Next
मुलांना भावनिक आधार द्या...
BOI
Saturday, October 20, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


मूल वयात येताना त्याच्यात जसे शारीरिक बदल होतात, तसेच अनेक मानसिक बदलही होत जातात. या बदलांपासून ते अगदीच अनभिज्ञ असल्याने, आपण कुठे चुकतोय का? किंवा आपण असा विचार कसा करू शकतो? अशा मुद्द्यांवरून त्याचा गोंधळ उडणं सहाजिक आहे. अशा वेळी पालकांनी त्याला या भावनांचा उलगडा करून देणं आवश्यक आहे... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मूल वयात येताना त्याच्यात होणाऱ्या वर्तनबदलाबद्दल....
...........................
शारदाताई बोलण्यासाठी आल्या होत्या. आल्यापासूनच त्या खूप अस्वस्थ, चिंतातूर वाटत होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचे पतीसुद्धा आले होते. त्यांच्याही चेहऱ्यावर काळजी दिसत होती. परंतु ताईंपेक्षा ते बरेच शांत होते. त्यांनीच दोघांची ओळख करून दिली. काका एका कंपनीत नोकरी करत होते, तर काकू गृहिणी होत्या. त्यांना दोन मुलं होती. त्यापैकी त्यांच्या मोठ्या मुलासंदर्भात म्हणजे प्रकाशच्या संदर्भात बोलायला ते दोघं आले होते. 

प्रकाश नववीत शिकत होता आणि गेल्या सात-आठ महिन्यांपासून त्यांना प्रकाशमध्ये खूप बदल जाणवत होते. या काळात तो अगदीच शांत आणि गंभीर झाला होता. हे सांगताना प्रकाशचे बाबा आणखी गंभीर झाले होते. ‘त्याच्या धाकट्या बहिणीचं आणि त्याचं नातं खूप छान आहे. दोघं खूप खेळतात, मस्ती करतात, प्रकाश तिची आणि आईचीही खूप काळजी घेतो, बहिणीचा छान अभ्यास घेतो. तो स्वतः अभ्यासात हुशार आहे. परिक्षेत त्याला नेहमी चांगले गुण मिळतात, पण गेल्या काही काळापासून तो खूपच शांत झालाय. सारखा गोंधळलेला वाटतो. घरात नीट बोलतच नाही. बोलणं टाळतो. कदाचित त्याच्या मनात कसली तरी भिती बसली आहे का, असं आम्हाला सारखं वाटतं, हल्ली अभ्यासातही त्याचं लक्ष लागत नाही. सारखा आपल्या खोलीत एकटाच जाऊन बसतो.’ प्रकाशचे बाबा हे बोलत असतानाच त्याची आई म्हणजेच शारदाताई मधेच म्हणाल्या, ‘त्याला कोणी त्रास देत नसेल ना? मुलं रॅगिंग वगैरे करत नसतील ना? आमचा प्रकाश खूप साधा भोळा आहे हो. आम्ही बोलायचा खूप प्रयत्न केला त्याच्याशी, पण तो काहीच बोलत नाही हो’, एवढं बोलून त्यांना एकदम रडू आलं. आणखी काही आवश्यक माहिती घेऊन त्यांना पुढील वेळी प्रकाशला घेऊन यायला सांगितलं. ठरल्याप्रमाणे त्याचे बाबा त्याला दोन दिवसांनी घेऊन आले.

त्यांनी त्याची ओळख करून दिली आणि ते बाहेर जाऊन बसले. मग प्रकाशशी संवाद साधायला सुरुवात केली, पण पहिल्या सत्रात प्रकाश काहीच बोलला नाही. मान खाली घालून जेवढे प्रश्न विचारले, त्यांची त्यानं तुटक उत्तरं दिली. नंतरच्याही काही सत्रांत तो असाच शांत होता. ओळख झाल्यावर, विश्वास वाटायला लागल्यावर प्रकाश हळूहळू बोलायला लागला. तो जे बोलेल, ते कोणालाही सांगणार नाही, असं आश्वासन दिल्यावर तो मनातलं थोडं थोडं बोलायला लागला. 

त्याने त्याच्या मनात येणारे विचार सांगितले. गेल्या काही दिवसांपासून त्याला विचित्र वाटत होतं. म्हणजे त्याला सारखं मुलींशी बोलावसं वाटायचं. एका मुलीकडे वर्गात सारखं बघावसं वाटायचं. तिच्याशी मैत्री करावीशी वाटायची. हे काही मित्रांना सांगितलं, तर मुलं त्याला तिच्या नावावरून चिडवायची. अशा अनेक भावना, विचार त्याने अगदी मोकळेपणाने व्यक्त केले. आपल्या मनात येणारे हे विचार खूप वाईट आहेत. आपण खुप वाईट आहोत, म्हणूनच आपल्या मनात असे विचार येतात... असा त्याचा समज झाला होता. म्हणूनच मुलींपासून दूर राहण्याचा तो सतत प्रयत्न करत होता. आपल्या मनात असे विचार येऊच कसे शकतात? या एकाच विचाराने तो सतत अस्वस्थ असायचा. आपण खूप वाईट आहोत या अपराधी भावनेनं तो बैचेन झाला होता.

त्याच्याशी चर्चा करताना, असं लक्षात आलं, की त्याला स्वतःमध्ये होणारे बदल आणि त्यांचे अर्थ, त्याची कारणं उमगत नसल्याने त्याच्या मनात ही अपराधी भावना निर्माण झाली होती. त्यामुळे पुढील सत्रांमध्ये त्याला त्याच्यातील होणाऱ्या बदलांची, मनात येणाऱ्या विचारांमागील कारणांची शास्त्रशुद्ध ओळख करून दिली. त्याच्या साऱ्या शंकांचं निरसन झालं. त्यामुळे या साऱ्यावरचे उपायही शोधता आले आणि मग आपण वाईट मुलगा आहोत, ही भावना त्याच्या मनातून आपोआपच दूर झाली आणि सगळं पूर्ववत छान झालं. अर्थातच यात त्याच्या आई-वडिलांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं. 

(केसमधील नावं बदलली आहेत.)

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search