Next
शेअर्सची हलवाहलवी लाभदायी
BOI
Sunday, March 11, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

एकदा शेअर्स घेतले म्हणजे झाले, असे होत नसते. त्यांच्या भावातील चढ-उताराकडे लक्ष ठेवून योग्य वेळी त्याची विक्री करून नवीन शेअर्स घेणे, हे महत्त्वाचे ठरते. याबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
.....
एका कवीने ‘जीवन म्हणजे अनुभवाच्या चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे’ असे म्हटले आहे. त्याच धर्तीवर शेअर बाजार म्हणजे विविध बातम्यांच्या चुलीवरल्या अर्थविषयक कढईतले कांदेपोहे असे म्हणता येईल. कांदेपोहे जसे कालथ्याने सतत हलवावे लागतात, नाही तर ते करपतात, तसेच गुंतवणुकीतले शेअर्सही परिस्थितीनुसार हलवले पाहिजेत. बदलले पाहिजेत. अशी हालचाल केली तरच भागभांडारात वृद्धी होऊ शकते. 

सध्या रेप्को होम फायनान्स शेअर ५४७ रुपयांना, तर दिवाण हाउसिंग फायनान्स शेअर ४९७ रुपयांना आहे. ‘रेप्को होम फायनान्स’चे शेअर विकून ‘दिवाण हाउसिंग’चे घेतल्यास, दर हजार शेअर्सच्या हलवाहलवीत ५७ हजार रुपयांचा फायदा होईल. ‘दिवाण हाउसिंग’ वाढला, की तो विकून पुन्हा ‘रेप्को होम फायनान्स’मध्ये जाता येईल. ‘एडलवाइज’ विकून ‘अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स’चे समभाग विकत घेता येतील. अशा रितीने आपल्या भागभांडवलाची पुनर्जुळणी, भाव  बघून काही वेळा करता येईल. शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात पूर्वी आपण ‘DREAM’ हा शब्द बघितला होता. त्यातले ‘R’ हे अक्षर ‘ROTATION’ साठी आहे. 

शेअर बाजारातील गुंतवणूक ही धनुष्याला लावलेल्या दुसऱ्या प्रत्यंचेसारखी असते. दोन्ही प्रत्यंचांचा सारखा वापर करून त्या तंदुरुस्त ठेवायच्या असतात. गुंतवणूक ही केवळ बचतीचे रूपांतर नसते. त्यावर जास्त परतावा मिळण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागते. त्यासाठी सतत वाचन, मनन, अभ्यास यांची गरज असते. अशा अभ्यासानेच ज्ञान व संपती वाढते.

ईशान्येच्या तीन राज्यांतील निवडणुका भाजपने जिंकल्यामुळे आता प्रशासनात स्थैर्यच येणार आहे. कर्नाटक, राजस्थानमधील विधानसभांच्या निवडणुकीनंतर २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांचे ढोलताशे वाजू लागतील; पण सर्वसामान्यपणे सध्याच्या शासनाला धोका नाही. अर्थव्यवस्था मजबूतच राहील व त्यामुळे शेअर बाजारातील प्रासंगिक तेजी-मंदी सोडल्यास, निफ्टी व निर्देशांक वाढतच राहतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक १०-१२ शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर वर्षभरात २५ ते ३० टक्के नफा मिळायला हरकत नाही; मात्र त्यावर अल्प मुदत व दीर्घ मुदत भांडवल नफ्यातील कर एप्रिलपासून द्यावा लागेल. वर्षभरापूर्वी घेतलेले शेअर्स सध्या ३१ मार्चपर्यंत विकले, तर नफा करमुक्त असेल. 

बाजार सध्या शांत तळ्याप्रमाणे किरकोळ तरंग वगळता स्तब्ध आहे. या महिन्याअखेर बहुतेक कंपन्यांचे आर्थिक वर्ष संपेल व त्यांचे ताळेबंद मे अखेरपर्यंत जाहीर होतील. मार्च तिमाहीचे आकडेही त्याचबरोबर प्रसिद्ध  व्हावेत. या सर्वांचा काळजीपूर्वक अभ्यास हवा. 

सध्या केइआयई इंडस्ट्रीज, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स, हेग इंडिया, रेप्को होम फायनान्स, ग्रॅफाइट इंडिया हे शेअर्स घेण्याजोगे आहेत. त्यात ‘ग्रॅफाइट इंडिया’ला प्राधान्य द्यावे. सध्या ६७० रुपयांना मिळणारा हा शेअर वर्षभरात ९०० रुपयांचा भाव दाखवेल. 

- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link