Next
‘उत्पादनांच्या डिझाइनमध्ये महिला वापरकर्त्यांचा विचार गरजेचा’
पुष्कर इंगळे यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, April 29, 2019 | 04:27 PM
15 0 0
Share this article:

कार्यक्रमात बोलताना कोहेझिव्ह लॅब्सचे संस्थापक आणि डिझाइन डिरेक्टर पुष्कर इंगळेपुणे : ‘मोबाइलचा स्क्रीन मोठा असल्याने तो महिलांच्या हातात अथवा जीन्सच्या खिशात बसत नाही, वाहनांची अपघात चाचणी ही पुरुषडमीवर केली जाते, अगदी बाळंतपणाच्या वेळी गरोदर महिलेपेक्षा डॉक्टरांच्या सोयीचा विचार करून तयार केलेला डिलिव्हरीबेड वापरला जातो. अशा अनेक उदाहरणांमधून महिला वापरकर्त्यांकडे उत्पादकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ही परिस्थिती बदलणे गरजेचे असून, पुरुष वापरकर्त्यांप्रमाणे महिलांचाही त्या वस्तूंचा वापरकर्ता म्हणून विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन कोहेझिव्ह लॅब्सचे संस्थापक आणि डिझाइन डिरेक्टर पुष्कर इंगळे यांनी केले.

‘आयआयटी’ मुंबईच्या इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर अर्थात ‘आयडीसी’च्या माजी विद्यार्थ्यांच्या पुणे शाखेतर्फे जागतिक डिझाइन दिवसानिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘डिझाइन क्षेत्रातील महिला आणि महिलांसाठी केलेले डिझाइन’ ही या वर्षीच्या ‘डिझाइन डे’ची संकल्पना होती. ‘आयडीसी’च्या स्थापनेला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांकडून या वर्षात देशभरातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आयआयटी मुंबई माजी विद्यार्थी संघटनेची पुणे शाखा आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया अर्थात ‘एडीआय’ यांचे सहकार्य कार्यक्रमाला मिळाले होते.

उल्का नाडकर्णी यांचा सत्कार करताना माजी विद्यार्थी

‘आयडीसी’चे संस्थापक सुधाकर नाडकर्णी यांच्या पत्नी उल्का नाडकर्णी यांचा माजी विद्यार्थ्यांतर्फे या वेळी सत्कार करण्यात आला. डिझाइन क्षेत्रात आपल्या पतीला उत्तम कामगिरी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल कृतज्ञता म्हणून विद्यार्थ्यांनी हा सत्कार केला गेला. या वेळी योगेश दांडेकर, प्रसन्न हळबे, ऋग्वेद देशपांडे, नचिकेत ठाकूर, पंकज झुंजा, मेरीअन झुंजा आणि रवींद्र राजहंस उपस्थित होते.

या प्रसंगी इंगळे म्हणाले, ‘एखाद्या वस्तूला वा उपकरणाला गुलाबी रंग दिला आणि त्याचा आकार थोडा लहान केला की ती वस्तू महिला वापरकर्त्यांसाठी तयार झाली, असे चित्र बाजारातील उत्पादनांमध्ये दिसून येते. ते बदलण्याची प्रकर्षाने गरज आहे. मी महिलांचे आरोग्य आणि त्या संबंधातील डिझाइन या क्षेत्राकडे वळलो आणि माझा दृष्टीकोन बदलला. आरोग्य क्षेत्रात महिलांना सहज वापरता येण्याजोग्या अनेक गोष्टी बनवता येतील आणि त्या उपलब्ध करून दिल्यास जगभरातील महिलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होऊ शकतो याची मला जाणीव झाली.’

‘यामध्ये ‘कांगारू मदर केअर बॅग’ खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण ठरली. जगभरात वापरण्यात येत असलेली ही बॅग लहान मुलांचा विचार करून बनविण्यात आली होती; मात्र त्यात काही बदल करून आम्ही ती आईच्या दृष्टीने उपयुक्त बनविण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. जगभरात दरवर्षी २.६ दशलक्ष बालके जन्माला येतात यातील ३० टक्के बालके ही गरोदर महिलेचे पूर्ण दिवस भरण्याआधी जन्माला येतात त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते; मात्र आम्ही तयार केलेल्या ‘कांगारू मदर बॅग’मध्ये या बालकांना ठेवल्यास त्यांचा आईच्या त्वचेशी संपर्क येऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले,’ अशी माहिती इंगळे यांनी दिली.

अशाच एका डिझाईनबद्दल सांगताना इंगळे म्हणाले की, ‘बाळंतपणानंतर अनेक महिलांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. महिला रक्तक्षयग्रस्त असेल, तर त्या परिस्थितीत तिच्या जीवाला धोका असू शकतो. याचा विचार करून हा रक्तस्राव कसा रोखावा याचे प्रशिक्षण देणारे मॉडेल आम्ही डिझाइन केले आहे. या मॉडेलच्या मदतीने गावागावातील परिचारिका आणि आरोग्य सेविकांना विनासंकोच प्रशिक्षित करता येऊ शकते. यामुळे अनेक महिलांचे प्राणही वाचविता येऊ शकतात.’

मार्गदर्शन करताना स्टुडिओ कॉपरच्या संस्थापिका रश्मी रानडेस्टुडिओ कॉपरच्या संस्थापिका रश्मी रानडे यांनी तांब्याच्या वस्तूंच्या त्यांनी बनविलेल्या कालसुसंगत डिझाइन्सबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘आज भारतात २५० दशलक्ष नागरिक हे हस्तकला वस्तूंच्या व्यवसायाशी जोडलेले आहेत. शेतीनंतर हस्तकला हा आज भारतातील नागरिकांसाठी रोजगाराचा मोठा स्त्रोत आहे. याच गोष्टी लक्षात घेत आम्ही कारागिरीबरोबरच उत्तम डिझाइन यांचा मेळ साधून आणत रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहोत. याद्वारे आम्ही कारागिरांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांची कला सादर करण्याच्या संधी बरोबरच त्यांना रोजगाराचे एक सक्षम साधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यामध्ये या डिझाइन्सनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. आपल्या इतिहासाशी निगडीत या वस्तूंनी आपले भविष्य आणखी उज्ज्वल करण्याचीच ही एक संधी आहे.’   

स्त्रिया या फक्त स्त्रियांसाठी असलेली साधनसामग्री आणि फॅशन डिझायनिंग याच क्षेत्रात काम करू शकतात या समजुतीला छेद देत काम करण्याची संधी मिळाल्याचे समाधान या वेळी टाटा मोटर्स ‘ईआरसी’च्या महाव्यवस्थापिका चारुता पलसोडकर यांनी व्यक्त केले. पलसोडकर यांनी व्यावसायिक वापरासाठीचे ट्रक आणि लष्करासाठी वापरण्यात येत असलेल्या सुरुंग प्रतिरोधक वाहनाच्या डिझाइनची निर्मिती केली आहे.

मुंबईच्या एनएमआयएमएस, बळवंत शेठ स्कूल ऑफ आर्किटेक्टच्या अधिष्ठाता अपर्णा सुर्वे, मुंबई ‘एनआयएफटी’च्या शैक्षणिक प्रमुख रूपा अगरवाल, ग्राफिक डिझाइन कन्सल्टन्ट वंदना बालवल्ली यांचीदेखील या वेळी व्याख्याने झाली. शेवटच्या सत्रात आयोजित परिसंवादात टाटा रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाइन सेंटरच्या गेम डिझायनर आणि संशोधक वसुंधरा अग्रवाल, फायसव्ह इंडियाच्या ‘यू एक्स’ वास्तुविशारद आणि व्यवस्थापिका शैलजा भागवत, मर्सडीज बेंझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वरिष्ठ स्टाइलिंग व्यवस्थापिक पारुल प्रधान शर्मा आदी सहभागी झाले होत्या.

‘आयडीसी’ ही डिझाइनविषयक शिक्षण देणारी देशातील एक महत्त्वाची संस्था असून, तिच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थेमधून आजपर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर तब्बल अडीच हजारहून डिझायनर्स तयार झाले आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search