Next
बारावीच्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग सलग आठव्या वर्षी अव्वल
राज्याचा निकाल ८५.८८ टक्के
BOI
Tuesday, May 28, 2019 | 01:02 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ८५.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल २.५३ टक्क्यांनी घसरला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागला असून, कोकण विभागाची स्थापना झाल्यापासून सलग आठव्या वर्षी हा विभाग राज्यात अव्वल आहे.

मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पुण्यात २८ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर करण्यात आला. विज्ञान, कला आणि वाणिज्य अशा सर्वच शाखांचा निकाल यंदा घसरल्याचे शकुंतला काळे यांनी सांगितले. राज्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९२.६० टक्के, कला शाखेचा ७६.६० टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ८८.२८ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी विज्ञान शाखेचा ९५.८५ टक्के, कला शाखेचा ७८.९३ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ८९.५० टक्के लागला होता. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकालही यंदा घसरला आहे. गेल्या वर्षी तो ८२.१८ टक्के लागला होता, तर यंदा ७८.९३ टक्के लागला आहे.
 
यंदा १२वीच्या परीक्षेला राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले होते. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या आठ लाख ४२ हजार ९१९, तर विद्यार्थिनींची संख्या सहा लाख ४८ हजार १५१ इतकी होती. राज्यातील तब्बल चार हजार ४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 

यंदाही इयत्ता १२वीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के इतका लागला आहे. पुणे विभागाचा निकाल ८७.८८ टक्के, अमरावती विभागाचा ८७.५५ टक्के, कोल्हापूर विभागाचा ८७.१२ टक्के, लातूर विभागाचा ८६.०८ टक्के, नाशिक विभागाचा ८४.७७ टक्के, मुंबई विभागाचा ८३.८५ टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ८२.५१ टक्के इतका आहे. 

शाखेनुसार बघितल्यास, यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९२.६० टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.२८ टक्के, तर कला शाखेचा निकाल ७५.४५ टक्के लागला आहे. 

निकाल पाहण्यासाठी वेबसाइट्स : mahresult.nic.in, maharashtraeducation.com, mahahsscboard.maharashtra.gov.in
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search