Next
ग्राहकांना रास्त नि शेतकऱ्यांना जास्त भाव देणारे सेंद्रिय भाजीपाल्याचे ‘डॉ. खर्डे मॉडेल’
शेतकऱ्यांना हमीभाव देऊन सेंद्रिय उत्पादने मध्यमवर्गीयांना उपलब्ध; पिंपरीतील वैद्यकीय व्यावसायिकाचा उपक्रम
BOI
Saturday, March 23, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

डॉ. द्वारकानाथ खर्डे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यासमवेत

पुणे/पिंपरी : शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अनिर्बंध वापर केल्यामुळे त्यांचे अंश शेतीमालात उतरतात. अशी कृषी उत्पादने मानवी आरोग्याला घातक असल्याने सेंद्रिय उत्पादने आहारात असण्याची गरज आहे; मात्र सेंद्रिय उत्पादनांचे दर जास्त असल्याने मध्यमवर्गीयांना ती परवडत नाहीत. शिवाय, त्यांची विक्री किंमत जास्त असली, तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याचे प्रमाण फार कमी आहे. म्हणूनच, शेतकऱ्यांना हमीभाव देऊन ग्राहकांना रास्त दरात सेंद्रिय शेतीमाल घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. द्वारकानाथ खर्डे यांनी राबविलेला उपक्रम आदर्श घ्यावा असा आहे. गेली तीन वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

सध्या ६८ वर्षांचे असलेले डॉ. द्वारकानाथ खर्डे यांनी वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने गेली अनेक वर्षे रुग्णसेवा केली. सध्याच्या काळात कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा अशा गंभीर आजारांचे प्रमाण अगदी तरुण पिढीतही वाढत आहे. याची कारणे अनेक असली, तरी रासायनिक अंश असलेल्या कृषी उत्पादनांचा आहारात असलेला वापर हेही त्याचे एक कारण असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी लोकांना विषमुक्त अन्न कसे मिळेल यावर लक्ष केंद्रित केले. यासाठी काहीतरी केले पाहिजे, या विचाराने त्यांना झपाटून टाकले. आपणच स्वस्त दरात लोकांना सेंद्रिय अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करायचा आणि शेतकऱ्यांनाही चांगला भाव द्यायचा, असे त्यांनी ठरवले. ज्यांना सेंद्रिय उत्पादने हवी आहेत, त्यांना ती उपलब्ध करून देणे, सेंद्रिय उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना भेटणे अशी कामे ते वैद्यकीय व्यवसाय करत असतानाही करत होते. अशा प्रकारे दहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ या क्षेत्रात उतरायचे ठरवले. सेंद्रिय उत्पादने महाग असण्याची कारणे शोधून, जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास त्यांनी केला. त्यातूनच, शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही फायदेशीर ठरणारा त्यांचा हा उपक्रम आकाराला आला. या कामात त्यांना लायन्स क्लबचेही सहकार्य मिळाले. 


गेल्या तीन वर्षांपासून ते सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरात सेंद्रिय भाजीपाला, फळे पुरवत आहेत. शेतकऱ्यांनाही ते वर्षभराचा हमीभाव देतात. ग्राहकांसाठीही विक्रीचा भाव एकच असतो. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक हे दोन्हीही गट खूश आहेत. ‘शेतकऱ्यांना जास्त भाव, सामान्यांना स्वस्त भाव’ असे ब्रीद जपत डॉ. खर्डे हा उपक्रम राबवत आहेत. पिंपरी येथे त्यांनी सेंद्रिय भाजीपाला विक्रीचे केंद्र सुरू केले असून, ते ‘समृद्धी ग्रीन्स’ यांच्या वतीने चालवले जाते. 
घरपोच सेवाही दिली जाते. रोज ताजी भाजी शेतकऱ्यांकडून आणली जाते आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. सध्या पाच गृहनिर्माण सोसायट्यांमधील ५० घरांमध्ये ही सेवा दिली जात आहे. ७० सोसायट्यांमध्ये ही सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. सेंद्रिय भाजीपाला रास्त दरात मिळत असल्याने ग्राहक समाधानी असून, त्यांचा प्रतिसाद वाढतो आहे. 


सेंद्रिय भाजीपाला, फळे, धान्ये महाग असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची अल्प उपलब्धता. ही उत्पादने महाग असल्याने सर्वसामान्य ग्राहक त्याकडे वळत नाहीत. मागणी कमी असल्याने आणि उत्पादनही कमी होत असल्याने शेतकरी सेंद्रिय उत्पादन घेण्याचे टाळतात. हे चक्र भेदायचे असेल तर शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले पाहिजेत, त्याच वेळी ग्राहकांनाही सेंद्रिय शेतीमाल सर्वसाधारण उत्पादनांच्या दरातच उपलब्ध झाला पाहिजे, हे डॉ. खर्डे यांच्या लक्षात आले. त्यावर उपाय म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना वर्षभर हमीभाव देता येईल आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात भाजीपाला देता येईल, अशी योजना तयार केली. लायन्स क्लबतर्फे शेतकऱ्यांना मदत म्हणून आर्थिक मदत दिली जात असे. ती मदत त्यांना वर्षभर हमीभाव देता येण्याकरिता वापरण्यात यावी, असा प्रस्ताव डॉ. खर्डे यांनी मांडला. लायन्स क्लबने तो मान्य केला. त्यामुळे, ‘शेतकरी जितका सेंद्रिय शेतीमाल पिकवतील, तो विक्रीसाठी नेला जाईल आणि वर्षभराचा हमीभाव दिला जाईल,’ अशी ग्वाही शेतकऱ्यांना देण्यात आली. बाजारभाव वाढला तर दिल्या जाणाऱ्या भावातही वाढ केली जाईल, अशी खात्रीही त्यांना देण्यात आली.

शेतकऱ्यांचे गट निर्माण करून त्यांच्याकडून सेंद्रिय शेतीमालाचे उत्पादन घेतले जाऊ लागले. वाहतूक व्यवस्था, विक्री केंद्र अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या. यातून बेरोजगार तरुणांनाही रोजगार मिळाला. सध्या या उपक्रमात सहा मुले काम करत आहेत आणि ३२ शेतकरी जोडले गेले आहेत. एरव्ही एका रुपयातील २० ते २५ पैसे शेतकऱ्यांना मिळतात; पण डॉ. खर्डे यांनी त्यांना ७५ पैशांपर्यंत मोबदला देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय भाजीपाल्यातून चांगली कमाई होऊ लागली. शेतकरी डॉ. खर्डे यांच्या उपक्रमात आनंदाने सहभागी होऊ लागले आहेत. शिवाय ग्राहकांना ताजी, सेंद्रिय भाजी, फळे सर्वसाधारण शेतीमालाच्या दरात मिळू लागल्याने त्यांचाही सहभाग वाढत आहे. 


या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. खर्डे म्हणाले, ‘सध्या आमच्याकडे थेऊरवरून पालेभाजी येते. ओतूर, देहू येथील शेतकऱ्यांच्या गटांकडून फळभाज्या, पालेभाज्या येतात. फळे श्रीरामपूरहून येतात. आमच्या उपक्रमात शेतकऱ्यांना ५० टक्के जास्त रक्कम मिळते. शेतकऱ्यांचा माल त्यांच्या शेतावर जाऊन खरेदी केला जातो. शेतकऱ्यांवर विश्वास टाकल्याने त्यांच्याकडून कधीही खोटी होत नाही. ‘शेती वाचवा, शेतकरी जगवा’ हे आमचे उद्दिट आहे. आता ७५ टक्क्यांपर्यंत शेती नापीक झाली आहे. ती पुन्हा सुपीक केली, तर उत्पादन वाढेल. शेतकरी सुखी होईल. लोकांनाही स्वस्त दरात विषमुक्त अन्नधान्य मिळेल.’  

या उपक्रमात सहभागी असलेले देहूचे शेतकरी संदीप टिळेकर म्हणाले, ‘डॉ. खर्डे यांनी आम्हाला वर्षभर हमीभावाची खात्री दिल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. सेंद्रिय भाजीपाल्याला दरही चांगला मिळत असल्याने उत्पादन कमी असले, तरी आमचे आर्थिक नुकसान होत नाही. मालाचे भाव पडले, तरी नुकसानाची भीती नसते. रसायनांचा वापर होत नसल्याने जमिनीचा कसही सुधारतो. लोकांना चांगले उत्पादन देता येते, याचेही समाधान मिळते. ग्राहकांचीही मागणी वाढत आहे. त्यामुळे माल पडून राहत नाही. डॉ. खर्डे यांच्यामुळे आम्हाला सेंद्रिय शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे.’

नियमितपणे सेंद्रिय भाजीपाला घेणाऱ्या महिला ग्राहक अमृता पोतदार, ज्योती बच्छाव यांनीही डॉ. खर्डे यांच्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. सेंद्रिय भाजीपाला नेहमीच्या भाज्यांच्या दरातच मिळत असल्याने मुलाबाळांना विषमुक्त अन्न खाऊ घालता येते. सेंद्रिय भाजीपाला, फळे खाल्ल्याने आपण आजारापासून दूर राहू शकतो. आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. हा खूप चांगला उपक्रम आहे, जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


सोसायट्या, महिला मंडळांना डॉ. खर्डे यांचे आवाहन 

जास्तीत जास्त मध्यमवर्गीयांना सेंद्रिय उत्पादने परवडणाऱ्या दरात देता यावीत, यासाठी डॉ. खर्डे प्रयत्नशील आहेत. महिला मंडळाला आपल्या सोसायटीत किंवा अन्यत्र कुठे या शेतीमालाची विक्री करायची असेल, तर डॉ. खर्डे त्यांना मदत करण्यासाठी तयार आहेत. सोसायटीतील महिला एकत्र येऊन भाजीविक्रीचे केंद्र चालवू शकतात. माल त्यांच्या केंद्रावर पोहोचवण्याची आणि उरलेला माल परत घेण्याची डॉ. खर्डे यांची तयारी आहे. सोसायट्यांमध्ये विक्री सेवा देण्यासही ते तयार आहेत. ज्या दुकानांना किंवा सेवा केंद्रांना त्यांच्याकडून भाजी घेऊन विक्री करायची असेल, त्यांनाही माल पुरवण्यास ते तयार आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

२०२०पर्यंत ५० केंद्रे उघडण्याची योजना 

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी २०२०पर्यंत पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात ५० विक्री केंद्रे उघडण्याचा डॉ. खर्डे यांचा मानस आहे. पुरवठादार शेतकऱ्यांची संख्या १५०पर्यंत वाढवण्याची योजना असून, सध्या आणखी २० शेतकरी जोडले जाण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

‘जेनेरिक प्रॉब्लेम’ असलेल्या रुग्णाची सेंद्रिय भाजीपाल्याच्या वापरामुळे त्यातून मुक्तता झाल्याचा अनुभव डॉ. खर्डे यांनी सांगितला. या अनुभवामुळे त्यांच्या या कामाला आणखी बळ मिळाले. ते म्हणाले, ‘मी वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना एका रुग्णाला जेनेरिक व्याधीवर कोणत्याही उपचारांचा गुण येत नव्हता. त्यावर औषधोपचारही नव्हते. त्यामुळे सेंद्रिय उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला. आश्चर्य म्हणजे चार महिन्यांतच त्यांना फरक दिसून आला. त्यांची त्या व्याधीतून मुक्तता झाली. त्यांना सेंद्रिय भाजीपाला, फळे पुरवण्याचे काम मी करत होतो. सर्वांना अशी सेंद्रिय उत्पादने मिळाली, तर उत्तम आरोग्य लाभेल, अनेक आजारांपासून दूर राहता येईल, अशी खात्री त्यांना आलेला गुण बघून वाटली. त्यासाठी आपण काही तरी करावे, असे वाटू लागले. समाजाचे आपण काही देणे लागतो. त्यामुळे आपणच लोकांना विषमुक्त अन्न देण्याचे काम पूर्ण वेळ करण्याचे मी ठरवले आणि कामकाज सुरू केले. यात माझा वैयक्तिक आर्थिक फायदा पाहत नाही. जितके जास्त वेगाने काम करता येईल, तितके करण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’ 

सध्या वातावरणातील सर्व प्रकारचे प्रदूषण, धकाधकीचे, ताणाचे जीवन यांमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा वेळी आरोग्यपूर्ण जीवनशैलीत सकस, विषमुक्त आहार महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टीने सेंद्रिय उत्पादने महत्त्वाची आहेत. सेंद्रिय शेतीचा उपयोग शेतजमीन सुपीक होण्यासाठीही होतो. त्यामुळेच डॉ. खर्डे यांच्या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन तसे उपक्रम राबविले गेल्यास सेंद्रिय शेतीची चळवळ उभी राहू शकेल आणि त्यातून ग्राहक आणि उत्पादक या दोन्हींचाही फायदा होऊ शकेल. 

संपर्क : डॉ. द्वारकानाथ खर्डे - ७०४०० २२८०९

(डॉ. खर्डे यांच्या उपक्रमाविषयीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 88 Days ago
I hope , he achieves his aims . Best wishes . Has he contacted the vikas sankalp organisation , Pune?
0
0
Balkrishna Gramopadhye About 93 Days ago
Hope , he finds many outlets.
0
0
हितेश राङे About 93 Days ago
छान मी कोङापे यानचे शेत पाहणी केली
0
0

Select Language
Share Link
 
Search