Next
‘तळजाई टेकडी राहणार वर्षभर हिरवीगार’
प्रेस रिलीज
Thursday, May 10, 2018 | 04:01 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘आतापर्यंत पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांना आता देशातील पहिल्या कार्यान्वित झालेल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून दररोज पाच लाख लिटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे तळजाई टेकडी आता वर्षभर हिरवीगार राहणार आहे,’ असे प्रतिपादन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले.

पुणे महापालिका आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे कार्यान्वित झालेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून तळजाई टेकडीवर प्रथमच प्रक्रिया केलेले पाणी जलवाहिनीतून आठ मे रोजी पोहचले. या वेळी या शुद्ध पाण्याचे पूजन करण्यात आले. त्यावेळी आबा बागुल बोलत होते.

या प्रसंगी पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ राजू धारिया, शैलेंद्र पटेल, सचिन पुणेकर, आर. सी. माहुलकर आणि वास्तुविशारद महेश नामपूरकर, अजित कोंढाळकर, पालिकेचे अधिकारी तसेच पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल, नंदकुमार बानगुडे, हेमंत बागुल, सागर आरोळे, धनंजय कांबळे आदींसह पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

आबा बागुल म्हणाले, ‘तळजाई टेकडीवर १०७ एकर क्षेत्रात वसुंधरा जैव वैविध्य उद्यान हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडून साकारला जात आहे. आजपर्यंत या टेकडीवरील वनसंपदेला वाचविण्यासाठी, प्राणी-पक्षांच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. आजपर्यंत या टेकडीवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहचवले जात होते; मात्र   कै. वसंतराव बागुल उद्यान येथे कार्यान्वित झालेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून तळजाई टेकडीवर अडीच किलोमीटरच्या जलवाहिनीद्वारे आता प्रक्रिया केलेले पाणी आज पोहचले आहे. दररोज पाच लाख लिटर पाणी येथे मिळणार आहे. परिणामी आता वर्षभर तळजाई टेकडी हिरवीगार राहणार आहे. शिवाय वसुंधरा जैव वैविध्य उद्यान प्रकल्पाला या पाण्याचा उपयोग होणार आहे. पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाणीसाठाही वाढणार आहे. वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था आणि टेकडीचे संवर्धन यामुळे पर्यावरणप्रेमींही सुखावले आहेत. नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर येथे एक लाख चौरस फुटाचे क्रीडांगणही पूर्णत्वास आले असून, लवकरच सौरउर्जेवरील ३०० किलोवॅटचा आदर्शवत प्रकल्पही  कार्यान्वित होणार आहे. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणाही सुरू होणार आहे.’

धारिया म्हणाले, ‘असे प्रकल्प काळाची गरज आहे. या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यावरून होणारा दबावही कमी होणार आहे. भूजलपातळी वाढविण्यासाठी आणि पाण्याच्या पुर्नवापराला चालना देण्यासाठी असे प्रकल्प सर्वत्र उभारले पाहिजे आणि तळजाई टेकडीप्रमाणे अन्य टेकड्यांवरही हा प्रकल्प राबवावा. आबा बागुल यांनी पर्यावरणासाठी केलेले हे कार्य आदर्शवत आहे. त्यांची दूरदृष्टी कौतुकास्पद आहे. शहरासाठी त्यांनी अनेक उपयुक्त प्रकल्प दिले आहेत.’
 
माहुलकर म्हणाले, ‘जायका प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपये खर्ची घालण्यापेक्षा शहरातील मोठ्या नाल्यांवर असे प्रकल्प उभे करण्याचे नियोजन झाले पाहिजे. सचिन पुणेकर म्हणाले, वनसंपदेबरोबरच वन्य जीवांच्या अधिवासाचे संवर्धन होण्यासाठी हा प्रकल्प दिशादर्शक आहे. संपूर्ण देशात असे प्रकल्प होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. त्यांनी पर्यावरण संवर्धनाला खऱ्या अर्थाने चालना दिली आहे.’

शैलेंद्र पटेल यांनी या प्रकल्पाचे कौतुक करून महापालिकेने अशा प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात खास तरतूद करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या वेळी सर्व पर्यावरणप्रेमींनी ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि पाण्याचा पुनर्वापर वाढवण्यासाठी पालिकेने बजेटमध्ये १०० कोटी रुपये खास तरतूद करण्याच्या मागणीचे पत्रही आयुक्तांना पाठविले; तसेच आबा बागुल यांच्या प्रत्येक विकासकामांसाठी आम्ही सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाहीही दिली.

या वेळी एका पर्यावरणप्रेमीने ‘आम्ही गेली तीस वर्षे या टेकडीवर दररोज पाण्याच्या बाटल्या घेऊन येत आहोत; मात्र आज टेकडीवर पाणी उपलब्ध झाल्याने खऱ्या अर्थाने टेकडी संवर्धनाला संजीवनी मिळाली आहे, अशा प्रकारचे कार्य फक्त आबा बागुल हेच करू शकतात,’ अशा शब्दांत आबा बागुल यांच्या कार्याचा गौरव केला.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 97 Days ago
It is almost a year since the scheme was launched . Hope it is still working .
0
0

Select Language
Share Link
 
Search