यायाम हवा. नोकरी सुरू असेल, तर उत्तमच आहे, पण नसल्यास वेगवेगळे छंद जोपासा, वाचन करा, विचारांचे आदान-प्रदान करा. उत्तम व्याख्याने ऐका. एका संशोधनात असे लक्षात आले आहे, की वरील गोष्टींमध्ये जे सहभागी असतात, ते जास्त सजग असतात व त्यांची बुद्धी धारदार असते. शेवटी, ‘युज इट ऑर लूज इट..’

स्नायू - शरीराच्या सर्व हालचाली स्नायूंमुळे होतात. उठणे, बसणे, चालणे, ढकलणे, वजन उचलणे इत्यादी. आपले शरीर प्रचंड लवचिक असते, पण त्या लवचिकतेचा आपण कधी फायदा पण घेत नाही आणि अनुभवही घेत नाही. त्यामुळे हे स्नायू आक्रसत जातात. नंतर पाठ, कंबर, गुडघे इत्यादी दुखण्यास सुरुवात होते.  त्यामुळे अवयवांची क्षमता भरपूर आहे; पण ह्या क्षमतेचा वापर, हालचाल होत नाही, हीच खरी अडचण आहे.  

यासाठीच सर्वांगीण व्यायाम गरजेचा आहे. अनेक लोक फिरायला जातात. चाळिशीनंतरचा हा सर्वोत्तम व्यायाम समजला जातो. एका प्रमाणात हे खरेही आहे; पण स्नायूंमुळे होणाऱ्या हालचाली कायम होत राहाव्यात असे वाटत असल्यास थोडे स्ट्रेचिंगचे व्यायामसुद्धा चालण्याच्या व्यायामाच्या जोडीला असणे आवश्यक आहे. योगासने आहेतच व त्यासोबत हृदयाची गती थोडी वाढवणारे व्यायामही करावेत. ह्यामध्ये एखादा खेळ, पोहणे, सायकलिंग, व्यायामशाळेत निम्न आघाताचे एरोबिक्स, हेसुद्धा उत्तम व्यायाम आहेत. चाळीशीनंतर शरीरातले कॅल्शियम हळू हळू कमी होऊ लागते. हाडांची घनता कमी झाली असल्याचे डॉक्टर आपल्याला सांगतात. त्यासाठी आधीपासूनच थोड्या  वजनाचे डम्बेल्स  घेऊन व्यायाम केल्यास आपली  ताकद उत्तम राहते. हाडांची घनता किंवा कॅल्शियमचे प्रमाण स्थिर राहते. या सगळ्यांसोबत उत्तम आहाराची जोड तर आवश्यकच आहे.  चला तर मग, वाढत्या वयाला आनंदाने तोंड देऊन तरुण राहण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करू या.    

- आश्लेषा भागवत
मोबाईल : ९४२३० ०८८६८
ई-मेल :  ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत. ‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link