Next
२१ वर्षे सायकलवरून पंढरीची मासिक वारी करणारा भक्त!
६५ वर्षांचे गंगाधर कदम तीन दिवसांत पार करतात ३५० किलोमीटर अंतर
BOI
Thursday, September 19, 2019 | 02:23 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशी भक्तांचा महासागर जमतो. दर महिन्याच्या एकादशीलाही पंढरीची वारी करणारे काही भक्त आहेत; त्यापैकीच एक असलेले गंगाधर चंद्रभान कदम गेली २१ वर्षे ही मासिक वारी करत आहेत आणि तीही सायकलवरून! परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सोन्ना या गावातून तीन दिवसांत ३५० किलोमीटर अंतर पार करून ते दर महिन्याच्या एकादशीला पंढरीत येऊन विठूरायाचे दर्शन घेतात. आज त्यांचे वय पासष्टीच्या घरात असले, तरी या नेमात खंड पडलेला नाही.   

सावळ्या विठूरायाचे दर्शन वेगळेच समाधान मिळवून देते. त्यामुळे वारकऱ्यांना त्याच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. त्यामुळेच ऊन-पावसाची तमा न बाळगता दर वर्षी हजारो वारकरी वारीत सहभागी होतात. दर महिन्याच्या एकादशीला वारी करणाऱ्यांची संख्या त्या तुलनेने कमी असली, तरी तसेही भाविक आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गंगाधर कदम. शेतकरी असलेले कदम सोन्ना ते पंढरपूर हा सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास केवळ तीनच दिवसांत पूर्ण करतात. 

सोन्ना गावातून वारी सुरू झाली, की त्यांचा पहिला मुक्काम अंबाजोगाईत होतो. दुसरा मुक्काम खांडवी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे होता. तिसऱ्या मुक्कामी ते पंढरपुरात पोहोचतात. सायकलवरून ते दिवसाला सुमारे १०० ते १२५ किलोमीटर अंतर पार करतात. मासिक वारीचा उपक्रम त्यांनी १९९८मध्ये सुरू केला. आज वयाच्या ६५व्या वर्षीही त्या नेमात खंड पडलेला नाही. सायकल वारीमुळे आपली तब्येत ठणठणीत असल्याचे ते सांगतात.

वारी करून घरी पोहोचल्यावर बसून न राहता ते मुलांना शेतीकामात मदत करतात. या वयात शेतीची कामे करण्यातही ते मागे नाहीत. गोदावरी नदीच्या किनारी त्यांची सुमारे १२ एकर बागायची शेती आहे. कपाशी व सोयाबीन ही मुख्य पिके ते घेतात. एकरी जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, यासाठी विविध प्रयत्न ते करत असतात. महिनाभर शेतात काम करून ते पुन्हा पंढरपूरच्या वारीला जातात. 

गंगाधर कदम यांना कसलेही व्यसन नाही. ते मोबाइलही वापरत नाहीत. ‘एकदा पंढरपूरच्या वारीची वाट धरली, की मी घराकडची काळजी कधीच करीत नाही,’ असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी परिवर्तिनी एकादशी झाली. त्या वेळी वारी करून पुन्हा गावाकडे निघालेल्या कदम यांची सायकल वारी रोपळे गावात आल्यावर गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या वेळी नागनाथ माळी, पोपट भोसले, नवनाथ गायकवाड, बाळासाहेब भोसले, चंद्रभान चव्हाण, जनार्दन काकडे, आनंद क्षीरसागर, दत्तात्रय बिस्किटे, पांडुरंग आढवळकर, बापू आदमिले आदी मंडळी उपस्थित होती. BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search