Next
सूत्रसंचालकाचा मार्गदर्शक
प्रसन्न पेठे
Monday, June 25, 2018 | 09:26 AM
15 0 0
Share this story

जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्या शिकवावे’ या शिकवणुकीनुसार प्रा. ढोकले यांनी ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ या पुस्तकातून उदयोन्मुख सूत्रसंचालकांना एकीकडे युक्तीच्या चार गोष्टी सांगत दुसरीकडे सूत्रसंचालनासाठी उपयुक्त ठरतील अशी अक्षरशः शेकडो चमकदार वाक्यं, समर्पक ओव्या/ सुभाषितं, सुंदर काव्यपंक्ती, उर्दू शेर आदींचा खजिनाच समोर आणून ठेवलाय. अशा या अनोख्या पुस्तकाचा हा परिचय...
..............
प्रा. पुरुषोत्तम सदाफुले यांनी नवव्या राज्यस्तरीय काव्यमहोत्सवामध्ये दिलेल्या संधीचा वापर करून, प्रा. दिगंबर ढोकले हे सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात प्रवेश करते झाले आणि नंतर अनेक वर्षं यशस्वीपणे त्यांनी सूत्रसंचालन क्षेत्र गाजवलं. त्यांच्या गाठीशी असलेल्या १५ वर्षांहून अधिक अशा प्रदीर्घ अनुभवाचा फायदा तरुण पिढीला आणि विशेषतः या क्षेत्रात काम करण्यासाठी येणाऱ्या उदयोन्मुख मंडळींना व्हावा, या सद्हेतूनं त्यांनी ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ या पुस्तकाचा अनमोल खजिना तयार केला. यासाठी त्यांना मदत झाली ती त्यांनीच वेळोवेळी केलेल्या अनेक विचारांच्या संग्रहाची! 

सूत्रसंचालकाला तांत्रिक गोष्टी सांभाळायला तर लागतातच, पण श्रोत्यांना बांधून ठेवण्यासाठी आणि विषय नेमका पोहोचवण्यासाठी चपखल उदाहरणं किंवा किस्से सांगावे लागतात. सुदैवाने प्रा. ढोकले यांना त्याची कमतरता कधीच भासली नाही. त्यातूनच त्यांनी आपल्याकडचं ते बहुमोल साहित्य-धन हे तरुण सूत्रसंचालकांना उपयोगी पडावं म्हणून पुस्तकरूपाने आणलं आहे. 

यामध्ये शेकडो चमकदार वाक्यं, समर्पक ओव्या/सुभाषितं, सुंदर काव्यपंक्ती, उर्दू शेर, बोधकथा, इंग्लिश अवतरणे आहेत, जी सूत्रसंचालकाला प्रचंड साह्यभूत ठरतील अशीच आहेत. या पुस्तकातून आपल्याला प्रा. ढोकले यांचा व्यासंग जाणवतो. खरं पाहता सूत्रसंचालन म्हणजे तारेवरची कसरतसुद्धा ठरू शकतं. कारण ते करणाऱ्या सूत्रसंचालकाचं उत्तम वाचन असावं लागतं, संदर्भ द्यावे लागतात, समयसूचकता दाखवावी लागते आणि त्याने हजरजबाबी असणंही महत्त्वाचं ठरतं.  

या पुस्तकात एकूण २८ प्रकरणं आहेत. सूत्रसंचालकाने घ्यायची काळजी, करायची तयारी आणि तपासण्या यांनी सुरुवात करून पुढे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आणि तुकारामाचे अभंग संदर्भासाठी दिले आहेत. पहिल्या काही प्रकरणांनंतर पुढे प्रा. ढोकले यांनी आई, अध्यात्म, स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज, शिक्षक यांपासून ते दीपप्रज्ज्वलन, विवाह, वृक्षपूजन, निरोप समारंभ, साहित्य, दशक्रिया अशा नैमित्तिक समारंभांचा विचार करून त्यानुसार वेगवेगळी अवतरणं/ सुभाषितं/ श्लोक/शायरी वगैरेंची मांडणी केली आहे.
 
सूत्रसंचालन क्षेत्रात काही करू शकणाऱ्या तरुणांना उत्तम संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक उपयुक्त ठरेल, हे नक्की. जरूर वाचावं असं हे पुस्तक आहे.   

पुस्तक : सूत्रसंचालनाचे अंतरंग      
लेखक : प्रा. दिगंबर मारुती ढोकले      
प्रकाशक : काषाय प्रकाशन, बाबाजान चौक, पुणे ४११००१   
संपर्क : ९०११३ ७२०२३
पृष्ठे : १९२ 
मूल्य : २०० ₹ 

(‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
P L Mahajan About 229 Days ago
Very nice book sir,it is so useful for all .
0
0

Select Language
Share Link