Next
नवले महाविद्यालयात डॉ. देसाई यांचे व्याख्यान
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, January 16, 2019 | 11:09 AM
15 0 0
Share this article:कुसगाव : येथील एन. बी. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांचे व्याख्यान झाले. प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून डॉ. देसाई यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.

मराठी भाषेचा इतिहास कथन करताना ते म्हणाले, ‘जगभरामधील ११२ हून अधिक देशांमध्ये १२ कोटींपेक्षा अधिक लोक मराठी बोलतात. उच्चकुलीन या अर्थाने प्रचलित असलेल्या अभिजात या संकल्पनेचा श्रेष्ठ दर्जाचा अशा प्रकारचा अर्थ होत गेला. प्रामुख्याने श्रेष्ठत्व असा अर्थ ‘अभिजात’ या शब्दाशी निगडित आहे. तांत्रिकदृष्ट्या प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा व सलगता हे निकष महत्त्वाचे आहेत. मराठी भाषा दोन हजार वर्षांपूर्वीची असून, अनेक दर्जेदार लिखाण सलगपणे झालेले असल्याने अभिजात भाषेसाठी असलेले सर्व निकष पूर्ण करते. फेब्रुवारी २०१५मध्ये साहित्य अकादमीच्या तज्ञांनी तसा अहवाल मंजूर करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडे सादर केला आहे. भारतामध्ये एकूण सहा भाषा अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या आहेत. त्यामध्ये तमिळ, तेलुगु, ओरिया, कन्नड, संस्कृत व मल्याळम या भाषांचा समावेश आहे.’

‘ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीची आधीची फार मोठी परंपरा मराठी भाषेस प्राप्त आहे. गाहा सत्तसई-गाथा सप्तशती हा आज उपलब्ध असलेला आद्य ग्रंथ म्हणजे ७०० लोककवितांचा संग्रह होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी संकलित करून संपादित केल्या. सातवाहनांच्या राजवटीमध्ये मराठी ही राजभाषा होती. अशा प्रकारची अनेक हस्तलिखिते प्राप्त आहेत. प्रत्येक मराठी घरांमध्ये ‘एक होता कावळा व एक होती चिमणी’ ही गोष्ट सांगितली जाते. ही गोष्ट पहिल्यांदा आठशे वर्षांपूर्वी लीळाचरित्रामध्ये चक्रधर स्वामींनी धानाई नावाच्या हट्टी मुलीला सांगितल्याचा उल्लेख आहे; परंतु मराठी लोक जीवनात हजार-बाराशे वर्षांपूर्वी ही कथा विलक्षण लोकप्रिय होती,’ अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली.‘तमिळ भाषेला अभिजात म्हणून दर्जा प्राप्त होण्यामध्ये संगम साहित्य साहित्याचा मोठा वाटा आहे. हे साहित्य दोन हजार ३०० वर्षांपूर्वीचे आहे. यामध्ये कावेरी नदीवरील धरण बांधले जात असल्याचा उल्लेख आहे. या धरणावर काम करणारे गवंडी हे मराठी बोलणारे होते. मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होण्याने केंद्र शासनाकडून मराठीच्या समग्र विकासासाठी ५०० कोटींचे अनुदान प्राप्त होऊन भारतामधील ५०० विद्यापीठांमध्ये या भाषेचा अभ्यास होऊ शकेल. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ तसेच, वाचन संस्कृती वाढवणे यासाठी उपयोग होऊ शकेल. जी भाषा रोजगार देते तीच जगते. मराठीची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी अभिजात दर्जा ही हा कळीचा विषय बनून राहिलेली आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

‘सर्व साहित्यिक व साहित्यप्रेमी मंडळींतर्फे प्रा. रंगनाथ पठारे समितीने तज्ञांच्या मदतीने मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असा अहवाल सादर केला असून, त्यामध्ये अभिजात दर्जा मिळण्यासाठी लवकर यश प्राप्त व्हावे हीच सदिच्छा आहे. मराठीला अभिजात दर्जा लवकर मिळून विश्वामध्ये मराठीचा गौरव व्हावा, अशी सर्व मराठी भाषिकांची तीव्र इच्छा आहे,’ असे त्यांनी सांगितले.  

या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते. प्रा. सतीश सोनवणे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayawant Desai About 217 Days ago
wonderful transliteration facility by Bytes of India!
0
0

Select Language
Share Link
 
Search