Next
मेंढापुरात पहिल्यांदाच गजबजला बाजार
BOI
Thursday, January 11, 2018 | 12:52 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील श्री दुधेश्वर प्रशालेतर्फे १० जानेवारीला भरवण्यात आलेल्या ‘बाजार डे’ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बाजारात अवघ्या तीनच तासांत सुमारे ७० हजारांची उलाढाल झाली.

मेंढापूर गावात आज प्रथमच बाजार भरला. क्रीडा सप्ताहानिमित्त या बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक रमेश कवडे व जयराम पवार, रमेश पवार,   वैजीनाथ नगरे, पद्माकर काळे, महेश पाटील, रामचंद्र घोडके, महेश राजगुरू, शंकर शिंदे, मनिजा सानगर, संभाजी गोरे या शिक्षकांनी हा बाजार भरवण्यासाठी विशेष मेहनत घेतली.  
 
या बाजारात विविध वस्तूंचे सुमारे १७० स्टॉल्स लागले होते. यात विद्यार्थांनी खमंग भजी, गरमागरम वडापाव, चटकदार भेळ, पुरीभाजी असे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. अनेकांनी आपल्या शेतातील ताजी भाजी, बोरे, पेरू, दुधी भोपळा, कलिंगड, डाळींब आदी शेतमाल; तसेच लाकडी पाट, पोळपाट, लाटणे, काटवट, तर काही विद्यार्थ्यांनी ब्लाउज पीस व चोळखण विक्रीसाठी ठेवले होते.

संस्थेचे अध्यक्ष रामदास पवार यांच्या हस्ते या बाजाराचे उद्घाटन झाले. या वेळी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सचिव सिताराम पवार, संपत पवार, नागनाथ पाटील, माजी सरपंच धेंडूबाई पाटील, शाहू पवार, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पवार, दुद्धेश्वर पवार, राजाराम पवार, संभाजी सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

इयत्ता नववीतील रूपाली आयरे व सहकाऱ्यांनी भेळ विक्रीतून सुमारे साडेतीन हजार रुपयांची कमाई केली. करीना जाधव व नंदिनी पाटोळे या विद्यार्थिनींनी भजी विक्रीतून सुमारे दीड हजार, निशा सुतार या विद्यार्थीनीने स्टेशनरी विक्रीतून पाचशे रुपये कमावले. बाजारात चांगली कमाई झाल्याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मेंढापूर गावात आठवडा बाजार सुरू व्हावा, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली.    

बाजार विक्रीतील अनुभवाविषयी बोलताना दहावीतील रूपाली आयरे म्हणाली, ‘आमच्या शाळेत आज ‘बाजार डे’ भरवल्यामुळे आम्हाला अनेक प्रकारचे लोक भेटले. यातून व्यवहारज्ञानात चांगलाच भर पडली आणि आपणही काहीतरी व्यवसाय करू शकतो असा आत्मविश्वास मिळाला.’

मुख्याध्यापक कवडे यांनी विद्यार्थांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान आत्मसात करता यावे म्हणून ‘बाजार डे’चे आयोजन केल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव पवार यांनी शाळेत खराखुरा बाजार भरवल्यामुळे विद्यार्थांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाल्याचे सांगितले. ग्रामस्थ बापू पवार यांनी आमच्या गावात पहिल्यांदाच बाजार भरल्यामुळे छान वाटल्याची प्रतिक्रिया दिली. ‘बाजारात एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळाल्याने वेळ व पैसा वाचला. या बाजारात पाचशे रुपयांची खरेदी केली,’ असे ते म्हणाले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh Kawade Headmaster About
Thanks
0
0

Select Language
Share Link
 
Search