Next
आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘सी-व्हिजिल’ उपयुक्त
BOI
Tuesday, April 02, 2019 | 01:39 PM
15 0 0
Share this article:

गडचिरोली : लोकसभा निवडणूक २०१९दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी, तसेच त्रुटी दूर करण्यासाठी ‘सी-व्हिजिल’ ॲपची निर्मिती भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. पूर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे; तसेच सबळ पुराव्याअभावी संबंधितावर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन ॲपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत.

‘सी-व्हिजिल’ हे ॲप निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनासंदर्भात तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नाविन्यपूर्ण अस्त्र ठरणार आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. हे ॲप युजर फ्रेंडली असून, ॲपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. यातील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही अँड्राइड स्मार्टफोनवरून या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाची तक्रार करता येऊ शकते.

आचारसंहितेचा भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा दोन तीन मिनिटांचे व्हिडिओ रेकाँर्डिंग करावे. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीपीएस) स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. नंतर त्या तक्रारदार नागरिकाच्या मोबाइलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो.  नागरिक अशा प्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात. प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. ‘सी-व्हिजिल’द्वारे आपली ओळख लपवूनही तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाइल क्रमांक आणि इतर प्रोफाइल तपशील या प्रणालीवर पाठवले जात नाही. त्यामुळे निनावी तक्रारीबाबत तक्रारकर्त्यास पुढील स्थिती, संदेश मिळणार नाहीत; मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई होणार आहे.

नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटांतच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हिएसटी आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठवण्यात येईल. त्यानुसार संबंधित पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल. त्यानुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या जीव्हीआयजीआयएल अन्वेषक नामक जीआयएस आधारित मोबाइल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या १५ मिनिटांच्या आत पोहोचणे अपेक्षित आहे.

संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास आणि तक्रारीतील तथ्यांची तपासणी करून त्यासंबंधीचा अहवाल ॲपद्वारेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठविला जाईल. हा कालावधी ३० मिनिटांपेक्षा अधिक नसेल. त्या तक्रारीत तथ्य आढळले, तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या १०० मिनिटांच्या आत तक्रारीची स्थिती तक्रारकत्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश पाठवला जाईल.

(अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search