Next
गडचिरोलीतील मार्कंडेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार
BOI
Thursday, July 18, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:

गडचिरोली : विदर्भाचे खजुराहो अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्यातील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून गतीने सुरू आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाशी निगडीत असणाऱ्या भारतीय पुरातत्व विभागातर्फे मार्कंडेश्वर मंदिराच्या सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कार्याबाबत मंत्रालयाने माहिती दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर स्थित भगवान शिवाचे पुरातन मार्कंडेश्वर मंदिर हे उत्तर भारतातील प्रसिध्द नागरा शैलीतील मंदिर असून, मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला नोव्हेंबर २०१७मध्ये सुरुवात करण्यात आली. 

मार्कंडेश्वर मंदिराचे निर्माण इसवी सन नऊ ते १२व्या शतकात झाले आहे. शिव वैष्णव आणि शाक्त भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या पुरातन मंदिराचे गर्भगृह आणि शिखर उन्मळून पडले आहे. १२०वर्षांपूर्वी स्थानिक गोंड राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता; मात्र हे जीर्णोद्धाराचे काम शास्त्रीय व तांत्रिकदृष्टया योग्य नसल्याने मंदिराचा काही भाग उन्मळून पडला होता. या पार्श्वभूमीवर, भारतीय पुरातत्व विभागाने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. यानुसार, मंदिराच्या दोन्ही बाजूच्या तुलनेत जास्त नुकसान झालेल्या उत्तरेकडील बाजूच्या दुरुस्तीचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले.

मंदिराच्या नुकसानग्रस्त दोन भिंती दरम्यानच्या जागीचे दगड, वीट आणि चुना यांचा उपयोग करून दुरुस्ती करण्यात आली आहे. मंदिरातील जवळपास एक हजार ५०० नुकसानग्रस्त दगड काढून टाकण्यात आले असून, तीथे भराव घालण्याचे काम सुरू आहे. गर्भगृहातील दगडांना  क्रमवारी देण्यात आली, तसेच मूळ दगड व साहित्याची जोपासना होण्याच्या दृष्टीने शास्त्रोक्तरित्या त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. आतापर्यंत मंदिराच्या भिंती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, कळसाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. 

(मार्कंडा येथील पुरातन मंदिरसमूहाबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search