Next
मेजर डॉ. विपुल पाटील यांचा ‘कोथरूड भूषण’ पुरस्काराने गौरव
हा माझ्या कार्याचा गौरव : मेजर डॉ. विपुल पाटील
BOI
Monday, August 26, 2019 | 06:10 PM
15 0 0
Share this article:पुणे :
‘कोथरूड भूषण पुरस्कार दिल्याबद्दल आणि माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल मी कोथरूडवासीयांचे आणि ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चा आभारी आहे. हा माझ्या कार्याचा गौरव आहे. सैन्यात कार्य करण्याची प्रेरणा मला कोथरूडमधूनच मिळाली. हा पुरस्कार त्या प्रत्येकाचा आहे, ज्यांच्या मनात प्रखर राष्ट्रप्रेम आहे,’ अशी भावना ब्लॅक कॅट कमांडो (एनएसजी) मेजर डॉ. विपुल पाटील यांनी व्यक्त केली.

‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’च्या वतीने त्यांना २०१९चा कोथरूड भूषण पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील हास्यसम्राट आणि सिनेकलाकार भाऊ कदम यांच्या हस्ते मेजर विपुल पाटील यांना गौरविण्यात आले. २४ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

या वेळी ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चे संस्थापक राहुल म्हस्के, अध्यक्ष गिरीश गुरनानी, राहुल कदम, ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. 

‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट फक्त पारंपरिक कार्य करत नसून, सामाजिक कार्यातदेखील अग्रेसर आहे. ट्रस्टचा नेहमीच सामाजिक कार्यात उल्लेखनीय सहभाग असतो,’ असेही मेजर पाटील म्हणाले. 

मेजर डॉ. विपुल पाटील हे ‘एनएसजी’मध्ये ब्लॅक कॅट कमांडो, स्क्वाड्रन कमांडर आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवरील अनेक यशस्वी मोहिमांमध्ये सहभाग घेतलेले मेजर पाटील मूळचे कोथरूडचे आहेत. 

कार्यक्रमाचे यंदा आठवे वर्ष होते. ‘बढेकर ग्रुप’, ‘वेंकीज’ आणि ‘गोयल गंगा ग्रुप’ हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक होते. कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना ट्रस्टच्या वतीने ‘कोथरूड भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. 

मेजर डॉ. विपुल पाटील यांनी युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले आहे. एनडीए, एएफएमसी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये ते प्रशिक्षक आहेत. जगातील सर्वांत उंच व खडतर अशा सियाचीन येथील युद्धक्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search