Next
‘कर्मचाऱ्यांवर कंपन्यांनी गुंतवणूक करायलाच हवी’
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 05:21 PM
15 0 0
Share this story

एसएलकेसीईई'च्या  अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात निरंजन पाटील यांचा गौरव करण्यात आला. या वेळी (डावीकडून) डॉ. अमित कारना, निरंजन पाटील, अतुल किर्लोस्कर व सोमशेखर कृष्णमणी उपस्थित होते.

पुणे : ‘कर्मचाऱ्यांना दिले जाणारे ‘लर्निंग अँड डेव्हलपमेंट’चे धडे हा केवळ प्रशिक्षणाचा भाग नाही. ती कंपनीच्या चांगल्या भविष्यासाठी कर्मचाऱ्यांवर केलेली गुंतवणूक असते. कंपनीच्या जनुकांमध्ये ‘लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ची संस्कृती रुजणे आवश्यक असून, आपल्या कर्मचाऱ्यांवर आपण गुंतवणूक करायलाच हवी,’ असे मत प्रसिद्ध उद्योजक अतुल किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.

‘एस. एल. किर्लोस्कर सेंटर फॉर एक्झिक्यूटिव्ह एज्युकेशन’ने (एसएलकेसीईई) कंपन्यांमध्ये मध्यम व वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘कौशल’ हा व्यवस्थापन विकास अभ्यासक्रम सुरु केला आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- अहमदाबाद’च्या (आयआयएम) सहकार्याने राबवण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र प्रदान समारंभप्रसंगी अतुल किर्लोस्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आठ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात एकशे ५० तासांच्या अभ्यासाचा समावेश आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीत किर्लोस्कर समुहातील २५ व्यवस्थापन कर्मचारी सहभागी झाले होते.

‘किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीज’चे उपाध्यक्ष अमरशेखर भोनागिरी, ‘एसएलकेसीईई’चे संचालक सोमशेखर कृष्णमणी, सहयोगी संचालक नारायण नायर, ‘आयआयएम’चे डॉ. अमित कारना, ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स’चे व्यवस्थापकीय सहसंचालक आर. आर. देशपांडे, ‘किर्लोस्कर चिलर्स’चे विक्री सहयोगी उपाध्यक्ष गौरांग दाभोळकर, ‘किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज’चे प्रशिक्षण व विकास व्यवस्थापक शांती भूषण या वेळी उपस्थित होते.

किर्लोस्कर म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांना केवळ प्रशिक्षण देणे पुरेसे नाही. त्यांच्यावर जबाबदारी सोपवून त्यांना त्या शिक्षणाचा अवलंब करण्याची संधी देणे आवश्यक असते. प्रसंगी अपयश आले तरी, त्यातून शिकून पुढे जाण्याची मुभाही त्यांना द्यायला हवी. आपल्यातील कमतरता ओळखून त्याबद्दल इतरांशी चर्चा करणे आणि स्वतःत सकारात्मक बदल घडवून आणणे अवघड असते. कर्मचाऱ्यांच्या नव्या फळीचा आत्मविश्वास आणि जोखीम पत्करण्याची तयारी पाहून आनंद वाटतो.’

कर्मचाऱ्यांमधील नेतृत्त्वगुण व निर्णयक्षमतेस चालना देऊन त्यांचा कंपनीसाठी अधिक चांगल्या प्रकारे कसा उपयोग करून घेता येईल आणि त्याबरोबरच त्यांची स्वतःची कारकीर्द कशी उंचावेल, या दृष्टीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात सहभागी झालेले ‘किर्लोस्कर फेरस’चे कर्मचारी निरंजन पाटील यांनी ‘सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी’चा किताब पटकावला. ‘किर्लोस्कर न्यूमॅटिक’चे आशिष गावडे, धनंजय भुसाते, दयानंद जाधव आणि जगदीश पुरंदरे यांचा सांघिक कामगिरीतील यशाबद्दल अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

‘महाविद्यालयीन शिक्षणानंतर अनेक वर्षांनी पुन्हा वर्गात जाऊन बसण्याचा अनुभव खूप छान होता. हा अभ्यासक्रम ‘केस स्टडी’ पद्धतीवर आधारित असून, त्यामुळे परीक्षेचा ताण न घेता वेगळ्या प्रकारे शिकण्याचा अनुभव मिळाला. येथे शिकलेल्या गोष्टींचा नोकरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष अवलंब करण्यास आम्ही सुरूवातही केली आहे,’ अशा भावना सहभागी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link